धगधगत्या राष्ट्रप्रेमाची पंच्याहत्तरी..!

धगधगत्या राष्ट्रप्रेमाची पंच्याहत्तरी..!

कोल्हापूर - छत्रपती शिवाजी चौक म्हणजे कोल्हापूरकरांचं धगधगतं प्रेरणास्थान. याच प्रेरणास्थानाच्या साक्षीने आजही अनेक सामाजिक बदलांची नांदी होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करूनच विविध प्रश्‍नांवर आंदोलनाला धार येते. मात्र, हा पुतळा कसा उभारला आणि तेथील पूर्वीचा विल्सनचा पुतळा कसा हटविला गेला, यामागे राष्ट्रप्रेमाचा मोठा धगधगता इतिहास आहे आणि गुरुवारी (ता. २१) या साऱ्या इतिहासाला आणि एकूणच स्मृतींना उजाळा मिळणार आहे. 

स्वातंत्र्यपूर्व काळात संगमरवरी असणारा लॉर्ड विल्सनचा पुतळा विद्रूप करायचा व तो फोडून टाकायचा, हा थरार ७५ वर्षांपूर्वी घडला. शिवाजी पेठेतल्या भागीरथीबाई तांबट व जयाबाई हवेरी या दोन स्वातंत्र्यसैनिक महिलांनी डोक्‍यावरील बुट्टीतून डांबर आणले आणि भरदिवसा पुतळा विद्रूप केला. या विद्रूप पुतळ्यावर स्वातंत्र्यसैनिकांनी हातोड्याचे घाव घालून तुकडे केले. त्यानंतर विद्रूप पुतळा काढून त्या जागी विल्सनचाच नवा पुतळा उभा करण्याची तयारी सुरू झाली; पण त्याला विरोध होऊ लागला. नेमकी ही संधी घेत चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याची कल्पना मांडली.

कोल्हापुरातील तत्कालीन राजनैतिक प्रतिनिधी कर्नल हॅरिसन यांच्याशी चर्चा करून तोंडी परवानगी मिळवली व त्यानंतर केवळ १८ दिवसांत पुतळा ओतवण्यात आला. ज्येष्ठ शिल्पकार कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी ही जबाबदारी पार पाडली. १४ मे १९४५ ला पुतळ्याच्या अनावरणाची तारीख जाहीर झाली; पण पुतळ्याच्या ओतकामात अचानक अडचण आली. त्या वेळच्या शुगरमिलमधील तंत्रज्ञांनी ही अडचण दूर करण्यास मदत केली व अनावरणाच्या वेळेअगोदर अवघ्या काही अवधीत हा पुतळा चौथऱ्यावर चढविण्यात आला. 

येत्या गुरुवारी (ता. २१) या ऐतिहासिक घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने विशेषांकाचे प्रकाशनही होईल. आनंद माने, शरद तांबट, जयंत देशपांडे, नीलेश हावीरे, धर्मराज जगताप, ॲड. जयंत देसाई, प्रकाश पोवार, रमेश घाटगे आदींनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com