तुमच्यातील संवेदना संपली आहे - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

कोल्हापूर - शासनाच्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करताना त्यात अडथळे निर्माण करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या अधिकाऱ्यांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारेवर धरले. "तुमच्यातील संवेदना संपली आहे', या शब्दांत त्यांनी आपल्या भावना आज या अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केल्या. 

कोल्हापूर - शासनाच्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करताना त्यात अडथळे निर्माण करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या अधिकाऱ्यांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारेवर धरले. "तुमच्यातील संवेदना संपली आहे', या शब्दांत त्यांनी आपल्या भावना आज या अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केल्या. 

शासनाने जाहीर केलेल्या "छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने'चा आढावा आज श्री. फडणवीस यांनी "व्हिडिओ कॉन्फरन्स'द्वारे घेतला. त्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा बॅंका, राष्ट्रीयीकृत बॅंका व सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी कर्जमाफीसाठी ऑनलाइन माहिती कशी भरून घ्यायची, याचा चार्ट सादर करण्यात आला. त्याचबरोबर ही माहिती कशी भरून घ्यायची, हे सांगण्यात आले. कोल्हापुरातून या चर्चेत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, जिल्हा बॅंकेचे अधिकारी व अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक सहभागी झाले होते. 

या योजनेत वेगवेगळी कारणे सांगून राष्ट्रीयीकृत्त बॅंकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केल्याचा मुद्दा चर्चेत आला. यावर श्री. फडणवीस संतापले. ""तुमच्यातील शेतकऱ्यांविषयीची संवेदनाच संपली आहे. यातून उद्रेक झाला आणि लोक अंगावर आले तर सरकार म्हणून तुमच्या पाठीशी आम्ही राहायचे की नाही, याचा विचार करावा लागेल,'' या शब्दांत त्यांनी या चर्चेत सहभागी झालेल्या बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुनावले. सुमारे 15 मिनिटे श्री. फडणवीस यांनी याच मुद्यावर चर्चा केली. 

कर्जमाफी होईपर्यंत खरिपासाठी दहा हजार रुपये देण्याच्या योजनेची माहितीही त्यांनी घेतली. मराठवाडा, विदर्भात याला चांगला प्रतिसाद आहे; पण इतरत्र या रकमेची फारशी मागणी नसल्याचे चर्चेत सहभागी अधिकाऱ्यांनी सांगितले. कर्जमाफीबाबत ज्या घोषणा झाल्या, त्याचे अध्यादेश अजून निघालेले नाहीत; पण लोक त्या आधारे कर्जमाफीसाठी येत असल्याचे काही जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. सुमारे दीड तास श्री. फडणवीस यांनी यासंदर्भातील माहितीवर चर्चा केली.