कोल्हापूरात शाळकरी मुलाचा खून

कोल्हापूरात शाळकरी मुलाचा खून

कोल्हापूर - शाळकरी मुले फुटबॉल खेळत असताना झालेल्या वादातून शिवाजी पेठेतील शाळकरी मुलाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. सायंकाळी सातच्या सुमारास गांधी मैदानात हा प्रकार घडला. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रणव ऊर्फ गणेश सुभाष बिंद (वय १७, रा. खंडोबा तालीम परिसर, शिवाजी पेठ) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. 

दरम्यान, शिवाजी पेठेत दोन तालमींच्या वादातून खून झाल्याची चर्चा सुरू झाल्याने पोलिसही चक्रावून गेले. तातडीने शहरातील सर्व पोलिस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचारी शिवाजी पेठ व सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. वस्तुस्थिती समजल्यानंतर यावरून निर्माण झालेला तणाव कमी झाला. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी - खंडोबा तालीम व संध्यामठ गल्लीतील मुले रोज गांधी मैदानावर फुटबॉल खेळतात. काही दिवसांपासून या मुलांत काही कारणांवरून वाद झाला होता. दत्त जयंतीदिनी हा वाद आणखी चिघळला. आज सायंकाळी गणेश बॅट घेऊन मित्रांबरोबर गांधी मैदानावर खेळायला गेला होता. त्याठिकाणी संध्यामठ गल्लीतील तुषार रसाळ व वैभव राऊत हे दोघे आले. त्यांनी महिनाभरापूर्वी झालेल्या वादातून गणेशला बॅट व लाथा-बुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. याचवेळी या दोघांबरोबर असलेल्या एका  मुलाने मैदानावरून पळत जाऊन खंडोबा तालीम परिसरात थांबलेल्या मुलांना या हाणामारीची माहिती दिली. नंतर आलेले तरुण भांडण मिटविण्याचा प्रयत्न करीत असतानाच वैभवने कमरेला लावलेला चाकू काढून गणेशच्या डाव्या खांद्यावर वार केला. हा घाव वर्मी लागल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. गंभीर जखमी अवस्थेत गणेशला त्याच्याबरोबर असलेल्या इतरांनी सीपीआर रुग्णालयात दाखल केले; पण उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. 

शिवाजी पेठेत खून झाल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरली. सुरवातीला दोन पारंपरिक गटांत हा वाद झाल्याचे समजून काही काळ तणावाचे वातावरणही निर्माण झाले. पण, वस्तुस्थिती समोर आल्यानंतर तणाव निवळला. पोलिसांनी या प्रकरणी तुषार रसाळ व वैभव राऊत या दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी खंडोबा तालीम परिसरातील शुभम गणेश पोवार याने फिर्याद दिली.  

गणेशचे कुटुंबीय मूळचे गुजरातचे आहे. अनेक वर्षांपासून तो, त्याची आई शोभना व एक लहान भाऊ दीपक (वय ९) असे भाड्याने राहतात. अलीकडेच ते खंडोबा तालीमशेजारील बोळात बळवंत माने यांच्या घरी भाड्याने राहण्यास गेले होते. गणेशची आई खेळणी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते, तर वडील या कुटुंबाला सोडून गेले आहेत. 

मंगळवारी सायंकाळी गणेशची आई खेळणी विकण्यासाठी ओढ्यावरील रेणुका मंदिरात गेली होती. जाताना तिने मुलांना शेजारील हळदीच्या कार्यक्रमास थांबण्यास सांगितले होते. लहान भाऊ दीपक आल्यानंतर त्याचा अभ्यास घेण्याचीही सूचना तिने गणेशला केली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास तो ओढ्यावरील रेणुका मंदिर येथे बॅटरी देण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो हळदीच्या कार्यक्रमासही काही वेळ उपस्थित होता. पण, लहान भाऊ येण्यापूर्वीच गणेश फुटबॉल खेळायला गांधी मैदानावर गेला आणि त्याचा खून झाला. 

‘सीपीआर’मध्ये गर्दी 
शिवाजी पेठेत खून झाल्याची माहिती समजताच या परिसरातील तरुणांनी ‘सीपीआर’मध्ये गर्दी केली होती. त्यात खेळाडू अधिक होते. पोलिसांनी नंतर या तरुणांना पांगविले. दक्षतेचा भाग म्हणून रात्री उशिरापर्यंत येथे पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. 

आईचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा
आपल्या मुलाला काही तरी लागल्याचे समजताच गणेशची आई शोभना तातडीने ‘सीपीआर’मध्ये आल्या. त्यांना आपल्या मुलाचा खून झाल्याचे कळताच त्यांनी हंबरडा फोडला. त्यांचा हा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. शोभना या आजारी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक संजय साळुंखे, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्यासह पोलिस कर्मचारी ‘सीपीआर’मध्ये दाखल झाले. श्री. अमृतकर यांनी घटनेची माहिती घेऊन गणेशच्या आईची भेट घेतली व पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या. 

कमरेला चाकू लावूनच मैदानावर
फुटबॉलवरून या शाळकरी मुलांत वाद सुरू होता. त्यात बॅट व इतर साहित्यांचा वापर झाला; पण एवढ्या लहान वयात या मुलांकडे चाकू आला कुठून हा प्रश्‍न आहे. मात्र, चौकशीत यातील वैभव राऊत हा कमरेला चाकू लावूनच आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

शिवाजी पेठेत बंदोबस्त
खंडोबा तालमीसह उभा मारुती चौक परिसरात दक्षतेचा भाग म्हणून सायंकाळनंतर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी राज्य राखीव दलाच्या तुकडीसह परिसरात गस्त घातली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com