कागल पालिका सभेत जळीतकांडावरून हमरीतुमरी

वि. म. बोते
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

कागल - कागल नगरपालिकेच्या इमारत जळीत कांडानंतर प्रथमच बोलाविण्यात आलेली विशेष सभेत सत्ताधारी व विरोधकांत हमरीतुमरी झाली. जळीतकांडाच्या पार्श्‍वभूमीवर मोठा राजकीय भडका या सभेत उडाला. अखेर पोलीसांना पाचारण करावे लागले.

कागल - कागल नगरपालिकेच्या इमारत जळीतकांडानंतर प्रथमच बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेत सत्ताधारी व विरोधकांत हमरीतुमरी झाली. जळीतकांडाच्या पार्श्‍वभूमीवर मोठा राजकीय भडका या सभेत उडाला. अखेर पोलीसांना पाचारण करावे लागले. शाहू नगरवाचनालयात ही सभा पार पडली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माणिक माळी होत्या. 

नगरपालिकेस लागलेल्या आगीच्या पार्श्‍वभुमीवर ही सभा बोलविण्यात आलेली होती. सभेतील सर्व नऊही विषय इमारत जळीतासंबंधीच होते. यावेळी विरोधकांनी कडाडून विरोध केला. मात्र सत्ताधाऱ्यांनी सर्व विषय बहुमताने मंजुर केले. यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष नितीन दिंडे व मुख्याधिकारी टिना गवळी यांची उपस्थिती होती. 

पालिका इमारतीस लागलेल्या भीषण आगीची सीआयडी मार्फत कसून चौकशी व्हावी, बांधकाम अभियंत्यांच्या एफआयआरची प्रत जोडून मुदतवाढ प्रस्ताव पाठविण्यात यावा, मंजुरीनंतरच काम करण्यात यावे, दोषीकडून व्याजासह नुकसान भरपाई मंजूर व्हावी, इमारतीचे स्ट्रक्‍चरल ऑडीट करुन खर्चाचे अंदाजपत्रक तयार करावे, नुकसानीच्या खर्चाचा अजेंड्यावर उल्लेख नाही, मोघम स्वरूपातील व विना अंदाजपत्रिकाची रक्‍कम मंजूर करणे बेकायदेशीर आहे. प्रशासनाकडून नुकसानीच्या खर्चाची रक्‍कम कौन्सिल समोर आल्यानंतर खर्चाचा विषय मंजुरीस घ्यावा तो पर्यंत हा विषय स्थगित ठेवावा, अन्यथा या कामी बेहिशोबी अवाजवी रक्‍कम खर्च होण्याची शक्‍यता आहे, झालेल्या नुकसानी संदर्भात कमिटी नेमण्यात यावी. आदी मागण्यांचे निवेदन सभेच्या सुरुवातीस विरोधकांकडून नगराध्यक्षांना देण्यासाठी भाजप पक्षप्रतोद विशाल पाटील व्यासपीठासमोर गेले. यावेळी वादाला तोंड फुटले. सत्ताधारी पक्षाचे पक्षप्रतोद प्रविण काळबर व विशाल पाटील यांच्यात हमरीतुमरी झाली. ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले.  चंद्रकांत गवळी यांनी समझोता करण्याचा प्रयत्न केला. मात्र वातावरण चांगलेच तापल्याने कोणीही कोणाचे ऐकण्याच्या अवस्थेत नव्हते.

सभेच्या कामकाजाला गोंधळातच सुरुवात झाली. परिस्थिती पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आले. विषय पत्रिकेवर, जळीत दुर्घटनेसंदर्भात उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करावी, विकास कामाचा निधी खर्च करणेस मुदतवाढ मिळावी, नुकसानीसाठी आकस्मिक निधी मिळावा, इमारतीचे स्ट्रक्‍चरल ऑडीट करुन नुकसानीचे अंदाजपत्रक तयार करावे, खबरदारी आवश्‍यक उपाय योजना करणे, कामकाज कन्याशाळेत स्थलांतरीत करणे आदी ठेवण्यात आलेले होते. सत्ताधारी गटाने विरोधकांचे आरोप फेटाळत त्यांच्या काही गंभीर विधानांचा जोरदार निषेध केला.

पालिका इमारत आगीसंदर्भात केलेले गंभीर आरोप विशाल पाटील यांनी मागे घ्यावेत, अशी मागणी प्रविण काळबर यांनी लावून धरली व माफी मागीतल्याशिवाय सभेचे कामकाज चालू न करण्याची सूचना त्यांनी केली. नगराध्यक्षा माणिक माळी यांनी आपल्या अधिकारात प्रशासनाच्या मदतीने कामे पूर्ण करुन घ्यावीत असा आग्रह सत्ताधारी गटाने धरला. सुरेश पाटील यांनी मध्यस्थाची भूमिका बजावली केली. 

दरम्यान, सत्ताधारी नगरसेवकांकडून कागल पोलिस निरीक्षकांकडे निवेदन देण्यात आले, त्यामध्ये भाजप नगरसेवकांनीच सुपारी देऊन हे कृत्य घडवून आणले आहे, अशी आमची खात्री आहे. तपासात राजकारण न आणता नि:पक्षपातीपणे तपास करावा व आरोपीस कठोर शासन करावे. भाजपचे नगरसेवक आरोपी शोधण्यास मदत करण्यापेक्षा राजकारण करुन बेताल व चुकीचे आरोप राष्ट्रवादी नगरसेवकांवर करीत आहेत, असे निवेदनात नमूद आहे.