खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक

खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक

इचलकरंजी - पैसेवान व्यक्तीला हेरून त्याचे अपहरण करायचे. ठार करण्याची धमकी देत, खंडणी उकळणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीला पकडण्यास पोलिसांना यश आले. ही कारवाई येथील स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या 
पथकाने केली. 

टोळीचा म्होरक्‍या गुंड्या ऊर्फ धीरज दिलीप सावर्डेकर (रा. सावर्डेकर कॉलनी, मुरगूड, ता. कागल) हा असून, त्यांच्यासह टोळीतील सात जणांच्या मुसक्‍या आवळल्या. टोळीकडून सहा हजार ४१० रुपयांसह दोन मोटारी, नऊ मोबाईल हॅंडसेट, तलवार, जांबिया, दोन बेस बॉल बॅट, सुताच्या दोऱ्या असा पाच लाख ७५ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी दिली. जयसिंगपूरचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, गडहिंग्लजचे पोलिस उपअधीक्षक अनिल कदम, पोलिस निरीक्षक उदय डुबल, स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अमोल माळी आदी उपस्थित होते. अटक केलेल्यांत टोळीप्रमुख गुंड्या ऊर्फ धीरज सावर्डेकरसह विकास वसंतराव निकम (मगदूम गल्ली, मुरगूड), अविनाश शिवाजी आडावकर (गणेश गल्ली, धामणे, ता. आजरा), सयाजी सुनील राऊत (सावर्डेकर कॉलनी, मुरगूड), पांडुरंग भिकाजी बोटे (रा. पिराची गल्ली, पिंपळगाव, ता. भुदरगड), इरफान गौस हावळे (म्हंकाळवाडा, महागाव, ता. गडहिंग्लज), योगेश ऊर्फ सोन्या जयराम भाईगडे (इंदिरानगर, उत्तूर, ता. आजरा) यांचा समावेश आहे. अन्य दोन जण फरारी आहेत.

टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक श्री. शिंदे, उपनिरीक्षक श्री. माळी यांच्यासह कॉन्स्टेबल महेश कोरे, वैभव दड्डीकर, रणजित पाटील, विजय तळसकर, ज्ञानेश्‍वर बांगर, उत्तम सडोलीकर, सागर पाटील, रवी कोळी, फिरोज बेग, महेश खोत, अमर शिरढोणे, अजिंक्‍य घाटगे, संदीप मळघणे आदींनी सहभाग घेतला. 

खंडणीसाठी शिक्षकांचे अपहरण
संजय मारुती घोडगे (रा. पिंपळगाव, ता. भुदरगड) शिक्षक असून, ते बड्याचीवाडी (ता. गडहिंग्लज) येथे अध्यापनाचे काम करीत आहेत. त्यांची गावातच गॅस एजन्सी आहे. २१ जूनला ते योग दिनानिमित्त सकाळी मोटारीने शाळेत जात होते. गुन्हेगार गुंड्या सावर्डेकरच्या टोळीने त्यांची मोटार अडवून शस्त्राचा धाक दाखवून त्यांचे अपहरण केले. टोळक्‍याने घोडगे यांच्याकडे २० लाखांची खंडणी मागितली. त्यांना दिवसभर फिरवून कोल्हापुरात जबरदस्तीने ९३ हजार रुपये हिसकावून घेतले. खंडणीच्या पैशांची जुळणी करून देतो, मला सोडा असे सांगितल्यानंतर टोळीने त्यांना कोठे वाच्यता केल्यास ठार करण्याची धमकी देत खंडणीच्या पैशांची मागणी करून सोडून दिले होते. 

घोडगेचा सहकारी ताब्यात
अपहृत घोडगे याला गॅस एजन्सीच्या गोदामासाठी त्याच्याच गावातील एकनाथ जगनाथ पोवार याने सात गुंठे जागा दिली होती. असे असताना त्याने आणखी ३३ लाखांची मागणी केली. त्यावरून घोडगेने त्याला २२ लाख रुपये दिले. तरीही पोवारने आणखी पैशांसाठी गुंड्या ऊर्फ धीरज सावर्डेकरच्या टोळीला पैसेवसुलीची सुपारी दिल्याचे उघड झाले. त्यावरून पोवारला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले.

बेळगाव जिल्ह्यात गुन्हा झाला उघड
गुन्हेगार गुंड्या ऊर्फ धीरज सावर्डेकरच्या टोळीने सदलगा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे एकाचे अपहरण करून त्याला मारहाण करीत लाखो रुपयांची खंडणी उकळल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com