आंदोलन काळात नुकसानग्रस्त झालेल्या कुटुंबावर मदतीचा पाऊस...

 आंदोलन काळात नुकसानग्रस्त झालेल्या कुटुंबावर मदतीचा पाऊस...

कोल्हापूर - कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ  बुधवारी (ता. ३) पुकारलेल्या कोल्हापूर बंद आंदोलनात ज्या महिलेची भरलेली टपरी उलथवून टाकून, साहित्य विसकटले होते, त्या कुटुंबावर आज मदतीचा पाऊसच पडला.

शहराबरोबरच पुणे, दिल्ली, मुंबई येथूनही या कुटुंबाला मदत करण्याची तयारी अनेकांनी दर्शवली. कोल्हापुरातील काही दानशुरांनी तर ‘सकाळ’मधील बातमी वाचून थेट त्या महिलेच्या हातातच रोख रक्कम व साहित्यही देऊन दातृत्वात कोल्हापूरकर कमी नाहीत, हे दाखवून दिले. 

‘कोल्हापूर बंद’ला हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने रस्त्यावर दिसेल ते वाहन आणि इमारतीवर तुफान दगडफेक केली. बंद असलेली दुकाने आणि पार्किंगमधील वाहनेही दगडफेकीत चक्काचूर झाली. एवढेच नव्हे, तर रस्त्याच्या कडेला लावलेल्या व बंद असलेल्या टपऱ्याही जमावाने उलथवून टाकल्या. या घटनेत रेल्वेस्थानक परिसरातील श्रीमती शोभा गायकवाड यांची साहित्याने भरलेली टपरी उलथवून टाकली. 

श्रीमती गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी घरमालकांकडून दहा हजार रुपये उसने घेऊन टपरीत अंडी, तेल, चहाला लागणारे साहित्य, पानपट्टीचा माल भरला. काल सर्व साहित्य जमीनदोस्त झाले, टपरीचेही नुकसान झाले. दोन मुलांना घेऊन व्यवसाय करणाऱ्या या महिलेवर या घटनेने आभाळच कोसळले. घटनेने हतबल झालेली ही महिला दोन्हीही मुलांसह सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत या टपरीजवळच बसून होती. 

‘सकाळ’मध्ये आज टपरीवरील महिलेवर झालेल्या अन्यायाची बातमी प्रसिद्ध झाली. बातमी वाचून या महिलेला मदत करण्यासाठी लोकांची रीघच लागली. दातृत्वात नेहमीच आघाडीवर असलेल्या कोल्हापूरकरांनी ‘सकाळ’च्या कार्यालयात फोन करून या घटनेची अधिक माहिती घेऊन मदत करण्याचे आश्‍वासन दिले.

 ‘आम्ही कोल्हापुरी’ या ग्रुपच्या सदस्यांनी तर या टपरीतील जे साहित्य जमीनदोस्त झाले, ते संपूर्ण साहित्यच या कुटुंबाला घेऊन दिले. त्यात १२ डझन अंडी, तेलाचा डबा, साखर, चहापूड, खुर्ची यांचा समावेश होता. ‘आम्ही कोल्हापुरी’चे हर्षल सुर्वे, आशपाक आजरेकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही मदत या कुटुंबाला दिली. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते बंडा साळोखे, महेश उरसाल यांनीही या कुटुंबाला मदत देण्याची तयारी दर्शवली. मोडलेला संसार घटनेनंतर २४ तासांत उभा राहिला. 

यांनी दिला मदतीचा हात
 अभय देशपांडे    बॅटरी (चार हजार रुपये)
 हर्षल सुर्वे     तेलाचा डबा (एक हजार २०० रुपये)
 स्वप्नील पार्टे.............पाच किलो साखर, चहापूड, ग्लास
 सचिन लिंग्रस     १२ क्रेट अंडी
 अरोरा     दोन हजार रुपये
 जयेश पटेल    चहाची किटली

अनेकांनी मदत दिली
 ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर स्टेशन रोडवरील या उद्‌ध्वस्त केलेल्या टपरीने रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. अनेकांनी वाहने थांबवून या कुटुंबाला नाव न सांगताच शक्‍य तेवढी आर्थिक मदत केली. कोणी ५००, कोणी हजार रुपये रोख स्वरूपात दिले.

जिल्ह्याबाहेरूनही मदतीचा ओघ
कोल्हापुरातील दानशूर व्यक्ती तर या कुटुंबासाठी पुढे आल्याच; पण मुंबई, पुणे, दिल्ली येथूनही अनेकांनी या कुटुंबावर झालेल्या अन्यायाची बातमी वाचून मदतीची तयारी दर्शवली. ‘सकाळ’बरोबरच ‘सरकारनामा’लाही ही बातमी प्रसिद्ध झाल्याने त्याचा चांगला परिणाम झाला. पुण्यातील एका व्यक्तीने तर या कुटुंबाला ५० हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनीही संपर्क साधून या कुटुंबाला आम्हीही मदत करू, असे फक्त आश्‍वासनच दिले नाही; तर पैसे कोठे पाठवू अशीच विचारणा ‘सकाळ’कडे केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com