महापालिका यंत्रणा विसर्जनासाठी सज्ज

महापालिका यंत्रणा विसर्जनासाठी सज्ज

कोल्हापूर - सार्वजनिक गणपती विसर्जनाकरिता महापालिकेने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मिरवणूक मार्गावरील सर्व रस्त्यांच्या डागडुजीचे काम ऐनवेळी महापालिकेने सुरू केले. निश्‍चित विसर्जन मार्गावर लाकडी व मजबूत बांबूचे व आवश्‍यकतेनुसार लोखंडी बॅरिकेडस्‌ व वॉच टॉवर उभारण्यात येत आहेत. 

ड्रेनेजलाइनमधील अडचणी दूर करण्यात येत आहेत. विसर्जन मार्गावरील सर्व अडथळे व अतिक्रमणे काढण्यात आले आहेत. मिरवणूक मार्गावरील अडथळा ठरत असलेल्या झाडांच्या फांद्याही छाटण्यात आल्या आहेत.

मिरवणूक मार्ग व विसर्जनाच्या ठिकाणी लाइटची व्यवस्था करण्यात आली आहे. पंचगंगा नदीघाट, राजाराम तलाव, कोटीतीर्थ तलाव, पंचगंगा नदी, बापट कॅम्प येथे दान करण्यात येणाऱ्या गणेश मूर्ती ठेवण्यासाठी मंडप उभारण्यात आलेला आहे. इराणी खणीवर दोन जे.सी.बीं.ची व्यवस्था केली आहे. तसेच इराणी व बाजूच्या खणीभोवती संरक्षणासाठी बॅरेकेडिंग करण्यात आले आहे. वॉच टॉवर व पोलिस पेंडल उभे करण्यात आले आहेत.

मिरवणूक मार्ग व मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत.
आरोग्य विभागाकडून विर्सजन मिरवणूक मार्ग, विसर्जन स्थळी साफसफाई करण्यात आली असून वैद्यकीय पथक नेमण्यात आले आहे. दानमूर्ती व निर्माल्य योग्य त्या ठिकाणी पोचविण्यासाठी वाहतूक व्यवस्था व कर्मचारी नेमण्यात आले आहेत. विसर्जन मार्गावरील धोकादायक इमारतींभोवती बॅरेकेड्‌स उभारण्यात येत आहेत. तसेच या इमारतीजवळ ती धोकादायक असल्याचे फलक लावण्यात येत आहेत. नागरिकांनी अशा इमारतीच्या परिसरात अगर इमारतीमध्ये प्रवेश करू नये, असेही आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

अग्निशमन विभागामार्फत पंचगंगा घाट, इराणी खण, कोटीतीर्थ तलाव, राजाराम तलाव व राजाराम बंधारा या विसर्जन ठिकाणी अग्निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा गार्ड आवश्‍यक त्या साधनसामग्रीसह तैनात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

महापालिकेतर्फे ध्वनिप्रदूषण मोजण्यासाठी पोलिस खात्यास कायमस्वरूपी तीन अत्याधुनिक डिजिटल मशिन्स्‌ देण्यात आल्या आहेत. तसेच महापालिकेच्या वेबसाइटवर ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रार दाखल करण्यासाठी लिंक देण्यात आली असून यामध्ये पोलिस खाते, महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांचे मोबाईल नंबर, शांतता क्षेत्राची यादी वगैरे माहिती दिली आहे. 

विसर्जन इराणी खणीतच करा
सर्व सार्वजनिक मंडळांनी गणेशमूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीमध्ये न करता इराणी खणीमध्ये करावे तसेच विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध व डॉल्बीमुक्त करावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. विसर्जनासाठी महापालिकेने पवडी विभागाचे २५० कर्मचारी, आरोग्य व ड्रेनेज विभागाचे ८० व इतर विभागाचे कर्मचारी, ट्रॅक्‍टर-३५, डंपर-६ व जे.सी.बी.-५ ची अशी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

हवेची तपासणी
मिरवणूक मार्गावरील हवाप्रदूषण गुणवत्ता तपासणी केआयटी कॉलेज पर्यावरण विभागाचे शिक्षक, विद्यार्थी करणार आहेत. यासाठी केआयटी कॉलेजकडून हवा प्रदूषण गुणवत्ता तपासणीचे मशिन मिरवणूक मार्गावर लावण्यात येत आहे. 

पापाची तिकटी येथे स्वागत कक्ष 
कोल्हापूर महापालिकेच्या वतीने सार्वजनिक गणेश विर्सजन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक संस्था, तरुण मंडळे व तालीम संस्था अध्यक्षांना पापाची तिकटी येथील मंडपामध्ये महापौर सौ. हसीना फरास, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी व सर्व पदाधिकारी/अधिकारी यांच्या हस्ते श्रीफळ, पान, सुपारी अर्पण करण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांना वृक्षारोपणाचे महत्त्व समजण्याकामी रोपे भेट देण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com