चालक पाटीलला अटक

चालक पाटीलला अटक

कोल्हापूर - गंगावेस येथे रविवारी रात्री झालेल्या अपघाताला कारणीभूत केएमटीचा बसचालक राजाराम पांडुरंग पाटील (वय ४७, रा. सडोली म्हाळुंगे, ता. करवीर) याला जुना राजवाडा पोलिसांनी मध्यरात्री दोन वाजता अटक केली. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. त्याला  न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलिस कोठडी देण्यात आली. त्याच्या विरोधात विपुल चंद्रकांत पाटील (रा. मातंग वसाहत, राजारामपुरी दुसरी गल्ली, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी सांगितले, की पंजा विसर्जन मिरवणूक काल होती. राजारामपुरी दुसऱ्या गल्लीतील बदाम पंजाची मिरवणूक पापाची तिकटी ते गंगावेस मार्गावर सायंकाळी साडेसातच्या सुमारास आली. येथे रुकडीतून लक्षतीर्थ वसाहतीकडे केएमटी निघाली होती. त्यावर पाटील चालक होता. त्याने जाणीवपूर्वक बस चालवताना हलगर्जीपणा केला. त्यामध्ये तानाजी भाऊ साठे आणि सुजल भानुदास अवघडे ठार झाले. दत्ता केरबा साठे, सचिन दत्ता साठे, कुमार अनिल साठे, आकाश तानाजी साठे, संदीप तानाजी साठे, स्वप्नील अनिल साठे, योगेश शंकर कवाळे, करण साठे, अनुराग अरविंद भंडारे,  प्रतीक सुधीर भंडारे, सोनू उत्तम हेगडे, सनी शिवाजी गर्दे, अमर कवाळे आणि आनंद राऊत हे जखमी झाले. त्यास चालक कारणीभूत आहे, अशी फिर्याद पंजातीलच प्रत्यक्षदर्शी विपुलने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी चालक राजाराम पांडुरंग पाटील याला अटक केली. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला दुपारी न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली आहे. त्याच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. संबंधित चालक दारू पिला होता का? यासह इतर वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर गुन्ह्यांच्या कलमांत बदल केला जाणार आहे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटक झाली, चौकशी सुरू...
चालक राजाराम पाटीलवर गुन्हा दाखल झाला असून, त्याला पोलिस कोठडी दिली आहे. त्याची पुढील चौकशी सुरू आहे. तो दारू पिला होता का? यासह इतर वैद्यकीय तपासण्या झाल्या आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल.

केएमटी बंदने फटका

कोल्हापूर - केएमटी बस सोमवारी बंद राहिल्यामुळे सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले. सर्वसामान्यांना त्याचा फटका बसला. त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला.
रविवारी रात्री पंजा विसर्जन मिरवणुकीत केएमटी बस घुसून दोघांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर संतप्त जमावाने बस फोडून पेटवण्याचा प्रयत्न केला. या अपघाताचे सलग दुसऱ्या दिवशीही सावट राहिले. राजारामपुरीसह परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. त्यामुळे केएमटी बससेवा सोमवारी सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली. दुवारी बारा वाजण्याच्या सुमारास केएमटीच्या बृद्ध गार्डन येथील वर्कशॉपमध्ये महापौरांसह सर्व अधिकारी, पदाधिकारी एकत्र आले. त्यांनी बैठक घेतली. चालकही तणावाखाली होते.

जोखीम पत्करून आम्ही रस्त्यावर कसे काय उतरायचे? असा सवाल चालकांनी केला. त्यानंतर अपघाताच्या मूळ कारणांची चौकशी सुरू झाली. अपघात नेमका कशामुळे घडला याबाबत चर्चा सुरू झाली. बैठकीत आयुक्तांनी चालकासह इतर दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बस सुरू करण्याचे नियोजन सुरू झाले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास काही बस तेथून बाहेर सोडण्यात आल्या; पण पाचच मिनिटांत राजारामपुरीतील काही कार्यकर्ते पुन्हा वर्कशॉप येथे आले. त्यांनी रुग्णालयात अपघातातील तिसरा एक जखमी गंभीर अवस्थेत आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे पुन्हा बस सुरू झाली आणि जमावाकडून काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी केएमटीवरच राहील, असा इशारा दिला. त्यामुळे सुरू झालेली बससेवा पाचच मिनिटात बंद करण्यात आली.

दिवसभरात दहा लाखांचे नुकसान
केएमटी बससेवा आज दिवसभर बंद राहिल्याने केएमटीचे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. आज बससेवा शंभर टक्के बंद होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com