मराठा जागृती मेळावा १५ ऑक्‍टोबरला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - मराठा जागृती मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठ्यांची ताकद दाखविण्याचा निर्धार आज मराठा महासंघाच्या बैठकीत केला. कोल्हापुरातील मराठा मोर्चाला १५ ऑक्‍टोबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने शाहू स्मारक भवनात मेळावा होणार आहे. सर्वच समाज घटकातील बांधवांसह राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

कोल्हापूर - मराठा जागृती मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठ्यांची ताकद दाखविण्याचा निर्धार आज मराठा महासंघाच्या बैठकीत केला. कोल्हापुरातील मराठा मोर्चाला १५ ऑक्‍टोबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने शाहू स्मारक भवनात मेळावा होणार आहे. सर्वच समाज घटकातील बांधवांसह राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी मेळाव्यात सहभागी होणार आहेत.

महासंघाची वार्षिक आढावा बैठक शाहू स्मारक भवनात झाली. प्रा. सुनील शिंत्रे, धनाजी भोपळे-पाटील, प्रा. रवींद्र पाटील, एम. जी. पाटील, मारुती मोरे, सुरेश काटकर, डॉ. संदीप पाटील, राजू परांडेकर, विजय पाटील, संजय जाधव, राजेद्र घोरपडे, प्रकाश पाटील, शैलजा भोसले, सचिन पाटील, दीपक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शंकरराव शेळके, उदय जगताप अन्य मंडळी उपस्थित होते.

राज्यात मराठ्यांचे लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले; पण मागण्यांची पाटी अजूनही कोरीच आहे. आमदार, खासदारांना अजूनही जाग येत नाही. ते नुसते प्रश्‍न मांडतात; पण तडीस नेत नाहीत. जे उमेदवार मराठा आरक्षणाचा ठराव करण्याचा आश्‍वासन देतील त्यांनाच मतदान करण्याची भूमिका समाजाने घ्यायला हवी. राज्य शासन मागण्यांवर फारसे गंभीर नाही. किंबहुना, आरक्षणाच्या प्रश्‍नावरून ते दूर जात आहेत.

मुख्यमंत्र्यांनी मागासवर्गीय आयोगाकडे आरक्षणाचा प्रश्‍न पाठविण्याचे आश्‍वासन दिले; पण पुढे काहीच झाले नाही. भविष्यात रोजगारासाठी दुसऱ्याच्या दारी पदव्या घेऊन जावे लागेल इतकी वाईट अवस्था आहे. शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीत खुल्या वर्गातील शिक्षकच अतिरिक्त ठरले. रोस्टरची प्रक्रिया सदोष असल्याने मराठा शिक्षकांसमोर हा नवा प्रश्‍न उभा राहिला आहे. राजू परांडेकर यांनी, गेली ३७ वर्षे एस. टी. महामंडळाच्या सेवेत आहे; मात्र आरक्षणामुळे पदोन्नती न मिळाल्याची खंत व्यक्त केली. विजय पाटील यांनी शैक्षणिक कर्जावर व्याज आकारले जात नाही याची माहितीच बॅंका देत नसल्याचे सांगितले. ज्यांना शैक्षणिक कर्ज हवे आहे, त्यांना व्याज भरावे लागत नाही हे ध्यानात ठेवावे.

प्रकाश पाटील यांनी कुणबी हा कुलवाडीच आहे, त्यामुळे शैक्षणिक सुविधेसाठी मराठा समाजाने कुणबीचे दाखले काढावेत, असे आवाहन केले. सचिन पाटील यांनी रेसिडेन्सी क्‍लबच्या निवडणुकीत साडेआठशे मते मराठ्यांची असताना वाट्याला केवळ चारच जागा दिल्याचे सांगून मराठा समाजाने प्राधान्यक्रमाने मराठा उमेदवारांनाच मतदान करावे, असे आवाहन केले.

समारोप भाषणात मुळीक यांनी कोपर्डी घटनेतील नराधमांना फाशी, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक प्रश्‍न प्रलंबित असून दबावगट निर्माण करणे हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. मराठा भवनाच्या जागेचा प्रश्‍न शेवटच्या टप्प्यात असून मागण्यांवर यापुढे कोणती भूमिका घ्यायची यासाठी १५ ऑक्‍टोबरला जागृती मेळाव्यात दिशा ठरविणार असल्याचे सांगितले.

Web Title: kolhapur news Maratha Jagruti Melava