लक्ष्य करियर प्रदर्शनाला दिमाखदार प्रारंभ

कोल्हापूर - क्रिएटीव्ह ऍकॅडमी प्रस्तुत सकाळ लक्ष्य करिअर प्रदर्शनाचे उद्‌घाटन मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते झाले. यावेळी शेजारी "सकाळ''चे कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, उपसरव्यवस्थापक रविंद्र रायकर, युवराज पाटील, सुनिता देसाई, प्
कोल्हापूर - क्रिएटीव्ह ऍकॅडमी प्रस्तुत सकाळ लक्ष्य करिअर प्रदर्शनाचे उद्‌घाटन मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते झाले. यावेळी शेजारी "सकाळ''चे कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, उपसरव्यवस्थापक रविंद्र रायकर, युवराज पाटील, सुनिता देसाई, प्

कोल्हापूर - एकाच छताखाली ‘लोकल टू ग्लोबल’ लाखो करियर संधींचा खजीना घेवून आलेल्या क्रिएटीव्ह ॲकॅडमी प्रस्तुत सकाळ लक्ष्य करियर प्रदर्शनाला आजपासून दिमाखदार प्रारंभ झाला.हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसुदन हॉलमध्ये सलग तीन दिवस हे प्रदर्शन होणार आहे. दरम्यान, आज पहिल्याच दिवशी प्रदर्शन आणि प्रदर्शनांतर्गत व्याख्यानमालेलाही पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त गर्दी केली. संत गजानन शिक्षण संस्था, महागाव, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, यड्राव, डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत. 

जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. यावेळी ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, उपसरव्यवस्थापक रविंद्र रायकर, क्रिएटीव्ह ॲकॅडमीच्या सुनिता देसाई, प्रविण कुलकर्णी, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीच्या प्रा. डॉ. उज्वला बिरंजे,युवराज पाटील आदी यावेळी उपस्थित होते. 

आजच बारावीचा निकाल लागला आणि लवकरच दहावीचा निकाल लागेल. मात्र, या साऱ्या पार्श्‍वभूमीवर आता पुढे काय, या प्रश्‍नाने घराघरांत संभ्रमावस्था आहे. करियरच्या लाखो संधी एकीकडे उपलब्ध आहेत. मात्र, त्याविषयी सविस्तर माहिती नाही. बदलत्या काळात नेमके कोणते क्षेत्र सर्वाधिक फायद्याचे ठरेल,अशा विविध प्रश्‍नांची उत्तरे विद्यार्थी व पालकांना या प्रदर्शनाच्या निमित्ताने एकाच छताखाली मिळत असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी आवर्जुन व्यक्त झाल्या. प्रदर्शनात संगणक, माहिती तंत्रज्ञान, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, अभियांत्रिकीच्या विविध शाखा, मेडिकल आणि ॲनिमेशन, बॅंकिंग आदी संस्थांचा समावेश आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांच्या स्टॉलसह इतर विविध विद्या शाखांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध क्‍लासेसचा प्रदर्शनात सहभाग आहे. त्याशिवाय प्रदर्शना दरम्यान करिअर मार्गदर्शन व्याख्यानमालेलाही प्रारंभ झाला असून केवळ मार्गदर्शनापेक्षाही विद्यार्थी व पालकांशी संवादावर भर दिला जातो आहे. 

आजची व्याख्याने अशी -
- सकाळी अकरा - प्रा. शिरीष शितोळे ‘करिअर घडवताना’ या विषयावर संवाद साधतील. स्पर्धा परीक्षांपासून ते विविध विद्याशाखांतील संधीबाबत प्रा. शितोळे यांचा मोठा अभ्यास असून विद्यार्थ्यांची मानसिकता आणि त्याचा कल या विषयावर देशभरातील विविध ठिकाणी आजवर त्यांची व्याख्याने झाली आहेत.
- दुपारी साडेबारा - प्रसिध्द डिजीटल मार्केटींग तज्ञ सौरभ शरनाथे ‘डिजिटल मार्केटिंग’ या विषयावर संवाद साधतील. या मार्केटींगचे तंत्र आणि धोरण कसे असावे इथपासून ते ब्रॅंडींग आणि त्यासाठीचे कंटेन्ट प्लॅनिंग आदी विषयावर ते विस्तृतपणे संवाद साधतील.  
- दुपारी चार - महाराष्ट्रातील प्रसिध्द माईंड गुरू नानासाहेब साठे ‘माईंड पॉवर’ या विषयावर संवाद साधतील. माईंड पॉवर याच विषयावर गेल्या सात वर्षात त्यांनी ग्लोबल फाऊंडेशनच्या माध्यमातून साडेसहाशेहून अधिक सेमीनार आणि १८५ हून अधिक कार्यशाळा घेतल्या आहेत. सुमारे अडीच लाखांवर विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घेतला आहे.   
- सायंकाळी साडेपाच - प्रसिध्द करियर समुपदेशक दिवाकर ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत कल चाचणी परीक्षा होईल. प्रथम नोंदणी करणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांची कल चाचणी यावेळी होईल. विद्यार्थ्यांनी येताना पॅड आणि पेन आणणे आवश्‍यक आहे.नावनोंदणीसाठी प्रदर्शनातील सकाळ प्रकाशनाच्या स्टॉलवर संपर्क साधावा.

पाचवीपासूनच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आवश्‍यक - प्रा. थोरवे
स्पर्धा परीक्षेतील यशात तुलनेत महाराष्ट्र अजूनही मागे आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येत महाराष्ट्राचा दहा टक्के वाटा असला तरी या परीक्षांत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी आहे. पाचवीपासूनच अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश झाल्यास भविष्यातील चित्र नक्कीच सकारात्मक असेल, असे मत संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसचे संचालक प्रा. महेश थोरवे यांनी व्यक्त केले. 

विविध स्पर्धा परीक्षांविषयी सविस्तर माहिती देऊन ते म्हणाले, ‘‘येत्या वर्षभरात तब्बल पाच लाख ३४ हजारांवर शासकीय नोकऱ्यांची संधी आहे. विविध स्पर्धा परीक्षा किंवा सरळ सेवा भरतीतून ही पदे भरली जातील. एकट्या आयकर विभागातच ८० हजारांवर पदे रिक्त आहेत. एकूणच या क्षेत्रातील संधीचे सोने करताना नियोजनपूर्वक अभ्यासाला महत्त्व द्यावे लागणार आहे.’’
 

स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रातच करिअर करा - टोपले
सतत सकारात्मक विचारांवर भर द्या. स्वतःवर, स्वतःच्या क्षमतांवर विश्‍वास ठेवा आणि तुम्हाला ज्या क्षेत्राची आवड आहे, त्याच क्षेत्रात करिअरचा मार्ग निवडा, असा मौलिक मंत्र आज प्रसिद्ध मोटिव्हेशन गुरू आरती टोपले यांनी दिला. त्या म्हणाल्या, ‘‘संकटांवर मात करा, असे आपण वारंवार सांगतो; पण संकटेच निर्माण होऊ नयेत, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आवश्‍यक आहेत. शिक्षण आणि त्या अनुषंगाने विविध गोष्टींवर आपण वारेमाप चर्चा करतो. मात्र, मन, मेंदू आणि शरीर याकडे दुर्लक्ष करतो. आपण मेंदूला जे पुरवतो, त्याचेच परिणाम नंतर दिसतात. त्यामुळेच सकारात्मक विचार महत्त्वाचा आहे. जगातील सर्वाधिक बुद्‌ध्यांक असणाऱ्या अल्बर्ट आईनस्टाईन यांनी केवळ अर्धा टक्के मेंदूचा वापर केला होता.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com