महालक्ष्मीची मूर्ती सुस्थितीतच

Mahalakshmi
Mahalakshmi

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची मूर्ती सुस्थितीत आहे. आर्द्रता आणि वाढत्या तापमानामुळे मूर्तीवर पांढरे डाग पडले असून खबरदारीचा उपाय म्हणून मूर्ती सलग आठ दिवस कोरडी ठेवून पुन्हा संवर्धनाची प्रक्रिया करावी लागेल, अशी माहिती आज औरंगाबाद पुरातत्व खात्याचे उपअधीक्षक श्रीकांत मिश्रा यांनी दिली.

रासायनिक संवर्धनानंतर अवघ्या दोनच वर्षात महालक्ष्मी मूर्तीवर पांढरे डाग पडल्याची चर्चा आठवडाभर सुरू होती. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश सुभेदार यांनी औरंगाबाद येथील पूरातत्व कार्यालयाशी संपर्क साधला व अधिकाऱ्यांना मूर्ती पाहण्याची विनंती केली. त्यानुसार आज सकाळी श्री. मिश्रा यांच्यासह सहकाऱ्यांनी सुमारे एक तासाहून अधिक काळ मूर्तीची पाहणी केली. आर्द्रता समितीचे सदस्य उदय गायकवाड, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, संगीता खाडे, सचिव विजय पोवार आदी उपस्थित होते.

पाहणीनंतर देवस्थान समिती कार्यालयात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत श्री. मिश्रा यांची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ''पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मूर्तीचे व्यवस्थित संवर्धन झाले आहे. धार्मिक विधी, पूजेसाठी जे द्रव्य वापरले जातात त्यातील घटकांमुळे मूर्तीतील भेगांमध्ये थर साचून पांढरे डाग पडले आहेत. आर्द्रतेचाही मूर्तीवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा संवर्धनाची प्रक्रिया करावी लागेल. या काळात कोणतेही धार्मिक विधी करता येणार नाहीत. यासंबंधीचा अहवाल देवस्थान समितीला दिला जाईल आणि पुढील कार्यवाही केली जाईल.''

खबरदारी आवश्‍यकच
अजिंठा, वेरुळ, अशा पुरातन वास्तूंपेक्षा देवतांच्या मूर्तीचा दगड वेगळा असतो. त्यावर धार्मिक विधी केले जातात. त्यामुळे त्यांची झीज लवकर होते. एकदा कोटींग केले म्हणजे ते दर सहा महिन्यांनी वर्षानी, दोन वर्षांनी संवर्धन करावेच लागेल असे नाही. पूजेच्या पद्धतीत बदल करून मूर्तीची नियमित स्वच्छता राखली, नियमांचे पालन केले आणि आर्द्रता नियंत्रणात राखली गेली तर मूर्तीवर पून्हा कोणताही परिणाम होणार नाही, असेही श्री. मिश्रा म्हणाले.

गुन्हे दाखल करा
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत श्री. मिश्रा यांनी प्रक्रियेची माहिती दिली. यावेळी दोन वर्षापूर्वी संवर्धन प्रक्रिया केलेले मनेजर सिंग डिसेंबरमध्ये निवृत्त झाले. त्यानंतर त्यांचा पुरातत्वचे अधिकारी म्हणून संबंध राहिला नाही. तरीही त्यांनी मेमध्ये मूर्तीवर काजळाचा थर कसा दिला? यासाठी त्यांनी देवस्थान समितीची रितसर परवानगी घेतली होती का? असा सवाल झाला. यावेळी देवस्थान समितीला अंधारात ठेवल्याचे सदस्य संगीता खाडे यांनी सांगितले. त्यामुळे सिंग यांच्यासह तत्कालीन सचिव शुभांगी साठे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली. मूर्ती अभ्यासक प्रसन्न मालेकर, सुजित चव्हाण, हर्षल सुर्वे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

आंदोलनाचा इशारा
पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या नियमांचे पूजारी व देवस्थानकडून पालन झाले नाही. त्यामुळेच मूर्तीची ही अवस्था झाली आहे. तुम्हाला कठोर निर्णय घेवून अंमलबजावणी करता येत नसेल तर सचिवांनी राजीनामे द्या. येत्या काळातही असे प्रकार घडले तर एकाही भाविकाला मंदिरात सोडणार नाही, असा इशारा यावेळी संजय पवार यांनी दिला. दरम्यान, अधिकारी मूर्ती पाहणीसाठी जात असताना बजरंग दलाचे महेश उरसाल, संभाजी साळूंखे व प्रमोद सावंत यांनी आता तूम्ही मूर्तीचे काय करणार, मनेजर सिंग गुपचूप मूर्तीवर थर कसे लावून जातात, आदी प्रश्‍न उपस्थित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com