कोल्हापूर ते शिर्डी रेल्वेचा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

कोल्हापूर -  मेघगर्जनेसह झालेल्या वरुणराजाच्या वर्षावात, वाजत-गाजत कोल्हापूर स्थानकातून रेल्वेने शिर्डीकडे प्रयाण केले. खासदार धनंजय महाडिक यांनी ग्रीन सिग्नल दाखविला. हंगामी असलेली ही सेवा कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन खासदार महाडिक यांनी दिले. महापौर हसीना फरास, आमदार अमल महाडिक, अरुंधती महाडिक, स्टेशन मास्तर मीना सुग्रीव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

दुपारी चार वाजून ३५ मिनिटांनी रेल्वे सुटण्याची वेळ होती. तत्पूर्वी रेल्वे प्रशासनाने रेल्वे दोन नंबरच्या फलाटावर उभी केली होती. इंजिन झेंडूच्या फुलांनी सजविले होते. दोन बोगींना पताका लावल्या होत्या. प्लॅटफॉर्मवर मंडप उभारला होता. स्टेशन मास्तर मीना सुग्रीव यांनी चर्चेत असलेली रेल्वे आज प्रत्यक्षात स्थानकावर असल्याचे सांगितले. खासदार महाडिक यांनी केलेल्या प्रयत्नामुळे हे शक्‍य झाल्याचे त्यांनी सांगितले. 

खासदार महाडिक यांनी कोल्हापूरकरांनी प्रतिसाद दिल्यास ही रेल्‍वे कायमस्वरूपी ठेवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले. यानंतर जोराच्या पावसातच रेल्वे रुळावर जाऊन महापौर हसीना फरास, भागीरथी संस्थेच्या अरुंधती महाडिक, अमल महाडिक यांनी पूजन केले. खासदार महाडिक यांनी भिजतच रेल्वेगाडीला ग्रीन फ्लॅग दाखविला आणि प्रतीक्षेत असलेली कोल्हापूर-शिर्डी रेल्वे सुरू झाली.नगरसेवक विजय सूर्यवंशी, नगरसेवक राजू दिंडोर्ले, शेखर कुसाळे, ईश्‍वर परमार, संतोष गायकवाड, रूपाराणी निकम, सविता माने यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य समीर शेठ, शिवनाथ बियाणी, हॉटेल मालक संघाचे सिद्धार्थ लाटकर, उज्ज्वल नागेशकर, अरुण चोपदार यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
 
बुकिंग सुरू
पहिल्याच दिवशी १५० प्रवाशांनी स्लिपर, तर २५ जणांनी ए.सी. बोगीचे बुकिंग केले होते. अल्पावधीतच रेल्वेची फेरी सुरू झाल्यामुळे पहिल्या फेरीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला; मात्र पुढील बुधवारी आणि त्यानंतरचे बुकिंग सुरू झाल्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे श्री. शेठ यांनी सांगितले.

Web Title: kolhapur news kolhapur-shirdi rail strats