दिवसा रिक्षाचालक; रात्री अभियंता, हिरो

शिवाजी यादव
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

मंडळांचे हरहुन्नरी कार्यकर्ते - मंडप, देखाव्यांच्या कल्पकतेतून जपले वेगळेपण 

मंडळांचे हरहुन्नरी कार्यकर्ते - मंडप, देखाव्यांच्या कल्पकतेतून जपले वेगळेपण 
कोल्हापूर - व्यवसायाने अथवा पदवीने कुणी स्थापत्त्य अभियंता नाही. पण कागदावर आणि प्रत्यक्षात एखाद्या धार्मिक मंदिराची प्रतिकृती हुबेहूब साकारली आहे... इथे कुणी व्यावसायिक नाटक-चित्रपट कलावंत नाही, पण तालीम करून त्यांनी साकारलेल्या जिवंत अभिनयाने गर्दीचे लक्ष वेधले आहे... कुणी इलेिक्‍ट्रकल अभियंता नाही, पण मंडपाची लक्षवेधी रोषणाई नेत्रसुखद बनवली आहे... शहरातील विविध मंडळांतील कार्यकर्त्यांची ही परिस्थिती. काही महिने कल्पकता पणाला लावून त्यांनी देखावे, रोषणाई, मंदिर किल्ले, प्रतिकृती बनविल्या आहेत आणि या राबणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाला हजारोंची गर्दी रोज सलाम करते आहे.

शहरभरात जवळपास साडेतीनशेवर मंडळांनी गणेशोत्सवात तांत्रिक, सजीव देखाव्यांबरोबर कल्पक मूर्ती आणि नेत्रदीपक रोषणाई, नयनमनोहरी प्रतिकृती सादर करत उत्सव भव्य करताना वेगळेपण जपले आहे. 
दिवसभर कुठेतरी बॅंकेत, एखाद्या कंपनीत क्‍लार्क म्हणून काम करायचं. कोण दुकान चालवतंय. कोणी एमआयडीसीत काम करतो. तर कोण रिक्षा काढतो. काम सांभाळून फावल्या वेळेत मंडळात एकत्र आलेले कार्यकर्ते मंडळाच्या उत्सवात आहेत. यातील बहुतेकांचे शिक्षण पदवीच्या आतच आहे. लौकिकार्थाने त्यांच्याकडे कुठली उच्च पदवी नाही. पण अभियंत्यांच्या ज्ञानाला लाजवेल अशा कलाकृती त्यांनी सांघिकतेच्या बळावर फक्त मंडळासाठी साकारल्या आहेत. धार्मिक मंदिर, ऐतिहासिक किल्ला तर कुणी कृत्रिम तलाव साकारला आहे. 

काही मंडळांनी सादर केलेले सजीव देखावे पाहिले की अक्षरशः नाटक, चित्रपटातील कलावंत फिके वाटावेत अशी त्यांची अदाकारी आहे. होतकरू लेखकाने संहिता लिहिली, कार्यकर्त्यांपैकी कुणी अभिनयासाठी राजी झाले, स्क्रिप्ट वाचून पाठ केले आणि रेकॉर्डिंग स्टुिडओतून रेकॉर्ड करून घेतले. त्याला साजेसा अभिनय करायचा. त्यासाठी दिवसभराच्या रिक्षाचालकाला रात्री कलावंत बनवले. या सजीव देखाव्यांची अशी पात्रे गलोगल्ली हलू, बोलू लागली आहेत. शाहूपुरी, राजारामपुरी, शिवाजी पेठ, कसबा बावड्यातील उत्सवातील सजीव देखावे गर्दी खेचत आहेत. 

असाच प्रतिसाद विविध मंडळांनी साकारलेल्या जवळपास ३५ हून अधिक विविध मंदिराच्या प्रतिकृतींना मिळत आहे. त्यांचे रंगकाम, नक्षीकाम अफाट आहे. स्थानिक कारागिरांनी नेटक्‍या सुतारकामातून प्रतिकृती साकारली आहे. त्याचे दिग्दर्शन कार्यकर्त्यांनीच केले आहे. अशा प्रतिकृतींची बांधणी गेली दोन महिने सुरू होती. 

तंत्रकौशल्य पणाला...
उद्यमनगरातील बालावधूत ग्रुपच्या काही कार्यकर्त्यांनी सर्जिकल स्ट्राईकचा देखावा साकारला आहे. यात हेलिकॉप्टरची प्रतिकृती हुबेहूब साकारली आहे. जवळपास २५ फूट उंचीवरून हेलिकॉप्टर भिरभिरत आहे, त्याची धडकी भरविणारा आवाज हेही या देखाव्यांचे बलस्थान आहे. कार्यकर्त्यांच्या तंत्रकौशल्याला दाद द्यावी, असे देखावे उद्यमनगरात आहेत. तर राजारामपुरीतील युवक मित्र मंडळाने विमानाची प्रतिकृती साकारली आहे. म्हसोबा बिरोबा ट्रस्टची अंबाबाई एक्स्प्रेस ही रेलगाडी धम्माल आहे. राधाकृष्ण मंडळ, दिलबहार मंडळाने साकारलेली प्रतिकृती, शनिवार पेठेतील मृत्युंजय मंडळाचे २२५ वर्षांपूर्वीचे शहर कसे होते याची प्रतिकृती लक्षवेधी आहे.