कोल्हापूर जिल्हा परिषदेतील औषध घोटाळा चौकशीसाठी सर्वपक्षीय, तज्ज्ञांची समिती

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील औषध घोटाळा चौकशीसाठी सर्वपक्षीय, तज्ज्ञांची समिती

कोल्हापूर - जिल्हा परिषदेत झालेल्या औषध घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी सर्वपक्षीय व तज्ज्ञांची नवी समिती नियुक्त केली जाणार. नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या नावावर असणाऱ्या भूखंडावर डल्ला मारणाऱ्या व्यक्तीची आणि त्याला मदत करणाऱ्या सर्व महसूल आणि जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचा ठरावही आजच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी आरोग्य घोटाळ्याची जबाबदारी निश्‍चित करावी, अशी मागणी करण्यात आली. पाणीपुरवठा विभागाच्या सुषमा देसाई यांच्या अकार्यक्षमतेमुळे सदस्यांनी त्यांना फैलावर घेतले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक अध्यक्षस्थानी होत्या. 

‘अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही, तर सभा रद्द करा’
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा तीन महिन्यांतून एकदा होते. त्यातही अनेक विभागांचे अधिकारी गैरहजर असतात. त्यांना सभेचे गांभीर्य नाही. रोज वागतात तसेच ते वागत आहेत. अधिकारीच जर सभेला येत नसतील तर आजची सभा रद्द करा, अशी मागणी सर्वच सदस्यांनी केली.

जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील औषध घोटाळा गाजत आहे. अधिकारी घोटाळा करणार आणि सदस्यांची बदनामी होत आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना वठणीवर आणले पाहिजे, त्यासाठी आज जिल्हा परिषदेचे सदस्य राजवर्धन निंबाळकर, सतीश पाटील, मनोज फराकटे, भगवान पाटील, अरुण इंगवले व विजय भोजे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. एवढा मोठा घोटाळा होत असून, त्याची चौकशी सुरळीतपणे आणि वेळेत केली जात नाही. ज्यांच्यावर या घोटाळ्याची जबादारी निश्‍चित करायला पाहिजे, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

दरम्यान, या घोटाळ्याची प्राथमिक तपासणी डॉ. उषादेवी कुंभार, सोनवणे तसेच इतर अधिकाऱ्यांनी केली. मात्र, ज्यांनी यापूर्वी गैरव्यवहार केला आहे, तेच आता या प्रकरणाची तपासणी कसे करू शकतात, असा सवाल राजवर्धन निंबाळकर यांनी उपस्थित केला.

श्री. निंबाळकर म्हणाले, ‘‘एवढ्या मोठ्या रकमेचा घोटाळा होतो. अधिकारी त्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. सदस्यांनी मागितलेली माहिती योग्य आणि वेळेत दिली जात नाही, हे प्रकरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना माहिती होते, तर त्यांनी वेळीच त्यावर कारवाईचा बडगा उगारला असता तर ही वेळ आली नसती. त्यामुळे डॉ. खेमणार यांच्यावरही या घोटाळ्याची जबाबदारी निश्‍चित करावी. 
डॉ. खेमणार म्हणाले, ‘‘आरोग्य विभागातील गैरव्यवहार समजल्यानंतर तत्काळ कारवाईची सूत्रे हलवली आहेत.

चौकशी अहवालावरून आरोग्य विभागाचे डॉ. प्रकाश पाटील यांना तत्काळ सक्तीच्या रजेवर पाठविले होते. त्यानंतर औषध भांडारप्रमुख चौगुले यांनाही रजेवर पाठविले आहे. चौकशी अहवालात काही बाबींची कमतरता होती, त्यात अनेक मुद्दे वाढवून पारदर्शी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आतापर्यंत काही विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यापर्यंतची कारवाई केली आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील कारवाईही पारदर्शीच होईल.’’

ज्येष्ठ नेते अरुण इंगवले म्हणाले, ‘‘औषध घोटाळ्याच्या पहिल्या अहवालावरून प्रथमदर्शनी जे अधिकारी दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी. चौकशीदरम्यान हे अधिकारी इतरत्र बदली करून घेतील, हा धोका टाळण्यासाठी त्यांच्यावर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. या सर्व घोळात जिल्हा परिषद आणि सदस्यांची मोठी बदनामी होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे.’’ 

विजय भोजे म्हणाले, ‘‘मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सर्वांनी औषध घोटाळ्याकडे जबाबदारीने पाहिले पाहिजे. जो-जो अधिकारी याला जबाबदार आहे, तो-तो सर्वांसमोर आला पाहिजे. याशिवाय, साजणी (ता. हातकणंगले) येथील पाणीपुरवठा विभागातील चौकशीबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी सुषमा देसाई केवळ चालढकल करतात. त्यांना कोणतीही माहिती सक्षमपणे सांगता येत नाही. देसाई यांनी दोन वर्षांत जिल्ह्यातील असे कोणते गाव आदर्श केले, त्याचे नाव सांगावे. वास्तविक, देसाई यांच्यासह इतर सर्वच अधिकाऱ्यांची चौकशी करावी, यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन दिले जाईल.’’ 

प्रदीप झांबरे व शिवाजी मोरे यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची जमीन खासगी नावाने विक्री करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली पाहिजे. याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना जिल्हा परिषदेचा वकील या खटल्याच्या तारखेला जातही नाही, हे चुकीचे आहे. औषध घोटाळ्याबरोबर जमीन विक्री घोटाळाही हा मोठा प्रकार आहे. आरोग्य विभागाच्या जमिनीवर एका बाजूला इमारत आहे, तर दुसऱ्या बाजूला याच आरोग्य विभागाची जमीन खासगी मालकाने घेतली आहे. जिल्हा परिषदेने अशा सर्वच जमिनींचा छडा लावला पाहिजे, अशी मागणीही मोरे व झांबरे यांनी केली.

दरम्यान, स्वाती सासने, प्रा. अनिता चौगुले, हेमंत कोलेकर, शिल्पा पाटील, पांडुरंग भांदिगरे, रेश्‍मा देसाई, राहुल आवडे, भगवान पाटील, प्रसाद खोबरे, डॉ. पद्माराणी पाटील यांनी आरोग्य, पाणीपुरवठा व शिक्षण विभागतील विविध साहित्याची मागणी करून माहिती घेतली. या वेळी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, शिक्षण समिती सभापती अंबरिशसिंह घाटगे, समाजकल्याण समिती सभापती विशांत महापुरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, महिला व बालकल्याण समिती सभापती शुभांगी शिंदे उपस्थित होते.  

‘भालेरावांना मोबाईल घेऊन द्या’ 
उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांना सदस्यांबरोबर कसे बोलावे, हे समजत नाही. पाहू तेव्हा त्यांनी तोंड मोबाईलमध्ये घातलेले असते. त्यामुळे, जिल्हा परिषदेतील काम करण्याऐवजी त्यांना एक चांगला मोबाईल घेऊन द्यावा, म्हणजे ते काम तर नीटपणे करतील, अशी मागणी सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी केली. 

‘मॅडम, तुम्ही बिनकामाच्या आहात’
पाणीपुरवठा विभागाकडे अनेक कामे आणि तक्रारी आहेत. या कोणत्याही तक्रारीचे निराकरण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी सुषमा देसाई यांच्याकडून होत नाही. दोन वर्षांत देसाई यांनी कोणते गाव सांडपाणीमुक्त करून आदर्श निर्माण केला, हे जाहीर करावे, असे आव्हान देत पक्षप्रतोद विजय भोजे यांनी देसाई यांना फैलावर घेतले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com