दूध दरकपात कराल तर ६ वर्षे अपात्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - ‘शासनाने निश्‍चित केलेला गाय आणि म्हशीचा दूध दर न देणाऱ्या सहकारी दूध संघांच्या संचालकांना सहा वर्षे अपात्र ठरविले जाईल. तसेच, संघाच्या संबंधित सेवकांना तत्काळ सेवेतून कमी केले जाईल,’ अशी नोटीस कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी दूध संघासह (गोकुळ) पुणे विभागातील अकरा दूध संघांना गायीच्या नियमबाह्य दूध दरकपातीबाबत विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी नोटीस बजावली आहे. 

कोल्हापूर - ‘शासनाने निश्‍चित केलेला गाय आणि म्हशीचा दूध दर न देणाऱ्या सहकारी दूध संघांच्या संचालकांना सहा वर्षे अपात्र ठरविले जाईल. तसेच, संघाच्या संबंधित सेवकांना तत्काळ सेवेतून कमी केले जाईल,’ अशी नोटीस कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी दूध संघासह (गोकुळ) पुणे विभागातील अकरा दूध संघांना गायीच्या नियमबाह्य दूध दरकपातीबाबत विभागीय उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी नोटीस बजावली आहे. 

गायीच्या दूध दरात २ रुपयांची कपात करून शासनाच्या नियमाला हरताळ फासण्याचे काम केले गेले आहे. त्यामुळे गोकुळचे संचालक मंडळ अपात्र ठरवून प्रशासकाची नियुक्ती करण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी विभागीय उपनिबंधक शिरापूरकर यांच्याकडे केली होती.  या मागणीनुसार गोकुळलाही गायीचे दूध दरकपात केल्याप्रकरणी संचालक मंडळ अपात्र ठरविण्याबाबत नोटीस दिल्याने सहकार विभागात खळबळ उडाली. 
विभागीय उपनिबंधकांनी दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे, की राज्यातील सहकारी दूध संघाने त्यांच्याकडे संकलित होणाऱ्या दुधाला शासनाने ठरवून दिलेले दरच दिले पाहिजेत. राज्यातील काही संघांनी गायीच्या दूध दरात दोन रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे, शासनाचा नियमभंग झाला आहे. वास्तविक शासनाने शेतकऱ्यांच्या दुधाला कामाचे दाम मिळावेत या हेतूने ही दरनिश्‍चिती केली आहे. तरीही, सहकारी संघाकडून अधिनियमांचा भंग करून गायीच्या दूध दरात दोन रुपयांची कपात केली जात आहे. शासनाने निश्‍चित केलेले दूध दरच देणे बंधनकारक असून, जे संघ शासन निश्‍चितीनुसार दर देत नाहीत, त्या संघांच्या संचालकांना सहा वर्षे अपात्र ठरविले जाईल. 

गोकुळच्या इतिहासातील ‘काळा दिवस’
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उसाचा जास्तीत जास्त दर मिळावा यासाठी कारखानदार एकत्र येत आहेत. तर, दुसरीकडे शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या गायीच्या दुधाच्या दरात कशी कपात केली जाईल, त्यासाठी गोकुळच पुढाकार घेऊन सहकारी दूध संघांची बैठक़ घेत आहे. संघाचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर आज असते तर अशी बैठक घेऊन शेतकऱ्यांचे नुकसान कधीच केले नसते; पण विद्यमान संचालकांकडून शेतकऱ्यांना दुधाचा दर मिळू नये यासाठी घेतली जाणारी बैठक म्हणजे गोकुळच्या इतिहासातील उद्याचा ‘काळा दिवस’च समजावा लागणार आहे.’’

पुणे विभागातील ११ संघांना नोटीस
पुणे जिल्ह्यातील अकरा दूध संघांनी गायीचे दूध दर कमी केले आहेत. यामध्ये गोकुळसह सांगलीतील ४, सातारा ४ व पुण्यातील २ संघांच्या संचालकांना दूध दर कपातीवरून विभागीय उपनिबंधकांनी नोटीस दिली आहे. 

दूध दरकपातीसाठी आज गोकुळची बैठक
गायीचे दूध दरकपात केली आहे. कमी केलेले हे दर पुन्हा वाढविणे अशक्‍य आहे; पण शेतकऱ्यांमधून दूध दरवाढ करावी अशी मागणी होत आहे. यासाठी उद्या गोकुळच्या वतीने बैठक घेतली जाणार आहे.