मांगल्याच्या वातावरणाने भाविकांत ऊर्जा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - श्रद्धा, कलात्मकता आणि मांगल्याच्या वातावरणात नवऊर्जा दर्शन सोहळ्याला आज दुसऱ्या दिवशी भाविकांचा उदंड प्रतिसाद लाभला. याबरोबरच अनोख्या नृत्याविष्काराचा अनुभव घेताना भाविकांच्या मनालाही प्रसन्नतेचा साज लाभला.

कोल्हापूर - श्रद्धा, कलात्मकता आणि मांगल्याच्या वातावरणात नवऊर्जा दर्शन सोहळ्याला आज दुसऱ्या दिवशी भाविकांचा उदंड प्रतिसाद लाभला. याबरोबरच अनोख्या नृत्याविष्काराचा अनुभव घेताना भाविकांच्या मनालाही प्रसन्नतेचा साज लाभला.

दरम्यान, भालचंद्र चिकोडे ट्रस्टतर्फे निर्माण चौकात उभारलेल्या नवऊर्जा दर्शन सोहळ्यास आज शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भेट देत नवदुर्गांचे दर्शन घेतले. अभिनेते सुबोध भावे, पुष्कर श्रोत्री यांनीही या कलाकृतीला भेट देऊन कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी साकारलेल्या नवदुर्गा दर्शनच्या भव्य कलाकृतीचे कौतुक केले. 

प्रवेशद्वारावरील हत्तींच्या प्रतिकृती, दर्शन कक्षाची भव्य तटबंदी, कलात्मक मूर्ती, देवीची मळवट भरलेली प्रतिकृती असा भव्य कलाविष्कार पाहून अनेक पर्यटक भाविक थक्क झाले. सार्थक क्रिएशनच्या कलावंतांनी नवदुर्गांचे माहात्म्य दाखविणारा ‘आदिशक्ती’ हा बॅले सादर केला. यात उत्कृष्ट सांघिक संवाद साधत कलावंतांनी उपस्थितांची मने जिंकली.  

सुबोध भावे म्हणाले, ‘‘श्री. देसाई यांनी भव्य सेट साकारला आहे. यात शहरातील तसेच अवतीभोवतीच्या नवदुर्गांच्या प्रतिमा, तसेच लक्षवेधी शिल्पकला साकारली आहे.’’
कर्तृत्ववान महिलांचा सत्कार मंत्री तावडे यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, राहुल चिकोडे, ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, पत्रकार विजय जाधव यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळविलेल्या तीन महिलांचा सत्कार झाला. यात कुस्तीपटू रेश्‍मा माने, ‘अवनी’च्या अनुराधा भोसले व पर्यटन क्षेत्राच्या अभ्यासक अरुणा देशपांडे यांचा समावेश होता. चारुदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले.