किरणोत्सव मार्ग "नो डेव्हलपमेंट झोन' करा - महेश जाधव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याला मोठी परंपरा आहे. त्यामुळे किरणोत्सव मार्गातील अडथळे काढण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. हा संपूर्ण मार्ग "नो डेव्हलपमेंट झोन' घोषित करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि महापालिका प्रशासनाकडे करणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर - श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याला मोठी परंपरा आहे. त्यामुळे किरणोत्सव मार्गातील अडथळे काढण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. हा संपूर्ण मार्ग "नो डेव्हलपमेंट झोन' घोषित करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि महापालिका प्रशासनाकडे करणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, येत्या 9 नोव्हेंबरपासून सलग तीन दिवस मंदिरात हा सोहळा होणार आहे. या काळात गर्दीचेही योग्य व्यवस्थापन केले जाणार आहे. 
किरणोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर देवस्थान समितीने आज महालक्ष्मी धर्मशाळा हॉल येथे किरणोत्सव अभ्यास समितीच्या सदस्यांशी बैठक झाली. त्यात किरणोत्सवातील अडथळे, मंदिरातील वातावरण, होणारी गर्दी आदी विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांना माहिती दिली. 

श्री.जाधव म्हणाले, ""अंबाबाई किरणोत्सवाचे महत्व अनेक ग्रंथामध्ये आहे. मात्र, मानवनिर्मीत अडथळे, हवेतील प्रदुषण यामुळे गेल्या काही वर्षापासून किरणोत्सव पुर्ण क्षमतेने होत नाही. त्यासाठी तज्ञांची किरणोत्सव अभ्यास समिती स्थापन केली. या समितीला देवस्थान समिती पूर्ण सहकार्य करणार आहे. किरणोत्सव मार्गातील डिजीटल फलक, अन्य अतिक्रमणे हटवली जावीत, यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला जाणार आहे. संध्यामठ, रंकाळा तलावामागील बांधकामे आणि एकूणच अडथळ्यांचा विचार करता या परीसराला "नो डेव्हलपमेंट झोन' घोषित करा, अशी मागणी महापालिकेकडे केली जाणार आहे. शासनाकडेही तशी मागणी केली जाणार आहे.'' 

देवस्थान समिती सदस्य सुभाष वोरा म्हणाले, ""किरणोत्सवाचे महत्व लक्षात घेता महापालिका आयुक्तांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. देवस्थान समिती नक्कीच त्यासाठी आग्रही असून पालकमंत्री पाटील यांच्याकडेही त्यासाठी पाठपुरावा केला जाईल.'' 

पत्रकार परिषदेला खजानिस वैशाली क्षीरसागर, सदस्या संगीता खाडे, शिवाजीराव जाधव, सचिव विजय पोवार, सुदेश देशपांडे, प्रा. किशोर हिरासकर, प्रा. मिलींद कारंजकर, प्रसन्न मालेकर, धनाजी जाधव, राजू मेवेकरी आदी उपस्थित होते. 

लोकप्रतिनिधी म्हणून अभ्यास समितीत घ्या - अजित ठाणेकर 
श्री करवीर निवासिनी आंबाबाई मंदीरातील किरणोत्सवात येणाऱ्या अडथळ्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय योजनेसाठी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे खगोल अभ्यासक, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते, महापालिकेचे अधिकारी यांची एक किरणोत्सव समिती गठीत केली आहे. 
या समितीने पूर्वी केलेल्या पाहणीनुसार काही इमारती किरणोत्सवास अडथळा ठरत आहेत, असा अभिप्राय दिला आहे.

समितीने किरणोत्सव मार्गातील महापालिकेच्या हद्दीत "नो डेव्हलपमेंट झोन' करण्याचा प्रस्ताव आणला आहे. या समितीने अभ्यासातील सुचवलेल्या बहुतेक इमारती या माझ्या प्रभाग क्रमांक 48 या हद्दीत येतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून या समितीत आपला समावेश करावा, अशी मागणी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी निवेदनाव्दारे केली.

श्री. ठाणेकर यांनी हे निवेदन आज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना दिले. अभ्यास समितीने या प्रभागातील लोकप्रतिनिधी अथवा नागरिकांना विश्वासात न घेताच सर्व अभ्यास केल्याचे दिसते,असेही त्यांनी या निवेदनात म्हटले आहे. 

Web Title: Kolhapur News Mahesh Jadhav Press