डॉ. श्रीरंग यादव यांना  ‘इ. के. जानकी अम्मल जीवन गौरव’ पुरस्कार

डॉ. श्रीरंग यादव यांना  ‘इ. के. जानकी अम्मल जीवन गौरव’ पुरस्कार

कोल्हापूर - वनस्पतींच्या संशोधनासाठी त्यांनी आयुष्य वेचलं, वनस्पतींच्या सहवासात ते तहानभूक हरपले. वनस्पतींच्या ७० नव्या प्रजातींचा शोध लावला. त्यावर झपाटल्यासारखे लेखन केले, शोध निबंध सादर केले आणि रानावनांतून दडलेला खजिना अभ्यासकांसह सर्वसामान्यांसाठीही खुला केला. 

डॉ. श्रीरंग यादव यांनी कोल्हापूरचा ठसा जगभर उमटवला. वनस्पतीशास्त्र विषयात ३० वर्षे राष्ट्रीय पातळीवर संशोधन मांडणाऱ्या डॉ. यादव यांना केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने आज  ‘इ. के. जानकी अम्मल जीवन गौरव’ पुरस्कार देऊन गौरवले. संशोधन क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे डॉ. यादव हे महाराष्ट्रातील एकमेव संशोधक ठरले. या पुरस्काराने कोल्हापूर व शिवाजी विद्यापीठाचाही गौरव झाला.

शेतकरी कुटुंबात जन्मलेले प्रा. डॉ. यादव यांनी १९८५ मध्ये 
शिवाजी विद्यापीठात अध्यापनाला सुरुवात केली. वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून ते २०१४ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. वनस्पती वर्गीकरण शास्त्रातील संशोधनाने त्यांनी विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त करून दिली.  

डॉ. यादव व डॉ. मिलिंद सरदेसाई यांनी लिहिलेल्या ‘फ्लोरा ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्‍ट’मध्ये २ हजार ३६० हून अधिक प्रजातींची नोंद एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातून केली. आजही इतक्‍या मोठ्या प्रमाणावर नोंद असणारा हा एकमेव  वनस्पतिकोष आहे. महाराष्ट्रातील गवतांवर लिहिलेले त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहेत. विद्यापीठातील ‘लीड बॉटनिकल गार्डन’ ही पश्‍चिम भारतातील एकमेव बाग आहे.    

शिवाजी विद्यापीठामध्ये विकसित केलेल्या ‘स्कूल ऑफ टेक्‍सॉनॉमी’साठी हा पुरस्कार मला प्राप्त झाला आहे. यामध्ये माझ्यासोबतच विद्यार्थ्यांनीही संशोधन केले आहे. त्यामुळे या पुरस्कारामध्ये विद्यार्थ्यांचाही वाटा तितकाच मोठा आहे. शिक्षक हा त्यांच्या विद्यार्थ्यांमुळे मोठा होतो. 
- डॉ. श्रीरंग यादव, 

ज्येष्ठ वनस्पती संशोधक 
 

डॉ. यादव यांचे योगदान 

  • वनस्पतींच्या ७० शोधल्या प्रजाती
  • ब्राचीस्टेल्मा श्रीरंगी, उलालीया श्रीरंगी, इस्चिमम यादवी, विग्ना यादवी या संशोधनाला डॉ. यादव यांचे नाव 
  • नामांकित संस्थांचे प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त.
  • २५० शोधनिबंधांचे देश, विदेशात सादरीकरण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com