शारदीय नवरात्रोत्सवाचा आजपासून जागर

शारदीय नवरात्रोत्सवाचा आजपासून जागर

कोल्हापूर - शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून (ता. २१) पारंपरिक उत्साहात प्रारंभ होणार आहे. भजन, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह रास-दांडिया आणि विविध स्पर्धांच्या साक्षीने दहा दिवस हा उत्सव रंगणार आहे. अंबाबाई मंदिरातील सर्व तयारी पूर्ण झाली असून सकाळी मंदिरात घटस्थापना होईल. सायंकाळी साडेपाचला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते एलईडी विद्युत रोषणाईचे उद्‌घाटन होईल. दरम्यान, यंदाच्या नवरात्रोत्सवात श्री दुर्गासप्तशतीवर आधारित श्री अंबाबाईच्या सालंकृत पूजा बांधल्या जातील.

साडेतीन शक्तिपीठातील आद्य पीठ असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईचा शारदीय नवरात्रोत्सव संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. उत्सव काळात देशभरातून २५ लाखांवर भाविक दर्शनासाठी येतात. उद्या (ता. २१) नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस असून देवीला पहाटेचा व सकाळचा अभिषेक झाल्यानंतर सकाळी साडेआठ वाजता तोफेच्या सलामीने घटस्थापना होईल. त्यानंतर देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते शासकीय अभिषेक होईल. दुपारच्या आरतीनंतर देवीची शैलपुत्री रूपात सालंकृत पूजा बांधली जाईल. रात्री साडेनऊ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील व अंजली पाटील यांच्या हस्ते पालखीचे पूजन होऊन पालखी सोहळा संपन्न होईल. यंदा सुवर्ण पालखीतून पालखी सोहळा होणार असून विविध आकारात पालखी न सजवता केवळ फुलांची सजावट असेल. 
 
शाहूपुरीत रोज रात्री रास-दांडिया
शाहूपुरी बॉईज कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे आज दुर्गा आगमनाची भव्य मिरवणूक निघाली. उद्या (गुरुवारी) मूर्ती प्रतिष्ठापना होईल. उत्सवकाळात रोज रात्री ९ ते ११ या वेळेत येथे रास-दांडिया रंगणार असून विविध स्पर्धांचे आयोजनही केले आहे. 

तुळजाभवानी मंदिरात उत्सवाची जय्यत तयारी 
भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरासह नवदुर्गा मंदिरातही उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. तुळजाभवानी मंदिर आणि परिसराची आज डीएम एंटरप्रायजेसतर्फे स्वच्छता करण्यात आली. त्यामध्ये संस्थेचे २५ हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले.   

‘कारगील ते डोकलाम’ रंगावलीचा ‘शिवगर्जना’चा आविष्कार
खोलखंडोबा तालीम परिसरातील शिवगर्जना तरुण मंडळातर्फे यंदाही रांगोली प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. रंगावलीकार महेश पोतदार ‘कारगील ते डोकलाम’ या विषयावरील विविध रांगोळ्या साकारतील. शुक्रवार (ता. २२) पासून प्रदर्शनाला प्रारंभ होणार असून मुली व महिलांसाठी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. २७ ते २९ सप्टेंबर या काळात गालिचा रांगोळी प्रशिक्षण दिले जाणार असून खाद्यमहोत्सवाचे आयोजनही केले जाणार आहे. अंबाबाईच्या मूर्तीची रोज विविध सालंकृत पूजा येथे बांधली जाईल, असे अध्यक्ष नितीन मुधाळे, उपाध्यक्ष गजानन मुनीश्‍वर, संयोजक सुनील करंबे, माधुरी करंबे यांनी सांगितले.

धर्मशाळेसह यात्री निवास हाऊसफुल्ल
यंदा सुरक्षा व गर्दीचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होण्यासाठी देवस्थान समितीसह प्रशासनाने नेटके नियोजन केले आहे. उत्सव काळात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर यंदा आजच मोठ्या संख्येने परगावच्या भाविकांनी हजेरी लावली. पहिल्याच दिवशी देवीचे दर्शन घेऊन परतण्यावर त्यांच्या भर असेल. साहजिकच मंदिर परिसरातील धर्मशाळेसह यात्री निवास, खासगी लॉजेस फुल्ल झाले आहेत.

बाजारपेठ हाऊसफुल्ल 
नवरात्रोत्सवानिमित्त बाजारपेठेत हाऊसफुल्ल गर्दी आहे. फुलांची बाजारपेठ गर्दीने न्हाऊन निघाली आहे. देवीच्या पूजेला लागणाऱ्या झेंडू, मोगऱ्याची वेणी, कमळ आदी फुलांना मागणी वाढली आहे. कपिलतीर्थ मार्केट, राजारामपुरी, शिंगोशी मार्केट, जोतिबा रोड, फूल बाजार आदी ठिकाणी फुलांसह फुले आणि पूजेच्या साहित्याच्या खरेदीला उधाण आले.  

महालक्ष्मी अन्नछत्रतर्फे रोज दहा हजार भाविकांची सोय 
श्री महालक्षी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे उत्सव काळात दररोज दहा हजार भाविकांना मोफत भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. सकाळी अकरा ते चार या वेळेत अन्नछत्र सुरू राहील. त्याशिवाय अन्नछत्रामधील अंबाबाई मूर्तीची नऊ दिवस सालंकृत पूजा बांधली जाणार आहे.

पाणीवाटप
श्रीपूजक गजानन मुनीश्‍वर यांच्या वतीने यंदाही भाविकांना मोफत शुद्ध पाणी वाटप केले जाणार आहे. ज्यांना स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा आहे, त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. दर्शन रांगेमध्ये ही सुविधा दिली जाईल. त्यांच्यासह विविध संस्था, संघटनांकडूनही पाणी वाटप होणार आहे.

शिवाजी चौकात आजपासून सोंगी भजन
शिवाजी चौकात गुरुवारपासून सोंगी भजन स्पर्धेचे आयोजन केले असून सलग नऊ दिवस विविध भजनांचे कार्यक्रम होतील. रात्री नऊ वाजता भजनांना प्रारंभ होईल. त्याशिवाय काही मंडळांनी रास-दांडिया स्पर्धांचे आयोजनही केले आहे.

उत्तरेश्‍वर पेठ सज्ज
नवरात्रोत्सव आणि उत्तरेश्‍वर पेठ हे एक अतूट समीकरण असून सारी पेठ नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाली आहे. पंधराहून अधिक मंडळांनी पेठेत मंडपाची उभारणी केली असून तेथे आता मूर्ती प्रतिष्ठापना होईल. विद्युत रोषणाईनेही हा सारा परिसर उजळून निघणार आहे आणि रात्री रास-दांडियाचे कार्यक्रमही होणार आहेत.

वादग्रस्त पुजाऱ्यांना मंदिरात पाऊल ठेवू देणार नाही
 श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीने दोन दिवसापूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांना निवेदन देऊन आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे निवेदन दिले. मात्र श्रीपूजक अजित ठाणेकर यांनी आम्ही मंदिरात जाणारच अशी भूमिका घेतली आहे. ठाणेकर कोल्हापूरकरांना असे आव्हान देत असतील तर ते आम्ही स्वीकारले आहे. कोणत्याही परिस्थितीत काहीही झाले आणि कितीही मोठा बंदोबस्त लावला तरी वादग्रस्त पुजाऱ्यांना मंदिरात पाऊल ठेवू देणार नाही, अशा आशयाचे निवेदन समितीने प्रसिद्धीस दिले आहे. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात योग्य तो निर्णय होणार असल्याचे सांगितल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित केले. त्यांचा सन्मान व विश्‍वास राखून समितीने संयमाची भूमिका घेतली. मात्र पुजाऱ्यांनाच कायदा, सुव्यवस्था व शांतता भंग करायची असेल तर समिती व लाखो भाविकांचा नाईलाज आहे, असेही पत्रकात म्हटले आहे. संजय पवार, आर. के. पोवार, जयंत पाटील, शरद तांबट, विजय देवणे, दिलीप पाटील, वसंतराव मुळीक, आनंद माने, बाबा पार्टे, इंद्रजित सावंत, माजी आमदार सुरेश साळोखे, शिवाजीराव जाधव, राजेश लाटकर आदींच्या पत्रकावर सह्या आहेत.

दिलीप देसाई, सचिन तोडकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘ठाणेकरांनी अंबाबाईला केलेल्या पेहरावामुळे सर्वांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद असूनही त्याचा तपास झालेला नाही. उलट त्यांनीच मंदिरात जाण्यासाठी पोलिस संरक्षण मागितले आहे. त्यांना मंदिरात प्रवेश देऊन वाद उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शांतता, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी त्यांना मंदिरात प्रवेश देऊ नये.’’

या वेळी नारायण पोवार, जयश्री चव्हाण, ॲड. चारुलता चव्हाण, संदीप देसाई, उमेश जाधव, सुशील कोरडे, प्रसाद जाधव, उदय लाड, संतोष ढाले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

अंबाबाईच्या विविध रूपातील पूजा अशा
 गुरुवार (ता. २१) ः शैलपुत्री रूपातील बैठी पूजा 
 शुक्रवार (ता. २२) ः दशभुजा महाकाली रूपातील पूजा
 शनिवार (ता. २३) ः अष्टभुजा अंबाबाई ही कमळातील सालंकृत पूजा 
 रविवार (ता. २४) ः अष्टभुजा महासरस्वती रूपातील खडी पूजा 
 सोमवार (ता. २५) ः अंबारीतील गजारूढ पूजा 
 मंगळवार (ता. २६) ः शृंगेरी शारदांबा रूपातील पूजा
 बुधवार (ता. २७) ः श्री भुवनेश्‍वरी रूपातील बैठी पूजा 
 गुरुवार (ता. २८) ः महिषासुरमर्दिनी रूपातील पूजा
 शुक्रवार (ता. २९) ः शस्त्रपूजा 
 शनिवार (ता. ३०) ः विजयोत्सव रूपातील रथारूढ पूजा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com