मॅग्नेटिक महाराष्ट्रातून कोल्हापूरला ‘छोटीशी आशा’...

मॅग्नेटिक महाराष्ट्रातून कोल्हापूरला ‘छोटीशी आशा’...

कोल्हापूर - उद्योगासह सर्वच क्षेत्रांत गुंतवणुकीसाठी म्हणून मुंबईत भरविलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जस्‌मध्ये पश्‍चिम महाराष्ट्रात एकही मोठा उद्योग समूह नाही; परंतु करार झालेले मोठे उद्योग सुरू झाल्यास त्याला लागणाऱ्या साहित्याची निर्मिती करण्याची क्षमता येथील उद्योजकांत आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जस्‌मधून मोठी आशा नसली तरी छोटीशी आशा येथील उद्योग क्षेत्राला आहे. 

यासाठी कोल्हापुरातील उद्योजकांना ही नावीन्याची कास धरावी लागणार असल्याची झलक यात दिसून आली. ऑटोमोबाईल सेक्‍टरमध्ये प्रामुख्याने हे बदल स्वीकारावे लागतील. त्याची पायाभरणी आतापासूच करावी लागणार आहे. 

मुंबईत झालेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जस्‌मध्ये उद्योग क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीचा भविष्याचा वेध घेण्यात आला. काही मोठे करारही झाले. उद्योग क्षेत्राला चालना देणे, रोजगारनिर्मितीसाठी हे आवश्‍यक आहेत, परंतु रोजगारनिर्मिती करताना त्या पद्धतीने कौशल्य आत्मसात करण्याची जबाबदारी ही आता वाढणार आहे. एकूणच या मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जस्‌मधून कोल्हापूर किंवा पश्‍चिम महाराष्ट्राला फारसे काही मिळू शकले नाही.

‘ऑटोमोबाईल’मधील बदलाचा वेध हवा : पाटील
स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील म्हणाले, ‘‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जस्‌मध्ये उद्योग जगताशी संबंधित अनेक चर्चा झाली. यात मोठे उद्योग उभारण्याबाबत काही निर्णयही झाले; परंतु यात कोल्हापूर आणि पश्‍चिम महाराष्ट्रात मोठे उद्योग येणार नाहीत. मुंबई आणि समृद्धी मार्ग या अनुषंगानेच नव्या उद्योगाची पायाभरणी होण्याची शक्‍यता आहे. नवे उद्योग सुरू झाले, तर त्या उद्योगासाठी लागणाऱ्या गोष्टींसाठी गरज म्हणून कोल्हापूरमध्ये उद्योगाला चालना मिळेल. कोल्हापुरात ॲटोमोबाईल सेक्‍टरवर आधारित उद्योग समूह मोठा आहे. त्यामुळे त्या क्षेत्रात होणाऱ्या बदलाचा वेध आतापासूच घेतला पाहिजे. इलेक्‍ट्रिकल व्हेईकल (गाड्या) येण्याची शक्‍यता आहे, पण आपल्याकडे या गाड्यांसाठी लागणाऱ्या साहित्याची निर्मिती होत नाही. त्याचा वेध घेऊन तयारी केल्यास उद्योगाला चालना मिळेल,’’ 

ऑटोमोबाईल साहित्यनिर्मितीची संधी : कोंडेकर
इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कोंडेकर म्हणाले, ‘‘या प्रदर्शनात नवनवीच प्रोजेक्‍टची चर्चा झाली. टाटा, महिंद्रा अशांसह काही मोठ्या कंपन्या नवे उद्योग उभा करतील, असे दिसते; परंतु हे सगळे उद्योग मुंबई किंवा जवळचा परिसर, तसेच दुसरीकडे उभा राहत आहेत. कोल्हापूर, पश्‍चिम महाराष्ट्रात एकही नव्या उद्योगाची उभारणी होणार नाही, याचा अर्थ आपल्या उद्योग क्षेत्राला काहीच मिळणार नाही, असे नाही. आपल्या उद्योग क्षेत्रात ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित जास्त उद्योग आहेत. त्याअनुषंगाने मोठे उद्योग सुरू झाल्यास त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची निर्मिती करण्याची संधी मिळेल आणि उद्योग क्षेत्राला चालना मिळेल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com