इचलकरंजीतील सात जणांना मोक्का

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - संघटित गुन्हेगारी करणाऱ्या इचलकरंजी, शहापूर येथील पीआर बॉईज व जिंदाल या दोन टोळ्यांतील सात जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्याला विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी परवानगी दिली असल्याचे अपर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी सांगितले. 

कोल्हापूर - संघटित गुन्हेगारी करणाऱ्या इचलकरंजी, शहापूर येथील पीआर बॉईज व जिंदाल या दोन टोळ्यांतील सात जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्याला विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी परवानगी दिली असल्याचे अपर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी सांगितले. 

मोक्कांतर्गत कारवाई केलेल्यांची नावे अशी, पीआर बॉईज गॅंगचा टोळीप्रमुख - प्रवीण दत्तात्रय रावळ, अजित आप्पासाहेब नाईक, श्रीधर विद्याधर गस्ती, जिंदाल टोळीचा प्रमुख - किशोर सुरेश जैंद ऊर्फ जिंदाल, शहारूख आरीफ सुतार, सूरज अब्दुल शेख आणि केशव संजय कदम. हप्तेवसुली, गंभीर गुन्हे, तस्करी, सुपारी दादा, खून, अपहरण, अमली पदार्थांची विक्री, समाजात दहशत निर्माण करण्याचे प्रकार संघटित गुन्हेगारांकडून करण्याचे प्रमाण जिल्ह्यात वाढू लागले. त्याविरोधात विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या नेतृत्वाखाली व्यापक कारवाईची मोहीम राबविली.

त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा आणि गडहिंग्लजचे अपर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी त्याचा जिल्हा कृती आराखडा तयार केला. त्यानुसार शहापूर आणि हातकणंगलेसह परिसरात संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळींवर कारवाईचा धडाका सुरू केला. त्यानुसार पीआर बॉईज गॅंग टोळीचा प्रमुख प्रवीण रावळ, अजित नाईक आणि श्रीधर गस्ती आणि जिंदाल टोळी प्रमुख किशोर जैंद ऊर्फ जिंदाल, शहारूख आरीफ, सूरज शेख आणि केशव कदम यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ ‘मोक्का’ अंतर्गत कारवाईचे प्रस्ताव तयार केले.

त्या प्रस्तावास विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी परवानगी दिली. पीआर बॉईजवर शहापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एस. एल. डुबल तर जिंदाल टोळीवर इचलकरंजी पोलिस उपाधीक्षक विनायक नरळे यांनी कारवाई करून प्रस्ताव पाठवले. या दाखल गुन्ह्याचा तपास जयसिंगपूरचे पोलिस उपाधीक्षक रमेश सरवदे तर गडहिंग्लजचे उपाधीक्षक आर. आर. पाटील हे करीत आहेत.