ब्रिटिश फॉर्म्युला थ्री स्पर्धेत कृष्णराज महाडिक विजेता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - इंग्लंडमध्ये झालेल्या बीआरडीसी ब्रिटिश फॉर्म्युला थ्री स्पर्धेत कोल्हापूरच्या कृष्णराज धनंजय महाडिकने विजेतेपद पटकावले. तब्बल एकोणीस वर्षांनंतर त्याने भारतासाठी या स्पर्धेत विजेतेपद पटकावून कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले. ब्रॅंडस हॅच रेसिंग सर्किटवर ही स्पर्धा झाली. रेसर नरेन कार्तिकेयननंतर त्याने ही कामगिरी केली. 

कृष्णराज गेली आठ वर्षे गो कार्टिंगच्या स्पर्धेत भाग घेत आहे. राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केल्यानंतर चार वर्षांपासून तो कार रेसिंगमध्ये सहभागी होत आहे. फॉर्म्युला फोर प्रकारात आपली छाप पाडल्यानंतर त्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरील रेसिंगच्या वर्तुळात घेतली गेली. इंग्लंडमधील प्रतिष्ठेच्या बीआरडीएस रेसिंग चॅंम्पियनशिपसाठी कृष्णराज करारबद्ध झाला असून, गेल्या वर्षी प्रभावी कामगिरी केल्यानंतर यंदाच्या हंगामात त्याने टीम डबल आर रेसिंग संघाकडून इतिहास रचला. इंग्लंडमधील ब्रॅंडस हॅच ग्रॅंड प्रिक्‍स रेसिंग ट्रॅकवर बीआरडीसी ब्रिटिश फॉर्म्युला थ्री रेसिंगच्या फेरीतील दुसऱ्या रेसमध्ये त्याने प्रथम क्रमांक अर्थात पोल पोझिशन पटकावली. पहिल्या रेसमध्ये आठव्या स्थानावर असताना त्याने जिद्द, कौशल्य व समयसूचकतेचा वापर करीत सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. रेस संपायला अवघे काही क्षण असताना त्याने जेम्स पूल या रेसरला मागे रोखून धरत विजेतेपदावर मोहोर उमटवली. 

नरेन कार्तिकेयनने १९९८ मध्ये विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर कृष्णराजने अशी कामगिरी केली असून, यशाचे श्रेय त्याने आई अरुंधती महाडिक व वडील खासदार धनंजय महाडिक यांच्यासह डबल आर रेसिंगचे व्यवस्थापक रूपर्ट कुक व जॅक क्‍लार्क यांना दिले. रेसच्या तयारीसाठी तो चार महिने इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे. नियमित व्यायाम, कसून सराव, एकाग्रतेसाठी योगा या त्रिसूत्रीमुळे यश मिळविता आल्याची प्रतिक्रिया त्याने दिली. ऑगस्टअखेर होणाऱ्या रेसमध्ये अशीच कामगिरी करण्यास उत्सुक असून, त्यादृष्टीने त्याची तयारी सुरू आहे.

एक स्वप्न पूर्ण झाले. नियमित व्यायाम, कसून सराव, एकाग्रतेसाठी योगा या त्रिसूत्रीमुळे यश मिळविता आले.
-कृष्णराज महाडिक