विक्री नाही जमली तर थेट तारण

विक्री नाही जमली तर थेट तारण

कोल्हापूर - चोरलेले सोने एक तर सराफाला, सामान्य विक्रेत्याला अगर ग्रामीण भागातील महिलांना विकायचे. ते नाही जमलं तर थेट सराफासह बॅंका, पतसंस्था, फायनान्स कंपनीत जाऊन तारण ठेवायचे. त्यावर मिळेल तेवढे कर्ज काढायचे आणि पसार व्हायचे, अशी पद्धत सध्या चेन स्नॅचरकडून अवलंबली जात आहे. चोरीचे सोने खरेदी करणाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी त्याला साक्षीदार करण्याला पोलिसांकडून पसंती दिली जात आहे.

बाजारात एक तोळे सोन्याचा सरासरी ३० हजार रुपये भाव आहे. याचा अभ्यास करून चोरटे आता चेन स्नॅचिंगकडे वळले आहेत.

मोटारसायकलवरून धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून न्यायचे, चोरलेले सोने ओळखीच्या सराफाकडे कमी किमतीला विकायचे; पण सराफ ओळखीचा नसेल तर तो सोन्याचे टंच बघतो. साहजिकच त्यावरील ट्रेडमार्कवरून ते कोठून खरेदी अगर बनवून घेतले, याची चौकशी करतो. 

संशय आला तर याची माहिती तो पोलिसांना देऊ शकतो. त्याच्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीमुळे सापडण्याचा धोका असतो, याचा विचार चोरट्यांकडून पोलिसांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन केला जात आहे. 

जुना राजवाडा पोलिसांनी तीन वर्षांपूर्वी कदमवाडीतील चेन स्नॅचरला ताब्यात घेतले. चौकशीत चोरट्याचा चाणाक्षपणा पुढे आला. त्याने चोरलेले सोने एका दही विक्रेत्या बाईला दिले. ‘माझ्या घरी बाळ आजारी आहे. तुटलेले सोने तुमचेच आहे, म्हणून सराफाला सांगा व  त्याची विक्री करा. त्यातून जेवढे पैसे मिळतील तेवढे मला आणून द्या. एक हजार रुपये तुम्हाला देतो,’ असे आमिष दाखवून चोरीच्या सोन्याची विक्री केली. असा हा धक्कादायक प्रकार पुढे आला. आजरा येथे वर्षभरापूर्वी एका करंवदे विक्री करणाऱ्या महिलेला कमी किमतीत सोन्याच्या बांगड्या घ्या, असे सांगून एक तरुण त्यांच्या मागे लागला होता. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्याच्याकडून चेन स्नॅचिंगसह चोरीचे अनेक गुन्हे उघड झाले.

मोरेवाडी कंदलगाव परिसरात गेल्या सहा महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणावर झालेल्या चेन स्नॅचिंगच्या तपासात चोरट्याने सोन्याची विक्री रस्त्यावर फुल  विकणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांना केल्याचे तपासात पुढे आले होते. अशा पद्धतीने सामान्य व्यक्ती, ग्रामीण महिलांना चोरलेल्या सोन्याची विक्री चोरट्यांकडून केली जात आहे. 

चोरीचे सोने खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना साक्षीदार करण्याकडेच पोलिसांचा कल आहे. फक्त राजारामपुरी पोलिसांनीच तीन सराफांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. चोरीच्या सोन्याची सहज विक्री होत नसेल तर ते थेट तारण ठेवतात. सराफाकडे गहाण ठेवता आले तर ठीक अन्यथा ते बॅंका, फायनान्स कंपनी अगर पतसंस्थेचा आधार घेतात. अत्यंत कमी कागदपत्रांच्या आधारे, कोणतेही पुरावे न घेता अनेक बॅंका, पतसंस्था अगर फायनान्स कंपनीमध्ये सोने तारण कर्ज सहजरीत्या मिळू शकते. याचा फायदा चोरट्यांकडून उठवला जातो. कारवाई झाली तर संबंधित बॅंक, फायनान्स कंपनी, पतसंस्था अडचणीत येते. 

चोरट्यांचे सीसीटीव्हीवर लक्ष 
चोरलेले सोने गहाण ठेवायचे असेल तर ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, त्यालाच चोरट्यांची पसंती असते. ज्या बॅंका, फायनान्स कंपन्या अगर पतसंस्थेत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत अशा ठिकाणीच चोरीचे सोने तारण असल्याची शक्‍यता अधिक असते. याबाबत पोलिसांकडून प्रबोधन करणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com