‘एमकेपीएल’चा शड्डू खासबागेत घुमणार

‘एमकेपीएल’चा शड्डू खासबागेत घुमणार

कोल्हापूर -  आठ देशांतील मल्ल...प्रत्येक संघात आठ मल्ल...त्यात दोन महिला कुस्तीपटू आणि मॅटवरील कुस्तीच्या काटाजोड लढती...हे सांगितल्यावर कुस्तीचे हे मैदान परदेशात कोठेतरी होत असेल, असे वाटण्याची शक्‍यता आहे. मात्र, कुस्तीप्रेमींसाठी आनंदाची बाब म्हणजे हे मैदान कोल्हापुरात डिसेंबरमध्ये होणार आहे. राजर्षी छत्रपती शाहू खासबाग मैदानात ‘महाराष्ट्र कुस्ती प्रीमियर लीग’चा (एमकेपीएल)अनोखा थरार कुस्तीप्रेमींना अनुभवता येणार आहे. कबड्डीपाठोपाठ कुस्तीलाही ‘ग्लॅमर’ मिळणार असून, कुस्तीपटूंना लिलावाद्वारे संघात घेतले जाणार आहे. 

भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने एमकेपीएल होत आहे. अहमदनगर जिल्हा कुस्ती संघटनेतर्फे त्याचे संयोजन करण्यात येत असून, युक्रेन, मंगोलिया, इराण, अमेरिका, स्वित्झर्लंड, तुर्कस्तान, युरोप व भारतातील मल्लांचे लिलावाद्वारे आठ संघ तयार केले जाणार आहेत. कुस्तीपंढरी कोल्हापुरात लीगचे उद्‌घाटन होणार आहे. कोल्हापूर, पिंपरी चिंचवड व अहमदनगर या ठिकाणी लीग होणार असून, कोल्हापुरात तीन दिवस कुस्ती लढती होतील. उपांत्य व अंतिम फेरीतील लढती अहमदनगरमध्ये होणार आहेत. लीगचे हे पहिलेच वर्ष असल्याने कुस्तीप्रेमींना विनाशुल्क लढती पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे. 

आंतरराष्ट्रीय नियमांनुसार मॅटवर कुस्ती लढती होणार आहेत. प्रत्येक संघ उद्योजकांकडून पुरस्कृत केला जाणार असून, पन्नास हजारांपासून बोली लावली जाणार आहे. वीस लाख रुपयांत आठ मल्ल घ्यायचे आहेत. कोल्हापुरातील न्यू मोतीबाग तालमीतील डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, बाला रफिक शेख, मारुती जाधव, राजर्षी शाहू विजयी गंगावेसमधील मारुती जमदाडे, पुण्यातील विक्रम कुऱ्हाडे, सेनादलचा संदीप पाटील यांच्यावर बोली लागणार आहे. याविषयी लीगचे मुख्य संयोजक वैभवदादा लांडगे म्हणाले, ‘‘जो मल्ल संघाशी करारबद्ध होईल, त्याच्या वर्षभराच्या खुराकाची तरतूद होईल. लीगमधून कुस्तीपटूंना पैसे मिळावेत आणि कुस्तीचा प्रसार व्हावा, हीच आमची इच्छा आहे.’’ 

छबूराव रानबोके यांच्या स्मृती
लीगचे मुख्य संयोजक वैभवदादा लांडगे यांचे आजोबा छबूराव रानबोके (लांडगे) हे १९४० ते १९५० कालावधीतील नामांकित मल्ल होते. त्यांनी बडोद्यातील मैदानात छोटा गामा व हैदर पैलवान यांना हरविले होते. त्यानंतर ते ‘दख्खनका काली चिता’ या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘दख्खनका काला चिता’ असे एका संघाचे नाव ठेवले आहे.

संघांची नावे अशी : 
 कोल्हापूरचा ढाण्या वाघ
 सह्याद्रीचा हिंद
 दख्खनका काली चिता 
 पुणेरी पॉवर
 विदर्भ वॉरिअर
 मराठवाड्याचा योद्धा
 किर्लोस्कर कोब्रा
 मुंबईचा राजा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com