बाजार समितीत ई-सौदे - सर्जेराव पाटील

बाजार समितीत ई-सौदे - सर्जेराव पाटील

कोल्हापूर - ‘‘स्थानिक शेतीमालास परप्रांतातील बाजारपेठेत स्थान मिळण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘ई-ऑक्‍शन’ प्रणालीद्वारे सौदे प्रक्रिया येथील शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे येथील शेतीमालाचा लौकिक सर्वदूर पोचण्याबरोबर आर्थिक उलाढालीलाही बळ मिळणार आहे,’’ अशी माहिती जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सर्जेराव पाटील यांनी आज येथे वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.  
श्री. पाटील म्हणाले, ‘‘शेतीमाल खरेदी-विक्री व्यवहार आधुनिक पद्धतीने व जलदगतीने व्हावेत, यासाठी केंद्र शासन ई-ऑक्‍शन प्रणाली अंमलात आणत आहे. त्यासाठी देशातील ३० बाजार समित्यांची निवड झाली आहे. त्यात कोल्हापूरच्या बाजार समितीचा समावेश आहे. 

कृषी विपणन संचलनालयातर्फे राष्ट्रीय बाजार ही संकल्पना घेऊन ई-ऑक्‍शन योजना चालवली जाईल. त्यासाठी आवश्‍यक साधनसामुग्री बाजार समितीला मिळाली आहे. त्याची जोडणीही झाली आहे. त्यानुसार संकेतस्थळावर बाजारभाव व अडते, व्यापारी यांची जरूर ती माहिती टाकली जाणार आहे. यात पहिल्या टप्प्यात कोबी, फ्लॉवर, टोमॅटो या शेतीमालाची ऑनलाईन व मोबाईल ॲपद्वारे सौदे बोली लावण्यात येणार आहे.’’

गूळ या शेतीमालास भौगोलिक उपदर्शन मिळाले आहे. येथील गूळ निर्यातीला चालना मिळावी, तसेच येथील शेतकऱ्याला मदत मिळावी यासाठी जीआयच्या निकषानुसार गूळनिर्मिती व्हावी. यासाठी बाजार समितीकडून गूळ उत्पादकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले. या वेळी शेतकऱ्यांनी विविध प्रश्‍न विचारले. 

शेतकरी प्रतिनिधी भगवान काटे म्हणाले, ‘‘गुळाला जीआय मिळाला. त्याचा वापर कसा करावा, याबाबत गूळ उत्पादकांत संभ्रम आहे. त्यामुळे बाजार समितीने गूळ उत्पादक तज्ज्ञांची समिती नियुक्ती करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.’’ 

रंगराव साबळे यांनी, गुळाचे बॉक्‍ससह वजन करून त्यानुसार पैसे द्यावेत, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. अद्याप अंमलबजावणी का नाही? तसेच शालेय पोषण आहारात गुळाचा समावेश का झालेला नाही, असे सवाल उपस्थित केले. 

प्रसाद वळंजू म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी बाजार समितीला माल आणला तरी सौदे व्यवहार होणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा शेतीमाल येथे यावा यासाठी अडते, व्यापारी वर्गाला सौदे सक्षमपणे काढण्यासाठी सोयी-सुविधा पुरविणे आवश्‍यक आहे. यात स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे.’’ 

बाजार समितीचे संचालक विलास साठे यांनी वरील प्रश्‍नांना उत्तरे दिली. ते म्हणाले, ‘‘गुळाला जीआयसंदर्भात बाजार समितीतर्फे मार्गदर्शन करण्यात येत आहे. गूळ बॉक्‍स वजनासंदर्भात स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. गुळाचा पोषण आहारात समावेश व्हावा, यासाठी बाजार समिती पाठपुरावा करीत आहे. त्यासाठी रसायनविरहित गुळाची निर्मिती होणे आवश्‍यक आहे. गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प उभारल्यानंतर बाजार समितीच्या स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लागेल.’’ 

उपसचिव मोहन सालपे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी बाजार समितीचे उपाध्यक्ष आशालता पाटील, सचिव दिलीप राऊत, व्यापारी प्रतिनिधी नंदकुमार वळंजू, संचालक परशुराम खुडे, उदयसिंग पाटील, विलास साठे, कृष्णात पाटील, बाबासाहेब लाड, दशरथ माने, उत्तम धुमाळे, शारदा पाटील, संजय जाधव, शेखर येडगे, ॲड. किरण पाटील, संजय साने, सदानंद कोरगावकर, अमित कांबळे, संगीता पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com