मराठा आरक्षण आंदोलनाचे गोलमेज परिषदेनंतर रान पेटविणार - सुरेशदादा पाटील

मराठा आरक्षण आंदोलनाचे गोलमेज परिषदेनंतर रान पेटविणार - सुरेशदादा पाटील

कोल्हापूर - येत्या १२ मार्चला कोल्हापुरात गोलमेज परिषद घेऊन राज्यात मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन पुन्हा पेटविण्याचा निर्धार मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी येथे केला.

मराठा संघटनेतर्फे आयोजित मराठा आरक्षणविषयक बैठकीत ते बोलत होते. या वेळी येत्या अधिवेशनात मराठा आरक्षण देण्याबद्दल निर्णय झाला नाही तर पुढील अधिवेशन होऊ देणार नाही. आमदारांना त्यांच्या घरातच कोंडून ठेवू, असा इशाराही बैठकीत दिला. राज्यातील मराठा समाजाचे एकमुखी नेतृत्व श्री. पाटील यांनी करावे, असा ठरावही केला. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये बैठक झाली.

 ‘‘येत्या वर्षात मराठा समाजातील मुला-मुलींचे शैक्षणिक शुल्क शासनाने भरण्याची तरतूद करावी. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन आरक्षण कधी देणार, याचा खुलासाही करावा.’’

- सुरेशदादा पाटील

श्री. पाटील म्हणाले, ‘‘मराठा समाजातील मुला-मुलींना शिक्षणात आरक्षण द्यावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ मराठा समाजापुरते सीमित करावे, अरबी समुद्रात शिवरायांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करावी, या मागण्यांसाठी राज्यातील संघटनांच्या एकीकरणातून मराठा आरक्षण चळवळ सुरू केली. राज्यात लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचे ५७ मोर्चे काढले. या मोर्चांकडे सोयीस्करपणे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्याने आता शांत बसून चालणार नाही. शासनाने काही मराठा संघटनांना आमिषे देऊन दाबून टाकले आहे. समाजाच्या पदरात काहीच पडलेले नाही. त्यामुळे १७ संघटनांच्या एकीकरणातून पुन्हा आंदोलनाची वेळ येऊन ठेपली आहे.’’ 

मराठा संघटनेचे अध्यक्ष बाळ घाटगे म्हणाले, ‘‘मराठा समाजात फूट पाडण्याचे राजकारण सरकार करत आहे. आरक्षण देण्यासाठी कायद्यातील अडचणी दूर करण्याची आश्‍वासने दिली जात आहेत. चार मराठा नेत्यांना धरून सरकार नोकऱ्या देणारे मराठा तरूण तयार करण्याच्या वल्गना करत आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांची पायरी न चढलेल्या मराठा समाजात उद्योजक कसे तयार होणार? ही केवळ फसवाफसवी आहे. मराठ्यांची चळवळ मोडून काढण्याचे हे धोरण आहे.’’

‘‘पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा; अन्यथा जनप्रक्षोभ झाल्यास त्याची जबाबदारी त्यांच्यावर राहील.’’

- बाळ घाटगे, अध्यक्ष, मराठा संघटना

राजू सावंत यांनी  आरक्षणाबाबत न्याय न मिळाल्यास सरकार उलथवून टाकण्याचा इशारा दिला.

या प्रसंगी श्रीकांत घाटगे, किशोर घाटगे, चंद्रकांत पाटील, ॲड. सुरेश कुऱ्हाडे, परेश भोसले, संतोष कांदेकर, प्रताप पाटील, रमेश पाटील उपस्थित होते. प्रा. मधुकर पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com