क्षणात कचरा फस्त करणारा ‘जटायू’.....

कोल्हापूर - येथे कचरा उठावाचे जटायू यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवताना.
कोल्हापूर - येथे कचरा उठावाचे जटायू यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवताना.

कोल्हापूर - दगड आणि विटा सोडून कसलाही कचरा एका क्षणात उचलणाऱ्या ‘जटायू’ने आज कचरा बघता बघता उचलून दाखवून स्वच्छतेच्या नव्या तंत्राचा साक्षात्कार जिल्ह्यात ठिकठिकाणी दाखवला.

झाडू नाही, खराटा नाही, खोरे नाही, बुट्टी नाही, असे कोणतेही साधन न घेता केवळ मोठ्या ताकदीने कचरा शोधून (ओढून) घेऊन अवघ्या तीस मिनिटांत ट्रॉलीभर सुकाच नव्हे, तर ओलाही कचरा उचलून दाखवला. अभिषेक शेलार या ‘आयआयटी’ व ‘पवई’मधील एका विद्यार्थी तंत्रज्ञाने तयार केलेल्या उपकरणाने आज जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रात्यक्षिकांसह कचरा उठाव करून दाखवला.

आयआयटीतील प्रत्येक संशोधन वेगवेगळ्या क्षेत्रात मोलाचेच असते; पण अभिषेक याने ग्रास रुटपर्यंत आपल्या संशोधनाचा उपयोग व्हावा व कचऱ्यासारख्या ज्वलंत प्रश्‍नात उपाययोजना म्हणून थेट हातभार लागावा, या हेतूने त्याने हे उपकरण तयार केले.

छोट्या टेंपोत बसू शकणाऱ्या या उपकरणाला ‘जटायू’ हे नाव दिले. जटायू हा गिधाड पक्षी. निसर्गास गिधाडाला पर्यावरणरक्षक मानले जाते. मेलेल्या जनावरांच्या मासांसारख्या अतिशय हानिकारक कचऱ्याची विल्हेवाट केवळ गिधाडामार्फतच लागली जाते. या उपकरणात कचरा खेचून घेण्याची मोठी ताकद आहे. कचऱ्यातील विटा, दगड सोडून बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, थर्मोकोल, कागदी बॉक्‍स अगदी सहज खेचून घेतले जाते. व्हॅक्‍युम क्‍लिनरच्या तंत्राप्रमाणे छोट्या-छोट्या बॅगमध्ये काही मिनिटांत हा कचरा जमा होतो. 

हा कचरा ट्रॅक्‍टर ट्रॉली किंवा डंपरमध्ये भरता येतो. विशेष हे की भाजी बाजारातील कचरा उचलणे हे सफाई कामगारांच्या दृष्टीने खूप त्रासदायक काम असते. कारण हा कचरा ओला असतो. जमिनीला चिकटलेला असतो. त्याचा वासही उग्र असतो. त्यामुळे तो उचलताना त्रास होतो आणि हा कचरा तसाच पडून राहिला, तर सडू लागतो व त्याचा वास सुटतो.‘जटायू’ हे उपकरण हा भाजी मार्केटमधला कचराही सहज उचलू शकते. आज कोल्हापुरात कृषी उत्पन्न बाजार समिती, कागल, मुरगूड, वडगाव, पन्हाळा, कुरुंदवाड, जयसिंगपूर येथे मार्कोलाईन कंपनीतर्फे उपकरणाची प्रत्यक्ष कचऱ्याच्या कोंडाळ्याच्या ठिकाणी प्रात्यक्षिके दाखवली. स्पृसअप कंपनीने या उपकरणाची निर्मिती केली. छोट्या खेड्यात किंवा मोठ्या-मोठ्या नगरपरिषद असलेल्या गावात हे उपकरण स्वच्छतेची मोठी जबाबदारी पेलेल, असा दावा आज सुमेध भोज, सुनील पोवार व राजू भोसले यांनी ‘सकाळ‘शी बोलताना केला.

प्रात्यक्षिक कोठेही दाखवण्याची तयारी
कचरा हा सर्व गावातला, शहरातला मोठा प्रॉब्लेम आहे; पण असे नागरी सुविधांशी निगडित प्रश्‍न सुटावेत म्हणूनच अभिषेक शेलार यांनी या उपकरणाची निर्मिती केल्याचे सुमेध भोज यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘कचरा उठावावर लवकर उपाययोजना झाली, तर त्याचा डोंगर होणार हे नक्की आहे; पण जटायू हे असे उपकरण आहे की ते हा गंभीर प्रश्‍न सोडवण्यासाठी एक उत्तर आहे आणि त्याचे प्रात्यक्षिक कोठेही दाखवण्याची तयारी आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com