‘केडीसीसी’चे कोल्हापूर जिल्ह्याबाहेर कर्ज

‘केडीसीसी’चे कोल्हापूर जिल्ह्याबाहेर कर्ज

कोल्हापूर - जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने कर्ज वाटपाच्या मर्यादेची कक्षा रुंदावताना सोलापूर व बेळगाव जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनाही यावर्षीपासून कर्ज वाटप सुरू केले. गेल्यावर्षी केवळ ६ साखर कारखाने बॅंकेचे कर्जदार होते, यावर्षी यात ८ साखर कारखान्यांची भर पडली. त्यात सोलापूर जिल्ह्यातील तीन व बेळगावच्या एका कारखान्याचा समावेश आहे. 

मार्च २०१८ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात बॅंकेने सहा हजार कोटींच्या ठेवी, शंभर कोटी रुपये नफा व प्रतिकर्मचारी व्यवसाय वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले, हे उद्दिष्ट पूर्ण झाले तर कर्मचाऱ्यांना बोनस व संस्थांचा लाभांश दहा टक्‍क्‍यांपर्यंत देण्याचे जाहीर केले. उद्दिष्ट गाठण्यासाठी बॅंकेचा व्यवसाय वाढवणे महत्त्वाचे आहे, त्यातूनच पहिल्या टप्प्यात कोल्हापूरबरोबरच आजूबाजूच्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना कर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला यावर्षीपासूनच चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात सहकारी व खासगी मिळून २३ कारखाने आहेत. या कारखान्यांनी सर्व ऊस बिले जिल्हा बॅंकेमार्फतच विकास सोसायटी व तेथून शेतकऱ्यांना वाटप केली जातात. या व्यवहारात बॅंकेला फारसा फायदा नाही; पण त्याचवेळी बहुतांशी कारखाने हे जिल्हा बॅंकेचे कर्जदारच नाहीत. कारखान्यांना बिले वाटपासाठी जिल्हा बॅंक पाहिजे असेल तर कर्जासाठी ही बॅंक का नको?, असा सवाल कर्मचारी संघटनेनेही उपस्थित केला होता. गेल्या वर्षीपर्यंत जिल्ह्यातील केवळ सहाच कारखान्यांना बॅंकेचा कर्जपुरवठा होता. यावर्षीपासून मात्र जिल्ह्याबाहेरील कारखान्यांना कर्ज देण्याच्या घेतलेल्या निर्णयालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील तीन व बेळगाव जिल्ह्यातील हिरण्यकेशी कारखान्याला कर्जपुरवठा सुरू झाला. सोलापूर व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सहकार्याने हा कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. मूळ कर्ज पुरवणाऱ्या बॅंका त्या जिल्ह्यातील असतील, प्रत्यक्षात पैसे कोल्हापूर जिल्हा बॅंक देणार आहे. सोलापूर जिल्हा बॅंकेचा या कर्जातील वाटा ५ टक्के तर कोल्हापूर जिल्हा बॅंकेचा वाटा ९५ टक्के असणार आहे. बेळगाव जिल्ह्यात हिरण्यकेशीला कोल्हापूर जिल्हा बॅंकेने ६० टक्के कर्जपुरवठा केला. या कर्जाच्या प्रमाणात त्या कारखान्याची साखर तारण असणार आहे. पैशाची परतफेडही याच प्रमाणात त्या कारखान्यांना करावी लागणार आहे. 

संचालकांचे कारखाने नाहीत
जिल्हा बॅंकेचे संचालक असलेल्यांपैकी प्रा. संजय मंडलिक व राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे कारखाने जिल्हा बॅंकेकडे कर्जदार नाहीत. जिल्ह्यातील इतर बहुतांशी कारखान्यांनी राज्य बॅंकेकडून कर्ज घेतले आहे. किमान जिल्हा बॅंकेच्या संचालकांनी तरी बॅंकेकडून आपल्या कारखान्यांसाठी कर्ज घ्यावे, अशी अपेक्षा आहे.

बॅंकेचे कर्जदार कारखाने 
* कोल्हापूर : राजाराम-बावडा, बिद्री-कागल, भोगावती-परिते, आजरा-गवसे, वारणा, ब्रिक्‍स-गडहिंग्लज, घोरपडे-कापशी, फराळे-राधानगरी, न्युट्रियंटस्‌-दौलत
* बेळगाव : हिरण्यकेशी 
* सोलापूर : विठ्ठल, लोकनेते व सिद्धनाथ

खासदार महाडिक जिल्हा बॅंकेत
राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हा बॅंकेला अचानक भेट दिली. त्यांना बॅंकेत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या; पण प्रत्यक्षात ते साखर कारखान्याच्या कर्ज पुरवठ्याची माहिती घेण्यासाठी आले होते. श्री. महाडिक हे सोलापूर जिल्ह्यातील भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत, या कारखान्याच्या कर्जासंबंधी चौकशी करण्यासाठी ते बॅंकेत आले होते.

१५०० कोटींची तरतूद
यावर्षी साखर कारखान्यांसाठी जिल्हा बॅंकेने १५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यापैकी ८५० कोटी रुपयांचे कर्जवाटप आतापर्यंत झाले. मार्च २०१८ पर्यंत उर्वरित कर्जाची उचल होईल. वार्षिक १०.९५ टक्के व्याजदराने हे कर्ज दिले जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com