शिवराज्याभिषेकासाठी राबले हजारो हात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

कोल्हापूर - दुर्गराज रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात लाखो शिवभक्‍तांच्या सोयी-सुविधांसाठी हजारो हात राबले. निवास व्यवस्था, अन्नछत्र, गड सजावटीपासून ते गड स्वच्छतेत स्वयंसेवकांनी उत्स्फूर्ततेने सहभाग नोंदवून सोहळ्यात खारीचा वाटा उचलला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने केलेले नेटके नियोजन प्रभावी ठरले.

कोल्हापूर - दुर्गराज रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात लाखो शिवभक्‍तांच्या सोयी-सुविधांसाठी हजारो हात राबले. निवास व्यवस्था, अन्नछत्र, गड सजावटीपासून ते गड स्वच्छतेत स्वयंसेवकांनी उत्स्फूर्ततेने सहभाग नोंदवून सोहळ्यात खारीचा वाटा उचलला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने केलेले नेटके नियोजन प्रभावी ठरले.

समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दोन महिने झालेल्या बैठका महत्त्वपूर्ण ठरल्या. गडावरच शिवभक्‍तांनी दुर्ग संवर्धनाचा निर्धार केलाच; शिवाय सोहळ्यानंतर गडावरील प्लास्टिक बाटल्या, पिशव्या, पत्रावळ्या गोळा केल्या. 

शिवराज्याभिषेकासाठी शिवभक्त तरुण, महिला, युवती, ज्येष्ठ नागरिकांचा दरवर्षी आकडा वाढत आहे. त्यांना कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी समितीने बेचाळीस समित्या तयार केल्या होत्या. पाण्याची टंचाई भासू नये, याची दक्षता घेतली होती. रायगड प्रशासनासमवेत दोन वेळा बैठक घेऊन समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत व कार्याध्यक्ष हेमंत साळोखे यांनी गडाची दोन वेळा पाहणी केली होती. वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवला होता. केवळ नाशिकहून बेचाळीस फोर व्हिलर येत असल्याने ट्रॅफिक जॅमची शक्‍यता लक्षात घेऊन शटल सर्व्हिसची व्यवस्था केली होती. महाराष्ट्रासह हरियाणा, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाबमधून शिवभक्तांनी गडावर हजेरी लावली. गडावर चढण्यास एक तासाचा लागणारा अवधी लक्षात घेता गडाच्या पायथ्यालाच शिवभक्तांसाठी अन्नछत्राची सोय केली होती.

रायगड जिल्हा प्रशासनाने कोंझरपासून रायगडच्या पायथ्यापर्यंत पार्किंगचे उत्कृष्टरीत्या नियोजन केले होते. गडावर राहण्यासाठी महिलांसाठी एमटीडीसीचा मोठा हॉल उपलब्ध केला होता. 

बाजारपेठेच्या मागे तात्पुरते शौचालयही होते. नियंत्रण कक्षाद्वारे शिवभक्तांना सूचना देण्यात येत होत्या. वॉकी-टॉकीद्वारे समितीचे सदस्य एकमेकांशी संपर्क साधून नियोजनात व्यस्त होते.  

मावळ संघटना, छावा संघटना (पुणे), बा रायगड, मराठा फोर्टस्‌, झुंजार शिलेदार, शिवराष्ट्र संघटना (अलिबाग), शिवधनुष्य प्रतिष्ठान, सकल मराठा समाज, नाईट फॅन्स, चला वारीला रोप, आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची, मराठा रियासत (पुणे), स्वाभिमानी छावा (पुणे) या संघटनांनी आपापल्या परीने शिवकार्यात खारीचा वाटा उचलला. गडावर अन्य संघटनांनी गडावरील कचरा गोळा करत दुर्ग संवर्धनासाठी हातभार लावला.

शिलेदारांचे कौतुक करावे तेवढे थोडेच 
शिवभक्तांसाठी चार ते सहा जूनदरम्यान अन्नछत्राची सोय केली होती. अन्नछत्रासाठी जिल्हा परिषदेचे शेड ते होळीच्या माळापर्यंत रांग लागत होती. एकही शिवभक्त उपाशी झोपणार नाही, यासाठी अन्नछत्रातील स्वयंसेवकांतर्फे सहा ते सात ठिकाणी जेवण दिले जात होते. तीन जूनला अन्नछत्राचे साहित्य रोप-वे येथून जिल्हा परिषदेच्या शेडपर्यंत नेणाऱ्या शिलेदारांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.