महावितरणची बिल सेवा होणार गतिमान 

महावितरणची बिल सेवा होणार गतिमान 

कोल्हापूर - महावितरणचे वीज बिल ग्राहकांना अचूक मिळावे, बिलासंदर्भातील तक्रारींचा ओघ कमी व्हावा, यासाठी आधुनिक प्रणालीचा वापर करण्यात येत असून, त्यानुसार पुढील काळात ऑनलाईन वीज बिल भरणा वाढावा यासाठी मोबाईल ऍपची सेवा गतिमान करण्यात येत आहे. तशा सूचना महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी नुकत्याच दिल्याने राज्यभरातील केंद्रांवर याची तयारी सुरू झाली आहे. 

महावितरणने मीटर रिडिंग व बिल वाटप करण्यासाठी ठेकेदार नियुक्त केले आहेत. अशा ठेकेदारांचे प्रतिनिधी घरोघरी जाऊन रिडिंग घेतात. तसेच बिलांचेही वाटप करतात. या प्रक्रियेत बिल रिडिंग घेण्यासाठी तीन-चार दिवसांचा उशीर होतो, तर काही वेळा वीज बिले ग्राहकाला वेळेत न मिळल्याने बिले वेळेत भरली जात नाहीत. काही वेळा रिडिंग घेणाऱ्या एका प्रतिनिधीला दिवसभरात शहरी भागात शंभर दीडशे घरांतील रिडिंग घ्यावे लागते. मोबाईल कॅमेऱ्याद्वारे घेतलेल्या रिडिंगची नोंदणी करताना एका ग्राहकाचे रिडिंग दुसऱ्या ग्राहकावर पडण्याची शक्‍यता असते. त्यातून अनेकदा ग्राहकांचे बिल जादा किंवा कमी येते. हा प्रकार थांबावा यासाठी महावितरणने आता मोबाईल ऍप विकसित केले आहे. या ऍपचा वापर करून रिडिंग घ्यायचे आहे. त्यासाठी 80 ते 85 टक्के ग्राहकांचे मोबाईल नंबर महावितरणकडे जमा आहेत. त्यानुसार संबंधित वीज ग्राहकांचा ग्राहक नंबर या ऍपमध्ये आहे. असा ऍप जोडलेल्या मोबाईल कॅमेऱ्यांत रिडिंग घेतल्यास ते रिडिंग थेट त्याच ग्राहकाच्या बिलात नोंदविले जाईल, अशी व्यवस्था यात आहे. 

रिडरने घेतलेले रिडिंग महावितरणच्या सर्व्हरला जोडले जाईल. त्यातून वीज ग्राहकाला त्याचे रिडिंग किती आहे, याचा संदेश पोचेल. त्यानंतर हिशेब होताच थेट ग्राहकाच्या मोबाईलवर बिल मिळणार आहे. बिल मिळाल्यानंतर कोणत्याही वीज बिल भरणा केंद्रात बिल स्वीकारले जाईल. त्यासाठी छापील प्रिंटची आवश्‍यकता असेलच असे नाही. केवळ महावितरणचा संदेश दाखविला तरी बिल भरून घेता येईल, असे नियोजन करण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यांत ही सेवा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे. 

क्रॉस चेकिंग होणार 
ठेकेदारांकडून वारंवार बिले वाटपात किंवा बिलाच्या हिशेबात घोळ होऊ नये, यासाठी एकूण 5 ते 15 टक्के ग्राहकांचे रिडिंग पुनर्तपासणीचे अधिकार महावितरणच्या अधिकारी, अभियंत्यांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे रिडिंगमध्ये क्रॉस चेकिंग होणार आहे. त्यानुसार जेथे जास्त घोळ दिसेल, अशा ठिकाणचा ठेका बदलण्याचा अधिकारही महावितरण अधिकाऱ्यांना मिळाला आहे. त्यानुसार वीज बिलासंदर्भातील कामे काही गरजू घटकांनाही मिळण्याची शक्‍यता आहे. 

महावितरणचे एकूण ग्राहक 
18 हजार 600 
90 टक्के ग्राहकांचे मोबाईल क्रमांक संकलित 
रिडरला घरगुती रिडिंग घेण्यासाठी 5 रुपये मिळत होते. ते आता 6 रुपये 50 पैसे मिळणार आहेत. व्यावसायिक मीटर रिडिंगसाठी 6 रुपये 75 पैसे मिळत होते, आता 8 रुपये 50 पैस मिळणार आहेत. तर कृषी पंप रिडिंगसाठी 10 रुपये मिळत होते, आता 11 रुपये 50 पैसे मिळणार आहेत. 

लाभ असे - 
वीज बिलांच्या तक्रारींसाठीचे हेलपाटे कमी होतील. 
मोबाईलवर बिल मिळेल. 
महसूल वेळेत जमा होईल. परिणामी वीज रोखीने खरेदी करता येईल. 
बेरोजगारांना बिल रिडिंगचे काम मिळेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com