परतीचा पाऊस सोडेना पाठ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर -  जिल्ह्यात सोमवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटामुळे शेतकऱ्यांचे धाबे दणाणले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भात कापणी आणि भुईमूग काढणीचे कामे सुरू आहेत. या सर्व पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. सोयाबीन पिकाला सर्वाधिक या पावसाचा फटका बसला आहे. 

जिल्ह्यात पावसाने आपला उपद्रव सुरू केला आहे. धरणांची पाणी पातळी समाधानकारक आहे, मात्र आता पडणारा पावसाने थेट शेती उत्पादनाला फटका बसणार आहे. भात, भुईमूग, सोयाबीन पीक पूर्ण परिपक्व झाले आहेत. आता हे पीक शेतात ठेवल्याने सोयाबीन व भुईमुगाला जास्त पावसामुळे कोंब येऊ लागले आहेत. त्यामुळे हातात आलेले पीक कुजून जाण्याची भीती आहे.

पावसाने उघडीप दिल्यामुळे मळणीची कामे जोमाने सुरू होती. दुपारपर्यंत पाऊस पडेल, असे चित्र नव्हते. वातावरणात गारवाही होता; मात्र पश्‍चिमेकडून जोरदार आलेल्या वाऱ्यासह पावसानेही हजेरी लावली. किरकोळ प्रमाणात पडणाऱ्या पावसाने नंतर जोरदार हजेरी लावून शहरातील रस्त्यावर पाणी-पाणी केले. या पावसाने शेतातील खळ्यावर कापून ठेवलेल्या भात भिजल्याने नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत एकसारखा सुरू असलेल्या पावसामुळे मात्र शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. शहरात नोकरीनिमित्त आलेल्यांनी आज पाऊस येणार नाही, असे समजून रेनकोट आणले नाहीत, अशांना घरी जाताना भिजतच जावे लागले.