हुपरीच्या निवडणुकीवर इचलकरंजीचा प्रभाव

हुपरीच्या निवडणुकीवर इचलकरंजीचा प्रभाव

इचलकरंजी - हुपरी नगरपालिका निवडणुकीवर इचलकरंजीचा प्रभाव सुरुवातीपासून राहिला. माजी मंत्री प्रकाश आवाडे विरुद्ध आमदार सुरेश हाळवणकर यांच्यातील इचलकरंजीतील राजकीय संघर्ष हुपरीमध्येही तितकाच प्रखरपणे दिसून आला. यामध्ये कोण बाजी मारणार, याची उत्सुकता हुपरीइतकीच इचलकरंजी शहर व परिसरात दिसून आली.

रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणुकीवेळीही अशाच टोकाचा संघर्ष दिसून आला होता. त्यामध्ये आवाडे यांनी बाजी मारली होती. त्यातून आवाडे यांना मोठी राजकीय उभारी मिळाली होती. त्यामुळे हुपरी नगरपालिका निवडणूक कमालीची प्रतिष्ठेची बनली होती; मात्र रेंदाळ जिल्हा परिषद निवडणुकीतील आलेले अपयश भाजपने यावेळी धुऊन काढले.
हुपरी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारावर इचलकरंजीचाच प्रभाव राहिला. इचलकरंजी शहरातील ठप्प झालेला विकास आवाडे यांनी प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवत आमदार हाळवणकर यांना लक्ष्य केले होते. आमदार हाळवणकर यांनीही आवाडे यांच्यावर सडकून टीका केली होती. 

हुपरीतील चांदी उद्योगासह विविध विकासाचे प्रश्‍न यावर चर्चा होण्यापेक्षा इचलकरंजीतील राजकारणातील संघर्षाचीच चर्चा प्रचार सभांमधून दिसून आली. आवाडे यांच्या नेतृत्वाखालील कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडी आणि भाजप यांच्या प्रचार सभा इचलकरंजीतील वक्‍त्यांनीच गाजविल्या. इचलकरंजीतील अनेक राजकीय मंडळी दोन्ही बाजूंकडून प्रचारात सक्रिय होती. सर्व अर्थाने इचलकरंजीतून दोन्ही बाजूंनी ताकद लावली होती. त्यामुळे हुपरीप्रमाणे इचलकरंजीतील राजकारणाच्या दृष्टीने हुपरीची निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.

राजकीय संघर्षाची किनार
हुपरीतील स्थानिक नेते मंडळींपेक्षा माजी मंत्री आवाडे आणि  आमदार हाळवणकर यांनी हुपरी पालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. इचलकरंजीतील राजकीय संघर्षाची किनार हुपरी नगरपालिका निवडणुकीला होती. यामध्ये आमदार हाळवणकर यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री आवाडे यांना शह दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com