कोल्हापूर महापालिकेत सेवाकर वाढीचा प्रस्ताव मंजूर

कोल्हापूर महापालिकेत सेवाकर वाढीचा प्रस्ताव मंजूर

कोल्हापूर - घरफाळावाढीस पदाधिकाऱ्यांचा विरोध झाल्यानंतर प्रशासनाने भीतभीतच सेवा कराच्या वाढीचा मांडलेला प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत आज मंजूर करण्यात आला. अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती आशिष ढवळे होते. ही वाढ साधारणपणे दहा टक्‍क्‍यांपर्यंत आहे. 

घरफाळावाढीचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीला सादर केला होता. दहा ते तीस टक्‍क्‍यांपर्यंत ही वाढ सुचविली होती; मात्र स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाकडे सदस्यांनी पाहिलेदेखील नाही. प्रशासनाचा आहे तसा प्रस्ताव त्यांनी सर्वसाधारण सभेकडे पाठविला. या ठिकाणीही त्याला विरोधच झाला.

पाणीपुरवठा विभाग गेल्या दोन वर्षांपासून पाणीपट्टीवाढीचा प्रस्ताव महापालिकेला सादर करत आहे; मात्र पदाधिकारी तो मंजूरच करत नाहीत. त्यामुळे यावर्षी पाणीपुरवठा विभागाने पाणीपट्टीवाढीचा प्रस्तावच पाठविला नाही. महापालिकेला उत्पन्न मिळवून देणाऱ्या या दोन मोठ्या विभागांच्या दरवाढीला विरोध झाल्यामुळे प्रशासनाने सेवा करामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला आणि त्याला मंजुरी देण्यात आली.

करवाढीला मंजुरी दिल्यामुळे महापालिकेच्या वतीने भाड्याने देण्यात येणाऱ्या मैदानांच्या भाड्यामध्ये वाढ झाली आहे. जलतरण तलावाच्या पासमध्ये दोनशे रुपयांपासून आठशे रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विविध व्यवसाय ऑडिट फीमध्ये दहा टक्‍के वाढ केली आहे. सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत मैदानासाठी २४४० रुपये आकारण्यात येत होते. आता ४०७० रुपये भाडे करण्यात आले आहे. दुपारी दोन ते सात या वेळेसाठी पूर्वी ३६२० रुपये आकारत होते, आता ते ५४७० इतके करण्यात आले आहे. शहरातील पार्किंगसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव होता. सध्या वीस रुपये प्रति तास आकारण्यात येत आहे. त्यात दहा रुपये वाढविण्यात आले होते; मात्र त्याला सदस्यांनी विरोध केला. महालक्ष्मी, प्रांत कार्यालय, महालक्ष्मी फेरीवाले मार्केट, मध्यवर्ती बस स्थानक येथे असणाऱ्या पे अँड पार्किंगच्या ठिकाणी पार्किंगचे दरफलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

वाढविलेले कर असे - कंसातील आकडा सध्याचा आकार
मैदान : सकाळी नऊ ते दुपार दोन : ४०७० रुपये ( रु.२४४०)
        दुपारी दोन ते सायंकाळी सात : ५४७० रुपये (रु. ३६२०)
जलतरण : मासिक पास प्रौढ व्यक्‍तीस : ५०० रुपये (रु.३००)
         वार्षिक पास : ४००० रुपये (रु. १२००)
          फॅमिली पास : ५००० रुपये (रु. ३०००)
          स्पर्धेसाठी भाडे : ३००० रुपये (रु. १०००)
          चित्रीकरणासाठी : १५००० रुपये ( रु. १००००)
विविध व्यवसाय फीमध्ये दहा टक्के वाढ
अग्निशमन दल : आपत्कालीनसाठी मोफत
प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम सभा, हेलिपॅड : पहिला तास ११०० रुपये (रु. १०००)
                         : दुसरा तास ८०० रुपये ( रु ७००)
                         : चार तासांपेक्षा अधिक वेळेसाठी : ९००० रुपये (रु. ८०००)
धार्मिक कार्यक्रमासाठी : २४ तासांकरिता ३००० रुपये (रु २५००)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com