दीड हजार शासकीय कार्यालयांत ऊर्जाबचत 

दीड हजार शासकीय कार्यालयांत ऊर्जाबचत 

कोल्हापूर - विजेच्या खर्चाची बचत करण्यासाठी राज्यातील दीड हजारांवर शासकीय इमारतींत ऊर्जाबचत उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला. येथे बांधकाम खात्याच्या कार्यालयात उपक्रमाला सुरवात झाली आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यातील इतर शासकीय विभागांच्या इमारतींतही पारंपरिक विजेची उपकरणे बदलून त्याऐवजी एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. त्यातून राज्यभर वर्षाला पाच ते आठ लाखांची; तर सर्व शासकीय कार्यालयांतून कोट्यवधी रुपयांची वीजबचत होईल. 

केंद्र सरकार पुरस्कृत एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) आणि राज्य शासन यांच्यात झालेल्या करारानुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी बांधकाम विभागात एलईडी दिवे बसविण्याच्या उपक्रमाला मंजुरी दिली. त्यानुसार येथील कार्यालयातही हे काम सुरू झाले. अनिवासी इमारतींत पहिल्या टप्प्यात उपक्रम राबविला जाईल. यात 325 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक "ईईएसएल'मार्फत करण्यात आली आहे. त्यातून वर्षाला 100 लक्षदक्ष युनिट म्हणजे 160 कोटी रुपयांची वार्षिक बचत राज्यभर होईल, असा कंपनीचा अंदाज आहे. 

"ईईएसएल'कडून होणाऱ्या गुंतवणुकीची परतफेड वीजबचतीच्या रकमेतून येत्या तीन वर्षांत शासनाकडून केली जाणार आहे. 

या उपक्रमात शासकीय इमारतींमधील 60 वॉटचे दिवे, ट्यूबलाइट व त्यापेक्षा जास्त क्षमतेचे सध्याचे पंखे बदलण्यात येतील. त्याऐवजी एलईडी ट्यूबलाइट, बीईई फाइव्ह स्टार पंखे, जुन्या पथदीपांऐवजी एलईडी पथदीप, जुन्या वातानुकूलित यंत्राऐवजी ऊर्जा कार्यक्षम वातानुकूलित यंत्रे बसविण्यात येणार आहेत. या संपूर्ण कामाची देखरेख तांत्रिक जोडकाम हे ईईएसएल कंपनीच्या तंत्रज्ञांकडून होत आहे. 

20 हजार एलईडी ट्यूबलाइट 
घरोघरी ऊर्जाबचत व्हावी, विजेचे बिल कमी यावे, यासाठी ईईएसएल कंपनीतर्फे दोन वर्षांपासून एलईडी दिव्यांची विक्री "महावितरण'च्या कार्यालय परिसरात सुरू करण्यात आली आहे. त्याला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभला. त्यानुसार आता ईईएसएल कंपनीने 20 वॉटच्या ट्यूबलाइट काढल्या आहेत. येथे जवळपास 20 हजार ट्यूबलाइट विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. देशातील आघाडीच्या कंपन्यांनी उत्पादित केलेल्या 20 वॉटच्या ट्यूबलाइटचे येथे वितरण नुकतेच सुरू झाले. यात ताराबाई पार्कातील महावितरण मुख्य कार्यालयासमोर, तसेच दुधाळी, इचलकरंजी, कागल, आजरा, पन्हाळा येथील महावितरण उपकेंद्रांसमोरील स्टॉल्सवर विक्री सुरू झाली आहे, तसेच अशा उपकरणांचा बिघाड व अन्य काही तक्रारी जाणून घेण्यासाठी कंपनीने 18001803580 हा टोल फ्री क्रमांकही सुरू केला आहे. 

वीजबचतीचा पर्याय 
नऊ वॉट क्षमतेच्या एलईडी दिव्याची किंमत 70 रुपये, 20 वॉट क्षमतेच्या ट्यूबलाइटची किंमत 220 रुपये; तर 40 वॉट क्षमतेच्या फाइव्ह स्टार पंख्याची किंमत 1200 रुपये आहे. सध्या अनेक घरांत वापरात असलेल्या ट्यूबलाइटची क्षमता किमान 40 वॉट आहे; तर दिवा खोलीत वापरायचा झाल्यास त्याचे वॉट 60 ते 100 इतके असते. पंख्याचे वॉट 60 ते 100 च्या पुढे असते. त्यामुळे एकूण वीजवापर वाढतो. परिणामी, बिल वाढते. अशात एलईडी दिवा, ट्यूबलाइट व पंख्यांची मूळ वॉटक्षमता कमी व परिणामही पारंपरिक उपकरणांइतकाच आहे; पण त्याचा वीजवापर कमी होतो व विजेचे बिल कमी येते, असा दावा कंपनी व ऊर्जा मंत्रालयाने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com