स्थायी सदस्यांचा आयुक्तांना घेराओ

स्थायी सदस्यांचा आयुक्तांना घेराओ

कोल्हापूर - स्थायी समितीच्या सभेला एकही अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या स्थायी समितीमधील सदस्यांनी आयुक्त अभिजित चौधरी यांच्या कॉन्फरस हॉलमध्ये सुरू असलेल्या फेरीवाले समितीच्या बैठकीतच धडक मारली. 

येथे स्थायी समितीच्या सदस्यांनी आयुक्तांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. अधिकारी सभेला का हजर नाहीत, असा सवाल करीत महिला सदस्यांनी आयुक्तांशी हुज्जत घातली. ‘स्थायी’ऐवजी फेरीवाले समितीच्या बैठकीला अधिकाऱ्यांनी प्राधान्य दिल्याने ही बैठकच सदस्यांनी उधळून लावली. यामुळे महापालिकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले.

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा आज सकाळी अकराला होती. या सभेसाठी सभापती संदीप नेजदार, सदस्य अफजल पीरजादे, सत्यजित कदम, आशीष ढवळे, जयश्री चव्हाण, निलोफर आजरेकर, प्रतिज्ञा उत्तुरे, उमा इंगळे, रिना कांबळे सभेसाठी आले होते. पण, एकही अधिकारी बैठकीला उपस्थित नव्हते. या वेळी काही सदस्यांना समजले, की आयुक्त कार्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. त्या बैठकीला सर्व अधिकारी उपस्थित आहेत. पण, या सभेला कोणीही आलेले नाही. त्यामुळे सदस्य संतप्त झाले. सर्व ‘स्थायी’च्या सदस्यांनी थेट आयुक्त कार्यालयाकडे धाव घेतली.  तेथे कॉन्फरस हॉलमध्ये फेरीवाले समितीची बैठक सुरू होती. या बैठकीतच सदस्य घुसले आणि त्यांनी आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांवर प्रश्‍नांचा भडीमार केला. 

सदस्य आपली इतर कामे सोडून बैठकीसाठी येतात, मग अधिकारी का येत नाहीत, पाठीमागच्या तीन ते चार बैठकींचा असा अनुभव असल्याचे सदस्यांनी सांगितले.  या वेळी जयश्री चव्हाण, प्रतिज्ञा उत्तुरे, निलोफर आजरेकर या आक्रमक झाल्या; तर सत्यजित कदम, सभापती नेजदार यांनीही अधिकाऱ्यांनी बैठकीला वेळेवर उपस्थित राहिले पाहिजे, असे सांगितले.

शहरातील अनेक विकासकामे प्रलंबित आहेत. सभाच झाली नाही तर कामांना गती कशी येणार, असे जयश्री चव्हाण यांनी विचारताच आयुक्त चौधरी म्हणाले, ‘‘कामे कोणती थांबली आहेत ते सांगा, ती तातडीने मार्गी लावू,’’ या वेळी सौ. चव्हाण यांनी तुम्हीही बैठकीसाठी येत नाहीत, असे सांगितले. आयुक्त चौधरी म्हणाले, ‘‘गेल्या आठवड्याच्या बैठकीला मी आलो होतो. प्रत्येक बैठकीला आयुक्तांना हजर राहता येणार नाही. पण, एखाद्या बैठकीसाठी मी येणे गरजेचेच असेल तर मी नक्की येणार, तसेच कोणतीही कामे खोळंबणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना मी सर्वच अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.’’

अधिकाऱ्यांना आदेश द्यावा
बैठकीस गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी स्थायी समितीच्या सदस्यांनी केली. त्या वेळी आयुक्तांनी त्यास नकार दिला. अधिकारी वर्ग फेरीवाले समितीच्या बैठकीत आहेत, असे सांगितले. पण, सदस्यांचे समाधान झाले नसल्याने गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, त्यांच्या सुविधा काढून घ्या, असा आदेश दिला असल्याचे स्थायी समितीच्या सदस्यांनी सांगितले.

स्थायी सभा व्यवस्थित होईल
स्थायी समितीची सभा सुरू होण्यापूर्वी फेरीवाले समितीची बैठक घ्यावी, या उद्देशाने ही फेरीवाले समितीची बैठक आयोजित केली होती. त्यामुळे स्थायी समितीच्या सभेला वेळ झाला; पण यापुढे असे होणार नाही. स्थायी समितीच्या सभेलाही सर्व अधिकारी वेळेत उपस्थित राहतील. यापुढे याची दक्षता घेता येईल का? असे आयुक्त चौधरी यांनी सांगितले.

तुम्हाला जमतंय की नाही सभापती - चव्हाण
स्थायी समितीचे सभापती संदीप नेजदार यांनी यासंदर्भात आक्रमक भूमिका घ्यावी, अशी इच्छा सदस्य जयश्री चव्हाण यांचे पती सचिन यांची होती. कॉन्फरस हॉलच्या बाहेरून तशी मागणी ते करीत होते. पण, सभापतींना आक्रमक भूमिका घेता येत नव्हती. त्या वेळी सचिन चव्हाण यांनी सभापती त्यांच्यावर कडक कारवाई करा, त्यांच्या सुविधा काढून घ्या, असे सांगत होते. तुम्हाला जमतंय की नाही ते सांगा, असेही चव्हाण म्हणत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com