उद्योगांचे स्थलांतर थांबणार? 

उद्योगांचे स्थलांतर थांबणार? 

कोल्हापूर - देशात उद्योगक्षेत्रात आघाडीवर असलेले राज्य असा महाराष्ट्राचा लौकिक आहे, मात्र अलीकडच्या काळात शेजारील कर्नाटक, गुजरात ही राज्ये सवलतींचा वर्षाव करून महाराष्ट्रातील उद्योजकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग स्थलांतरांच्या दिशेने पाऊल उचलू लागला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील उद्योगांच्या स्थितीबाबत घेतलेला वेध... 

कर्नाटककडून "रेडकॉर्पेट' 
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात शिरोली, गोकुळ शिरगाव, तसेच कागल पंचतारांकित या मोठ्या तर हलकर्णी, गडहिंग्लज, आजरा, हातकणंगले आदी छोट्या औद्योगिक वसाहती आहेत. येथे सुमारे लाखापर्यंत तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. शिवाजी उद्यमनगर, वाय. पी. पोवार औद्योगिक वसाहत, पांजरपोळ अशा जुन्या औद्योगिक वसाहतींतून अनेकांच्या हाताला काम मिळाले. 

अलीकडच्या काळात मात्र कोल्हापुरातील उद्योजकांना कर्नाटकातून "रेडकार्पेट'ला घातले जात आहे. स्वस्त वीज, जमीन या सुविधांचे गाजर दाखविले जात आहे. काही उद्योजकांनी स्वस्त जमीन मिळते म्हणून सकारात्मक प्रतिसादही दिला आहे. महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात वीज युनिटला दोन रुपये स्वस्त आहे. कर्नाटकात औद्योगिक वसाहतीत भारनियमन नाही. शिवाय जमीन व अन्य पायाभूत सुविधा सवलतीत देण्याची "ऑफर'ही कर्नाटक देऊ करत असल्याने उद्योजकांना प्राथमिक पातळीवर तरी कर्नाटकचे आकर्षण वाटू लागल्याची स्थिती आहे. 

मराठवाड्यात रोजगाराची समस्या जटिल 
औरंगाबाद - राज्याच्या औद्योगिक वसाहतींमधील जागा आता संपुष्टात आल्या आहेत. "एमआयडीसी' म्हणजे उद्योग ही संकल्पना सरकारने सोडून "नॉन एमआयडीसी' भागामध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या, तर परराज्यात जाणारे उद्योग हे थांबू शकतात. सध्या मराठवाड्यातील उद्योगांना हवी तशी भरारी मिळालेली नाही. नवीन उद्योग हे मराठवाडा वगळून इतर ठिकाणांना, इतर राज्यांना जास्त पसंती देतात. त्यामुळे येथे रोजगाराच्याही समस्या निर्माण झाल्या आहेत. येथील उद्योगांना पायाभूत सुविधांची मोठी अडचण आहे. उद्योगच नाही तर आता कुशल मनुष्यबळही राज्यातून बाहेर जात असल्याने पाय रोवून उभ्या असलेल्या उद्योगांनाही याचा फटका बसतो आहे. 

नाशिकमध्ये चार मोठे उद्योग बंद 
नाशिक : नाशिक जिल्ह्यामध्ये साडेचार हजारांहून अधिक छोटे- मोठे उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये साडेतीन लाखांहून अधिक कामगारांना रोजगार मिळाला आहे. परंतु, गेल्या पंधरा वर्षांचा विचार करता नाशिकमध्ये रोजगार निर्मिती होईल असा एकही छोटा, मोठा प्रकल्प आला नाही. त्यामुळे उद्योगांचे विस्तारिकरण पंधरा वर्षांपूर्वीच थांबले आहे. गेल्या तीन वर्षांत मेक इन महाराष्ट्र उपक्रमांतर्गत महिंद्रा ऍण्ड महिंद्रा कंपनीत पंधराशे कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा करण्यात आली; परंतु, विस्तारीकरणाची अंमलबजावणी झाली नाही. पतंजली फुडसचे उत्पादन देखील नाशिकमधून करण्याची घोषणा याच उपक्रमांतर्गत करण्यात आली होती; मात्र ती अद्याप घोषणाच राहिली. त्याव्यतिरिक्त इप्कॉस, मायको व एबीबी कंपन्यांमध्ये गुंतवणूक झाली; परंतु आउटसोर्सिंगने कामे करून घेण्याची पद्धत सुरू झाल्याने त्यातून उत्पादन वाढले; परंतु रोजगार निर्मिती झाली नाही. स्वयंचलित यंत्रांमुळे रोजगार निर्मितीला मर्यादा आल्याचे एक कारण त्यामागे आहे. उद्योग तर आले नाही व विस्तारिकरणदेखील घोषणेचाच भाग बनले असताना दुसरीकडे मात्र तीन मोठ्या उद्योगांचे अन्य राज्यांमध्ये स्थलांतर झाले आहे. त्यात स्पायडर इलेक्‍ट्रॉनिक्‍स कंपनीचे स्थलांतर झाल्याने साडेचारशे कामगारांना रोजगारापासून वंचित राहावे लागले, एशियन इलेक्‍ट्रॉनिक्‍स व आयटी उद्योग क्षेत्रातील ट्रायकॉम कंपनी बंद पडल्याने सहाशेहून अधिक रोजगार कमी झाला आहे. 

सोलापुरात पायाभूत सुविधांचाच अभाव 
सोलापूर - सोलापुरात अक्कलकोट रोड एमआयडीसी व चिंचोळी एमआयडीसीत सुरू असलेल्या उद्योगांपैकी एकही उद्योग परराज्यात स्थलांतर झाला नाही; परंतु येथे पायाभूत सुविधांचा अभाव; तसेच असंख्य कामगार संघटनांमुळे बाहेरील उद्योजक यायला धजत नाहीत. 

सोलापुरातील उद्योग टिकावेत व बाहेरील उद्योग येथे येण्यासाठी पायाभूत सुविधांसह लोकप्रतिनिधींची इच्छाशक्तीही तितकीच महत्त्वाची ठरते. दरम्यान, सोलापुरातील विमानसेवा सुरू झाल्यास व व्यापक पायाभूत सुविधा दिल्यास बाहेरील उद्योग येथे येण्यास अनुकूल वातावरण निर्माण होईल, असे मत सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com