शालेय मुलास अमानुष मारहाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

कोल्हापूर - कुस्तीचे धडे गिरवण्यासाठी नगर जिल्ह्यातून येथे आलेल्या शालेय मुलाला अमानुष मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. सार्थक नवनाथ गोरे (वय 7, मिरजगाव, नगर) असे त्याचे नाव आहे. स्थानिक डॉक्‍टरांच्या दक्षतेमुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. त्याच्याच भागातील सहकारी मित्रांनीच व्यायाम करत नसल्याच्या कारणातून सार्थकला मारहाण केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला.

सार्थक पहिली इयत्तेत शिकतो. उन्हाळी सुटीत त्याला कुस्तीचे धडे गिरविण्यासाठी 1 मे रोजी आई-वडिलांनी कोल्हापुरात पाठवले. भाडेतत्त्वावर घेतलेल्या खोलीत सार्थक त्याच्यापेक्षा वयाने थोड्या मोठ्या असणाऱ्या इतर तिघांबरोबर राहू लागला. मंगळवारी (ता.6) 12 ते 14 वयोगटातील दोन मुले सार्थकला घेऊन दवाखान्यात गेली. त्याला लघुशंकेबाबत त्रास होत असल्याचे डॉक्‍टरांना त्यांनी सांगितले. मात्र, त्याच्या चेहऱ्यावर, पाठीवर, कानाजवळ जखमेचे व्रण त्यांच्या निदर्शनास आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्‍टरांनी त्याच्या घरच्यांशी स्वतः संपर्क साधला.

सार्थकचे आई-वडील रात्री उशिरा कोल्हापुरात आले. त्यानंतर सार्थकला विश्‍वासात घेऊन त्यांनी विचारणा केली. त्यात त्याने नगर जिल्ह्यातीलच तिघा सहकारी मुलांनी जोर बैठका मारण्याचा व्यायाम करत नसल्याच्या कारणावरून वेळोवेळी काठीने पोटावर, पाठीवर, तोंडावर आणि गुप्तांगावर अमानुष मारहाण करायचे. तसेच, त्याला पेटत्या गॅसवरही बसविण्याचे अघोरी कृत्यही त्या तिघा सहकारी मित्रांनी केले असल्याचे त्याने सांगितले.

टॅग्स