रस्त्यांसाठी ७ कोटींचा निधी दिल्याने नाराजी

रस्त्यांसाठी ७ कोटींचा निधी दिल्याने नाराजी

कोल्हापूर - जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते नसल्याने अनेक गावांतील एसटीची सेवा बंद झाली आहे. रस्त्यांसाठी किमान ४० कोटींचा निधी अपेक्षित असताना केवळ ७ कोटींचा निधी दिल्याने रस्त्यांची आणखी चाळण होणार असल्याची खंत आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके व आमदार प्रकाश आबिटकर यांनी महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे व्यक्त केली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ३६४ कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री पाटील होते. 

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था खूपच बिकट आहे. माझ्यासोबत कागल तालुक्‍यातील रस्ते पाहणीचा दौरा काढा. तुम्हाला ते सर्व रस्ते दाखवतो. यासाठी जास्तीत जास्त निधी देणे अपेक्षित आहे. 

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘‘राधानगरी तालुक्‍यात रस्ते नसल्याने अनेक गावांतील एसटी सेवा बंद झाली आहे. बस सेवा बंद झाल्याने लोकांना शहरात येता येत नाही. याची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यांसाठी जास्तीत जास्त निधी दिला पाहिजे. जो निधी दिला जाणार आहे, तो तुटपुंजा आहे. यातून कोणताही रस्ता सक्षमपणे करता येणार नाही.’’ 

आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, ‘‘रस्ते करण्याची जबाबदारी दुसऱ्यांवर देता; पण मतदारसंघातील एखादा रस्ता खराब झाला तर त्याची बातमी व फोटो आमच्या नावाने प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे रस्त्यांसाठी जास्तीत जास्त निधी दिला पाहिजे.’’  

याला उत्तर देताना पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘गेल्यावर्षी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ३२६ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मिळाला होता. यापैकी ३१९ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे. यावर्षी जिल्हा वार्षिक योजनेंअंतर्गत ३६४ कोटींचा आराखडा मंजूर झाला आहे. यामध्ये नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत सुमारे ११ कोटींचा निधी मिळाला आहे. यावर्षी नावीन्यपूर्ण योजनेसाठी जास्त निधी मिळाला आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिणचेकर, अमल महाडिक, सत्यजित पाटील, उल्हास पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी पालकमंत्री म्हणाले,राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांबाबत मोठे धोरण स्वीकारले आहे. मार्चच्या बजेटमध्ये दहा किलो मीटरचा एक रस्ता सदृढीकरणासाठी म्हणजेच आहे तोच रस्ता सदृढीकरण करण्यासाठी असे दहा हजार किलोमीटर रस्त्यांच्या कामांचे नियोजन केले आहे. दहा हजार किलोमीटर रस्त्यांचे रूंदीकरण केले जाईल. यासाठी ३० हजार कोटीं मंजूर केले आहेत. या रस्त्यांना दोन वर्षांची वॉरंटी असणार आहे. जर त्याला खड्डे पडले तर संबंधित ठेकेदारानेच त्याची डागडुजी करावी लागणार आहे.ग्रामीण रस्त्यांबाबत मोठी ओरड होत आहे. २ लाख ५६ हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. यातील ५० हजार किलोमीटरचे रस्ते सार्वजनिक बांधकामकडे वर्ग करता येतील का, याचा अंदाज घेत आहोत. तसे झाले तर तेही करता येईल. ग्रामीण भागातील रस्ते दुरूस्त होण्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून यावर्षी कामे सुरू केली जातील.     

साकवसाठी मिळणार निधी 
जलपुनर्भरणाचे प्रस्ताव तालुकानिहाय तयार करावेत. ते प्राधान्याने मार्गी लावले जातील. साकव उभारण्याची ज्या ठिकाणी अत्यावश्‍यकता आहेत, तेही प्रस्ताव सादर करावेत असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. 

प्रेक्षणिय स्थळांचे सुशोभीकरण 
 जिल्ह्यातील दहा प्रेक्षणीय स्थळांची कामे केली जातील. यावर्षी किमान २५ हजार नवीन पर्यटक या दहा स्थळांना भेट देतील असे नियोजन केले जाईल. त्याच दरम्यान नवीन ‘फ्लॉवर फेस्टिव्हल’ तयार करावा. ज्यातून पर्यटकांना नवीन गोष्टी पाहायला मिळतील, असे पाटील यांनी सांगितले.  

नळपाणी योजनेसाठी सोलर प्रोजेक्‍ट
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या अनेक योजना वीज बिल भरले नसल्याने बंद आहेत. यासाठी सोलर प्रोजेक्‍ट उभा करावा. यातून निर्मिती होणारी वीज ही महावितरणला द्यावी आणि त्या बदल्यात महावितरणने त्या त्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांची बिले वर्ग करून घ्यावीत, अशी योजना आखली जात आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या जवळचे 
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानात एखादी गोष्ट सांगितली तर ती पटकन होते, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. यावर पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘आघाडी सरकार असताना सतेज पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे होते. ते सांगतील तसे होत होते. त्यामुळे जिल्ह्यातील कोण ना कोण तरी मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहे हे चांगले आहे.’’

कमिशन बंद करा 
रस्ते होतात; पण लगेच खड्डे पडतात. त्यामुळे या रस्त्यांची जबाबदारी कोणावर तरी सोपवा आणि या कामातील कमिशन बंद करा म्हणजे रस्ते चांगले होतील, असे आवाहन प्रा. जालंदर पाटील यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com