नाला परिसरात दोन हजार बांधकामे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

कोल्हापूर -  शहरातील नाल्याभोवती अनधिकृत बांधकामांचा विळखा दिवसेंदिवस तीव्र होत असून, विकास आराखड्यातील नाल्यांचा विचार करता दोन हजारांहून अधिक बांधकामे नाल्याच्या परिसरात असल्याचे चित्र आहे. अशा बांधकामांचा पूर्वी कधीही सर्व्हे झालेले नाही. पूररेषाही निश्‍चित नाही. त्यामुळे भविष्यात या परिसरात पावसाचे पाणी येऊन धोका अधिक वाढेल, अशीच चिन्हे आहेत.

कोल्हापूर -  शहरातील नाल्याभोवती अनधिकृत बांधकामांचा विळखा दिवसेंदिवस तीव्र होत असून, विकास आराखड्यातील नाल्यांचा विचार करता दोन हजारांहून अधिक बांधकामे नाल्याच्या परिसरात असल्याचे चित्र आहे. अशा बांधकामांचा पूर्वी कधीही सर्व्हे झालेले नाही. पूररेषाही निश्‍चित नाही. त्यामुळे भविष्यात या परिसरात पावसाचे पाणी येऊन धोका अधिक वाढेल, अशीच चिन्हे आहेत.

बापट कॅम्प, दुधाळी आणि जयंती हे मोठे नाले आहे. सोबत लाईन बाजारसह अन्य छोटे-मोठे असे बारा नाले थेट पंचगंगा नदीत मिसळतात. नाल्यापासून किमान नऊ मीटर आणि पंधरा मीटर अंतरापर्यंत बांधकामास मनाई आहे. नाल्यालगतच्या परिसरात अतिक्रमण केले, तर विचारते कुणी अशा मानसिकतेपोटी गॅरेजच्या शेडपासून स्वयंपाकाच्या खोलीपर्यंत बांधकाम झाले आहे. परिणामी नाल्याचे पात्र कमी झाले आहे.

काही ठिकाणी नाल्याचा मार्ग अडवून त्यावर क्राँक्रीट टाकले आहे. पूर्वी नैसर्गिक स्तोत्र होते, त्याची वाट रोखल्याने अतिवृष्टीच्या काळात पाण्याला फूग निर्माण होते, हे पाणी थेट घरात घुसले. दोन दिवसांपूर्वीच्या पावसाने शास्त्रीनगर, रेसिडन्सी कॉलनी, सम्राटनगर, म्हाडा कॉलनी, ॲस्टर आधार, रामानंदनगर, रायगड कॉलनी, देवकर पाणंद परिसर, राजोपाध्येनगर परिसरात पाणी घुसले. त्यास बांधकामे कारणीभूत आहेत. जयंती नाल्याचे पात्र सुतारवाड्यापासून ते हॉकी स्टेडियम आणि रामानंदनगर पाचगावपर्यंत पसरले आहे. नाल्याच्या भोवती अतिक्रमण झाले आहे.

दुधाळी आणि बापट कॅम्प नाल्याच्या परिसरात अशीच स्थिती आहे. पुरावेळी कदमवाडी ते कसबा बावडा रस्त्यावर पाणी येते, त्यास बांधकाम कारणीभूत आहे. रेडझोनचा विषय अनेकवेळा चर्चेत आला. १९९२ ला पूररेषा आहे तिच अद्याप कायम आहे. नंतर शहराचे मोठ्या प्रमाणावर विस्तारीकरण झाले असून, त्यात रेडेझोनमध्ये बांधकामे झाली. २००५ च्या महापुरानंतर बांधकामाची चर्चा झाली, मात्र आठ फुटांपासून पार्किंग उचलून बांधकामास परवानगी दिली गेली. खानविलकर पंपापासून ते उलपे मळ्यापर्यंत बांधकामे झालीत. दुधाळी नाल्याच्या लगतही अतिक्रमण झाले आहे. पंचगंगा नदीत मिसळणारे या नाल्याचे पात्रही आकसले आहे. 

पूररेषा निश्‍चित करणे गरजेचे
काळाच्या ओघात हद्दवाढ झाली नाही. मूळ विकास आराखड्याभोवतीच शहराची वाढ होत राहिली. अतिक्रमण अथवा अनधिकृत बांधकामांचा सोयीचा भाग कोणता, तर नाल्यालगतचा परिसर अशी मानसिकता होत गेली. प्रमुख तीन नाल्यांसह अन्य नाल्यांच्या हद्दीचा विचार करता ते सुमारे दोन ते अडीच हजार अनधिकृत बांधकामांचा विळखा पडला आहे. अतिवृष्टी झाल्यानंतर अशा बांधकामाची आठवण होते. उन्ह पडले की पुन्हा सुरळीत होते; मात्र पावसाने नाल्यालगतच्या बांधकामांचा सर्व्हे करून त्याची पूररेषा निश्‍चित करण्याची वेळ आली आहे. तसे न झाल्यास पुन्हा एका रात्रीत ऐंशी मिलिमीटर पावसाची नोंद होण्यास उशीर होणार नाही. 

तर कारवाई करणार : आयुक्त
 डी क्‍लासिफिकेशनुसार यापुढे बांधकामांना परवानगी देणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. दोन दिवसापूर्वी पाऊस झाला,त्यास ड्रेनेजच्या अडचणी, स्ट्रॉम वॉटरही कारणीभूत आहे. नाल्याकाठी रेडझोनमध्ये बांधकामे होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. डी क्‍लासिफिकेशनमध्ये बांधकामाच्या नियमांचा समावेश आहे. ज्या भागात अनधिकृत बांधकामे झाली असल्यास नागरिकांनी तक्रार करावी. त्यासंबंधी निश्‍चित कारवाई केली जाईल, असेही आयुक्त डॉ. चौधरी यांनी सांगितले.

Web Title: kolhapur news illegal building near to drain