बेटी हमारी बडा नाम करेगी !

राजेश मोरे
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - मुलगीच व्‍हावी हेच जन्मदात्या आई-बाबांचं स्वप्न होतं. त्यांचे स्वप्न साकार होण्याची संधी पहिल्याच वेळी मिळाली. त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं. स्वप्न साकार झाल्याचा आनंद लाखमोलाचा ठरला. मुलगीला कर्तृत्वसंपन्न बनवायचं हाच ध्यास घेऊन तिचे पालन केले. मुलगी आता काही महिन्यांतच ती डॉक्‍टर होईल. मोहिते कुटुंबाच्या वंशाची दीपज्योत म्हणून ती कर्तृत्व सिद्ध करणार आहे. 

कोल्हापूर - मुलगीच व्‍हावी हेच जन्मदात्या आई-बाबांचं स्वप्न होतं. त्यांचे स्वप्न साकार होण्याची संधी पहिल्याच वेळी मिळाली. त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं. स्वप्न साकार झाल्याचा आनंद लाखमोलाचा ठरला. मुलगीला कर्तृत्वसंपन्न बनवायचं हाच ध्यास घेऊन तिचे पालन केले. मुलगी आता काही महिन्यांतच ती डॉक्‍टर होईल. मोहिते कुटुंबाच्या वंशाची दीपज्योत म्हणून ती कर्तृत्व सिद्ध करणार आहे. 

येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते व त्यांच्या पत्नी नंदा यांनी २५ वर्षांपूर्वी वंशाचा दिवा म्हणून मुलगीच असावी, असं ठरवलं. 
त्यांचं स्वप्नही साकारलं. मुलगाच व्हावा याच्यासाठी अनेक दांपत्ये अनेक प्रकारच्या औषधोपचारासह काही वेळा अन्य टोकाच्या भूमिकेपर्यंत पोचतात. मनाजोगं नाही झालं की, नैराश्‍यग्रस्त होतात; पण सुजाण मोहिते कुटुंबाने मुलगी ‘नेहा’ हिचाच जन्म भाग्याचा मानला. आईचे दुसरं रूप म्हणून ते तिच्याकडे पाहतात. 
इंदापूर (ता. पुणे) गावातील सामान्य कुटुंबातील दिनकर मोहिते यांनी एमएस्सी पदवी घेतली. त्यानंतर स्पर्धा परीक्षेतून त्यांची पोलिस उपनिरीक्षक म्हणून १९८९ ला निवड झाली. त्यानंतर ते तीन वर्षे प्रशिक्षणासाठी गडचिरोलीला गेले. मोहिते यांची आई ‘कलावती’ आणि वडील ‘नामदेव’ हे दोघेही अल्पशिक्षित. गावाशेजारील पदवीधर मुलीशी ‘नंदा’ यांच्याशी दिनकर यांचा विवाह झाला. या दांपत्याने मुलगीच व्हावी हे स्वप्न मनाशी बाळगलं. त्यांना २१ ऑक्‍टोबर १९९५ ला मुलगी  झाली. ‘नेहा’ तिचं नाव. ती संपूर्ण मोहिते कुटुंबाची लाडकी बनली. मोहिते हे कुस्ती, ॲथलेटिक्‍स आणि कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू. पी. टी. उषा ही त्यांची आयडॉल. एकुलती एक मुलगी ‘नेहा’ ला पी. टी. उषाच बनवायचं स्वप्न  मोहिते दांपत्याने उराशी बाळगलं; पण नेहा खेळापेक्षा अभ्यासात अधिक हुशार. तिचा कल आई-वडिलांनी ओळखला. तिच्यावर कोणत्याच अपेक्षांचं ओझं नाही टाकायचं, तिला ज्याची आवड आहे तेच तिला करू द्यायचा निर्णय त्यांनी घेतला. पोलिस दलातील नोकरीमुळे मोहिते यांच्या वारंवार बदल्या झाल्या. तसे नेहाला कधी इंग्रजी, मराठी, सेमी इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण पूर्ण करावं लागलं. 
पोलिस निरीक्षक पदाच्या जबाबदारीमुळे मोहिते कामात व्यस्त असतात; पण त्यांच्या मुलगीचा - नेहाचा जेवण्याच्या वेळेला हमखास फोन येतो. ‘पप्पा येताय ना घरी, जेवायला आम्ही वाट पाहतोय’ हे तिचं ठरलेलं वाक्‍य असते. एखाद्या टेन्शनमध्ये पप्पांना ती पाहते. ते झोपेपर्यंत तिची घालमेल सुरू असते. लगेच दुसऱ्या दिवशी पप्पांना बोलतं करून टेन्शनचे कारण जाणण्याची तिच्याकडे कला आहे. आईकडे हट्ट करायचा; पण तिला आवडेल तीच भाजी घरात सर्वांनी खायची. घरी आल्याबरोबर पप्पांनी तिला व तिने पप्पांना सलाम करण्याची परंपरा सुरू केली. मूडमध्ये येण्यासाठी भन्नाट गाणे लावायचं. तिच्याबरोबर मनसोक्‍त नाचण्यात मोहितेंना खूप मज्जा येते. बारावीची परीक्षा नेहा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. त्यानंतर तिला इंजिनिअरिंग व मेडिकल हे दोन पर्यायही सहज उपलब्ध झाले. क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य तिला दिले. तिने मेडिकल क्षेत्राची निवड केली. सध्या ती एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात आहे. पुढे न्यूरो सर्जन होण्याची तिची इच्छा आहे. ती मोठी डॉक्‍टर व्हावी; पण तिने इंदापूरच्या मातीतील लोकांची किमान आठवड्यातून एक दिवस सेवा करावी एवढी अपेक्षा मोहिते कुटुंबाची तिच्याकडून आहे. ती अपेक्षा पूर्ण करण्याचे आश्‍वासनही तिने आई-पप्पांना दिले आहे. 

मुलगी असण्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तिला तिच्या आवडी- निवडी 
विकसित करण्यासाठी आम्ही प्रोत्साहन दिले. त्यामुळे ती आज वैद्यकीय शिक्षणापर्यंत यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. तीच आमच्या कुटुंबाचा भविष्यात आधार बनलेली असेल हा विश्‍वासच आम्हा कुटुंबीयांची जगण्याची उमेद वाढवतो. 

- सौ. नंदा मोहिते, (नेहाची आई).

भाग्यश्री योजना....
शासनाने एका मुलीवर अगर दोन मुलींवर कुटुंबनियोजन करणाऱ्यांसाठी भाग्यश्री योजना सुरू केली आहे. यात संबंधित मुलीच्या नावाने २१ हजारांची ठेव पावती केली जाते. तिने १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर अटींची पूर्तता केल्यानंतर तिला ती रक्कम दिली जाते. तसेच पालकांचाही सत्कार केला जातो, असे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून सांगण्यात आले.

 

Web Title: Kolhapur News International Day of the Girl Child special