मोहरम बनला कोल्हापूरकरांच्या बांधिलकीचे प्रतीक

मोहरम बनला कोल्हापूरकरांच्या बांधिलकीचे प्रतीक

कोल्हापूर - गल्लीतच काय; पण आसपासच्या चार गल्लीत कोणी मुसलमान रहात नाही. तरीही गल्लीतल्या तालमीत पंजा (पीर) बसलेला. त्याचे धार्मिक विधी अगदी कडक; पण ते विधी पूर्ण खबरदारी घेऊन सांभाळले जाणारे. हे सारे श्रद्धेने करणारे सर्वजण बहुजन समाजातले. कोणताही भेदभाव नाही, धर्माची भिंत तर कधीच पुसून गेलेली. अशा एका वेगळ्या बांधिलकीतून कोल्हापुरात मोहरम साजरा करण्याची परंपरा आहे आणि बदलत्या काळातही थोडेफार बदल स्वीकारत ती जपली गेली आहे.

कोल्हापुरातील बहुतेक तालमीत जसा गणेशोत्सव तसा मोहरम ठरूनच गेलेला आहे.
कोल्हापुरात आजही संमिश्र वस्ती आहे. काही विशिष्ट भागात विशिष्ट धर्माचे रहिवाशी जादा संख्येने असले तरी आसपासचा संमिश्र वावर एवढा निकटचा आहे की एकोप्याचे वातावरण आहे. किंबहुना हा एकोपाच कोल्हापूरची खरी ओळख आहे.

या एकोप्याचे एक प्रतीक म्हणजे मोहरम. कोल्हापुरात बाबूजमाल, घुडणपीर, बाराईमाम, काळाईमाम, वाळव्याची स्वारी, आप्पा शेवाळे, सरदार तालीम, अवचीत पीर, जुना बुधवार, नंगीवली तालीम, भुई गल्ली, नारायण मोढे तालीम, असे मोठे पंजे आहेत. तत्कालीन परिस्थितीत तालीम संस्था म्हणजे आदर आणि जरब असणारे ठिकाण होते. अनेक सामाजिक, राजकीय चळवळीचे केंद्र तालीमच होते. त्यामुळेच सर्वधर्मसमभाव राखण्याचा संदेश तालमीतून दिला गेला. वर वर मुस्लिम भाविक मोठ्या संख्येने असलेला मोहरम हिंदू बांधवांनीच श्रद्धेने उचलून धरला व तो कोल्हापूरच्या धार्मिक एकोप्याचे प्रतीक ठरला.

कोल्हापुरातल्या बहुतेक सर्व तालमीत पंजाची विधीपूर्वक प्रतिष्ठापना केली जाते. पंजे भेटीच्या कार्यक्रमाला तर गणेश उत्सव सोहळ्यासारखे लखलखाटाचे स्वरूप येते. येथे प्रतिष्ठापना केले जाणारे काही पंजे पन्हाळा, विशाळगड, औरवाड, गौरवाड, वाळवा, शिरोळ या भागात त्यांच्या मूळ स्थानी भेटीला नेले जातात. बाबूजमाल, घुडणपीर व बाराईमाम दर्ग्यातील पंजांना या मोहरमच्या काळात विशेष महत्त्व आहे. खत्तल रात्र म्हणून पाळल्या जाणाऱ्या रात्री शहरातले बहुसंख्य पंजे या तीन ठिकाणी भेटीस येतात. तेथे भेटीचा सोहळा होतो. 

सामाजिक इतिहासात नोंद 
तीन वर्षांपूर्वी अंबाबाईचा रथ व मोहरमची खत्तल रात्र एका दिवशी होती. त्या वेळी प्रथम मान अंबाबाईचा म्हणून पंजाची मिरवणूक रथ पुढे जाईपर्यंत थांबवण्यात आली होती. परस्परांचा आदर राखणारी व मान ठेवणारी ही घटना कोल्हापूरच्या सामाजिक इतिहासात एक वेगळी नोंद करणारी ठरली. काही वर्षांपासून मोहरमच्या मिरवणुकीत डॉल्बीने प्रवेश केला. वास्तविक मोहरम हा दुखवटा व्यक्त करणारा धार्मिक सोहळा; पण त्यातही डॉल्बी घुमू लागला. आता यावर्षी मात्र कारवाई होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com