डॉ. जब्बार पटेल यांना प्राचार्य कणबरकर पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य आर. के. कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक जब्बार पटेल यांना जाहीर झाला. १३ एप्रिलला दुपारी चार वाजता भाषा भवनात हा  पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी घोषणा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केली. 

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य आर. के. कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक जब्बार पटेल यांना जाहीर झाला. १३ एप्रिलला दुपारी चार वाजता भाषा भवनात हा  पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी घोषणा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केली. 

माजी कुलगुरू प्राचार्य रा. कृ. कणबरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारनिर्मितीसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी २५ लाखांची ठेव विद्यापीठाला दिली आहे. शालिनी कणबरकर यांच्यासमवेत झालेल्या करारातून माजी कुलगुरूंच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कारा’ची संयुक्त निर्मिती केली. एक लाख ५१ हजार, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रथम पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. सी. एन. आर. राव यांना, तर गतवर्षी रयत शिक्षण संस्थेला या पुरस्काराने गौरविल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

‘डॉ. पटेल यांच्या योगदानाची दखल’
शोध समितीचे सदस्य डॉ. जे. एफ. पाटील म्हणाले, ‘‘डॉ. जब्बार पटेल यांच्या नाट्य-चित्रपट क्षेत्रातील योगदानाची आणि त्या माध्यमातून समाजासाठी केलेल्या सेवेची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी एकमताने निवड केली.’’ या वेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शोध समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. बी. ए. खोत, डॉ. भालबा विभूते, डॉ. एन. व्ही. चिटणीस, उपकुलसचिव विलास सोयम उपस्थित होते.

डॉ. जब्बार पटेल यांच्याविषयी...
पंढरपूर येथे २३ जून १९४२ रोजी जन्मलेल्या डॉ. जब्बार पटेल यांची सर्जनशील दिग्दर्शक ओळख आहे. घाशीराम कोतवाल, तीन पैशांचा तमाशा, अशी पाखरे येती यांसारख्या अजरामर नाटकांद्वारे जब्बार पटेल यांनी मराठी नाट्यसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेले. उत्तम अभिनेते, निर्माते आणि प्रयोगशील दिग्दर्शक अशा बहुआयामी कर्तृत्वाच्या डॉ. पटेल  यांचे मराठी रंगभूमीच्या वाटचालीत अतुलनीय योगदान आहे. सामना, सिंहासन, जैत रे जैत, मुक्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण ः बखर एका वादळाची असे संस्मरणीय चित्रपट पटेल यांनी दिग्दर्शित केले आहेत. डॉ. पटेल यांनी थिएटर ॲकॅडमी नावाच्या प्रायोगिक नाट्यसंस्थेची स्थापना केली आहे. कुसुमाग्रजांवरील लघुपटासह इंडियन थिएटर, लक्ष्मण जोशी, मी एस. एम. असे काही महत्त्वाचे लघुपट आहेत.

 

Web Title: Kolhapur News Kanbarkar award to Dr Jabbar Patel