जोतिबा नगरप्रदक्षिणेत हजारो भाविक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी तथा जोतिबाचा डोंगर (ता. पन्हाळा) येथे दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचा नगरप्रदक्षिणा (दिंडी) सोहळा भक्तिमय व मंगलमय वातावरणात झाला. या सोहळ्यासाठी राज्यभरातून एक लाख भाविक आले. त्यांनी संपूर्ण जोतिबा डोंगरासभोवती अनवाणी पायाने प्रदक्षिणा पूर्ण केली. काल नारळी पौर्णिमा व चंद्रग्रहण असल्याने डोंगरावर गर्दीचा उच्चांक झाला. वीणा, टाळ, मृदंग, ढोल, शंख तसेच भजनाच्या गजरात या दिंडीत मोठी रंगत आली.

काल सकाळी दिंडीतील सर्व सहभागी भाविकांनी ‘श्री’चे दर्शन घेतले अन्‌ नगरप्रदक्षिणेस मुख्य मंदिरातून प्रारंभ झाला. सकाळी नऊ वाजता दिंडी दक्षिण दरवाजातून पायरी रस्त्याने गायमुख तलाव या ठिकाणी आली. तेथे श्री शैल्य मल्लिकार्जुन तीर्थाचे दर्शन भाविकांनी घेतले. त्यानंतर हनुमान देव व पुढकर तीर्थांचे दर्शन घेऊन दिंडी सोहळा गज गतीने कोल्हापूर-जोतिबा मार्गावरील भीमाशंकर तीर्थाच्या परिसरात आला. या ठिकाणी धुपारती सोहळा झाला. तेथून नगरप्रदक्षिणा नंदीवन, आंबावन, पांढरवन, नागझरी, मंडोकतीर्थ, व्यार्धतीर्थ चोपडाईदेवीचा आंबा तसेच परिसरातील अष्ट तीर्थांचे दर्शन घेऊन तो मुरगुळा या ठिकाणी आला. 

तेथून दिंडी सोहळा दानेवाडी (समनाची वाडी) गावामार्गे ‘सरकाळा’ या ठिकाणी आला. तेथे सर्व धार्मिक विधी झाले. तेथून ती गिरोली (ता. पन्हाळा) येथे येऊन या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्री निनाईदेवी मंदिरात (त्र्यंबकेश्‍वर) भाविकांनी दर्शन घेतले. सर्व सोहळा पोहाळे तर्फ आळते, येथील ऐतिहासिक पांडव लेण्यात आला व तेथे असणाऱ्या ‘औंढ्या नागनाथ’ यांचे दर्शन घेतले. त्यानंतर नगरप्रदक्षिणा सोहळा पुन्हा गायमुख तलावमार्गे जोतिबा मंदिरात गेला व भाविकांनी दर्शन घेतले. पुन्हा तो मूळमाया श्री यमाईदेवी मंदिरात गेला. सर्व भाविकांनी मंदिरासभोवती प्रदक्षिणा काढली व सुंटवडा वाटपाने सायंकाळी या सोहळ्याची  सांगता झाली.

फराळाचे वाटप
कोल्हापुरातील सहजसेवा ट्रस्टने दिंडीतील सर्व सहभागी भाविकांना शाबू खिचडी व चहा हा फराळ वाटला. कुंडल (ता. पन्हाळा) ते जोतिबा डोंगरापर्यंत ४० ग्रामस्थ चालत डोंगरावर दिंडीसाठी आले. दिंडी मार्गावर सुशांत चव्हाण, नवनाथ पोवार भाटमरळी (सातारा), आप्पा फडतारे (खटाव), जोतिबा ग्रामस्थ, गिरोली ग्रामस्थ, विलास पाटील (वरणगे-पाडळी) यांनी फराळ, चहा, केळी वाटप केले.