शेट्टी-खोत वादामागे वर्चस्ववाद 

शेट्टी-खोत वादामागे वर्चस्ववाद 

कोल्हापूर - कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या वादामागे वर्चस्ववाद हे मुख्य कारण आहे. प्रभाव क्षेत्रात आपली ताकद किती?, हेही दाखवण्याचा प्रयत्न या दोघांकडून सुरू आहे. या वादाला कालच्या घटनेने जातीचीही किनार मिळाल्याचे श्री. खोत यांचे पुत्र सागर यांनी फेसबुकवर टाकलेल्या एका "पोस्ट' मुळे स्पष्ट झाले. 

एखाद्या संघटनेत फूट पाडल्याशिवाय त्यांची ताकद कमी करता येत नाही, हे सरकारनेही ओळखले. त्यातून या दोघांत भांडण लावण्यात सरकारही यशस्वी झाले. श्री. खोत यांच्या रूपाने एक शेतकरी नेता आपल्याला मिळाला तर श्री. शेट्टी यांना शह देण्याचाही यातून सरकारचा प्रयत्न यशस्वी झाला.

पुर्वी शेतकरी संघटनेचे संस्थापक कै. शरद जोशी यांना त्यावेळी भाजपने आपलेसे केले, म्हणून श्री. शेट्टी यांनी श्री. जोशी यांची संघटना सोडली आणि "स्वाभिमानी' ची स्थापना केली, पण हेच शेट्टी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या आश्रयाला गेले. 

राज्यात आणि देशात भाजपचे सरकार आल्यानंतर मित्र पक्षांना काहीतरी देण्याचे आश्‍वासन भाजप नेतृत्त्वाने दिले. पण राज्यात आणि देशात पूर्ण बहुमत मिळाल्याने शिवसेनेसारख्या 25 वर्षे सोबत असलेल्या पक्षाची भाजपने फरपट केली, मग "स्वाभिमानी' सारख्या पक्षांची अवस्था विचारायला नको अशीच होती. सत्ता आल्यानंतर पहिले वर्षभर मित्र पक्षांना खेळवणाऱ्या भाजपकडे "स्वाभिमानी' ने मंत्री पदासाठी हट्ट धरायला सुरूवात केली. त्यात केंद्रात मंत्रीपद मिळेल अशी आशा श्री. शेट्टी यांना होती. पण ते शक्‍य नसल्याने राज्यात काहीतरी पदरात पडावे म्हणून पहिल्यांदा रविकांत तुपकर यांना महामंडळाचे अध्यक्षपद देण्याची मागणी श्री. शेट्टी यांनी केली. त्याचवेळी शेट्टी-खोत यांच्यात फारसे सख्य नसल्याचे सरकारच्या लक्षात आले. तोपर्यंत श्री. खोत यांचीही मंत्रीपदाची इच्छा लपून राहीली नव्हती. भाजपने श्री. खोत यांना मंत्रीपद देऊन भाजपने पहिली "गेम' खेळत या वादात ठिणगी टाकली. हे करताना श्री. खोत यांना भाजपच्या कोट्यातून आमदारकी देऊन त्यांच्या पायात बेड्या टाकल्या. 

श्री.खोत यांच्या मंत्रीपदानंतर श्री.शेट्टी यांच्या भाजपाविरोधातील रागात भर पडली. त्यातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करायला सुरूवात केली. यासाठी त्यांना ज्यांच्याविरोधात पंधरा वर्षे संघर्ष केला, त्या दोन्ही कॉंग्रेसच्या वळचणीला जाण्याची वेळ आली. तोपर्यंत इकडे श्री. खोत हे कधीच भाजपवासी झाले. शेतकरी नेता सोबत हवा म्हणून भाजपनेही श्री. खोत यांना वेळोवेळी बळ दिले. 

श्री. खोत यांचे पुत्र सागर यांनी फेसबूकवर "सुरूवात शेट्टींनी केली, आम्ही त्याचा शेवट करू - एक मराठा लाख मराठा' अशी पोस्ट करून या वादाला जातीय रंग असल्याचे स्पष्ट केले. तसे गेल्या विधानसभा निवडणुकीतच या वादाची झलक शिरोळ मतदार संघात पहायला मिळाली होती. संघटनेचे त्यावेळचे शिलेदार असलेल्या उल्हास पाटील यांना डावलून सावकर मादनाईक यांना संघटनेने उमेदवारी दिल्यानंतर काय घडले आणि श्री. पाटील यांचा विजय कसा झाला हा सगळा इतिहात तपासला तर त्यातून स्पष्ट होईल. 

वादात शेतकरी जातोय भरडला 
वर्षभरात लोकसभेच्या आणि विधानसभेच्याही निवडणुका लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकरी प्रती असलेले आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी हा वर्चस्ववाद सुरू आहे. ज्या माढा लोकसभा मतदार संघात श्री. खोत यांच्या वाहनांवर दगडफेक झाली, त्या परिसरात जैन लोकसंख्या कमी आहे. पण मंत्रीपदानंतर श्री. खोत यांची शेतकऱ्यांप्रती असलेली भाषा, आक्रमकपणा कमी झाला हे मान्य करावे लागले. त्याची प्रचिती माढ्यात झाली. मात्र त्याला वर्चस्ववादासाठी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. यातून या दोघांचे राजकीय काय होणार हे काळ ठरवेल मात्र शेतकरी भरडला जातो एवढे मात्र निश्‍चित. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com