कागलमध्ये संजय घाटगे एकाकी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

कोल्हापूर  - जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ अशी ओळख असलेल्या कागलमध्ये माजी खासदार (कै.) सदाशिवराव मंडलिक व आमदार हसन मुश्रीफ यांच्यातील मनोमिलनाने माजी आमदार संजय घाटगे यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. या घडामोडीच्या माध्यमातून श्री. मुश्रीफ यांनीही एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. तालुक्‍यात संजयबाबा यांना शह देतानाच लोकसभेत प्रा. मंडलिक हेच आपले उमेदवार असतील, असा संदेशही श्री. मुश्रीफ यांनी दिला आहे. 

कोल्हापूर  - जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ अशी ओळख असलेल्या कागलमध्ये माजी खासदार (कै.) सदाशिवराव मंडलिक व आमदार हसन मुश्रीफ यांच्यातील मनोमिलनाने माजी आमदार संजय घाटगे यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. या घडामोडीच्या माध्यमातून श्री. मुश्रीफ यांनीही एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. तालुक्‍यात संजयबाबा यांना शह देतानाच लोकसभेत प्रा. मंडलिक हेच आपले उमेदवार असतील, असा संदेशही श्री. मुश्रीफ यांनी दिला आहे. 

(कै.) मंडलिक-मुश्रीफ या गुरू-शिष्यात जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदावरून 2007 साली तीव्र मतभेद झाले. त्यानंतर झालेल्या 2009 व 2014 च्या विधानसभा निवडणुकीत श्री. मुश्रीफ यांच्या पराभवासाठी मंडलिक गटाने मोठी ताकद लावली; पण त्यांच्यासोबत "शाहू-कागल'चे संस्थापक विक्रमसिंह घाटगे ठाम राहिल्याने त्यांचा विजय सुकर झाला. 2014 च्या निवडणुकीत अगदी काठावर श्री. मुश्रीफ पास झाले. या दोन्ही निवडणुकीत मंडलिक व संजयबाबा गट विरोधात होते; पण राजे गट सोबत असल्याने श्री. मुश्रीफ यांच्यासमोर फारशी अडचण राहिली नाही. 

आगामी 2019 च्या निवडणुकीत मात्र त्यांना संजयबाबा यांच्यासह गेल्या दोन निवडणुकीत बरोबर असलेल्या राजे गटाशी सामना करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत तालुक्‍यातील एक गट आपल्यासोबत असावा, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मंडलिक कारखान्याच्या निवडणुकीत ही संधी श्री. मुश्रीफ यांना मिळाली. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक हे पक्षापासून दुरावलेले आहेत. त्यांच्या विजयासाठी हाडाची काडे करूनही ते आपल्याला दाद देत नाहीत, हा राग श्री. मुश्रीफ यांना आहे. म्हणून त्यांच्याविरोधात पुढील निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार हे प्रा. मंडलिक असावेत, अशीही खेळी त्यांच्याकडून सुरू आहे. प्रा. मंडलिक हे सद्यःस्थितीत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आहेत. लगेच पक्ष सोडून राष्ट्रवादीत जाणे त्यांच्यादृष्टीने अडचणीचे आहे; पण प्रयत्न करत राहावे, या उद्देशाने श्री. मुश्रीफ यांनी कारखाना निवडणुकीत सर्वांत अगोदर त्यांना पाठिंबा दिला. यामागे संजयबाबा यांना शह देऊन लोकसभेत प्रा. मंडलिक यांना उभे करून विधानसभेत त्यांचा पाठिंबा आपल्याला मिळवण्याची खेळी आहे. 

या तालुक्‍यात पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला मोठे महत्त्व आहे. दोन निवडणुकीत सोबत असलेला राजे गट पुढील निवडणुकीत त्यांच्या विरोधात नक्की असणार आहे. कदाचित या गटाचे सेनापती "म्हाडा'चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हेच त्यांच्या विरोधात उभे राहण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेचे उमेदवार म्हणून संजयबाबा हेच असतील. राजे गट व संजयबाबा गट एकत्र कधीच येऊ शकत नाही, हा इतिहास आहे. अशा परिस्थितीत मंडलिक गट आपल्यासोबत असावा, यासाठी श्री. मुश्रीफ यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना पहिल्या टप्प्यात तरी यश आले आहे. विधानसभा व लोकसभा एकत्रित होण्याची शक्‍यता आहे. त्याला अजून दोन वर्षाचा कालावधी आहे. या दरम्यान अजून किती पाणी पुलाखालून जाणार त्यावर या सर्व घडामोडी अवलंबून आहेत. मात्र, सद्यःस्थितीत तालुक्‍याच्या राजकारणात संजयबाबा एकाकी पडले आहेत, एवढे मात्र निश्‍चित.