...अखेर शिवाजी स्टेडियमच्या भिंतींना लागला रंग

...अखेर शिवाजी स्टेडियमच्या भिंतींना लागला रंग

कोल्हापूर -  राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या धास्तीने का असेना, अखेर छत्रपती शिवाजी स्टेडियममधील इमारतीला रंग लागला. ‘स्ट्रिक्‍ट ऑफिसर’ अशी ओळख असलेल्या श्री. केंद्रेकर हे अचानक क्रीडा कार्यालयांना भेटी देत जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्यात कमी पडत नाहीत. ही आफत नको म्हणून स्टेडियमच्या भिंतींची रंगरंगोटी करण्याचे काम उरकले. 

स्टेडियममधील इमारतीत जिल्हा क्रीडा कार्यालय, क्रीडा प्रबोधिनीचे कुस्ती केंद्र, टेबल-टेनिस व बुद्धिबळ प्रशिक्षण हॉल, क्रीडाप्रबोधिनीचे वसतिगृह, स्वच्छतागृह आहे. ही इमारत जिल्हा क्रीडा कार्यालयाची आहे की एखादे गोदाम आहे, अशा प्रश्‍नांकित चेहऱ्याने क्रीडाप्रेमी कार्यालयाच्या पायऱ्या चढायचे. रंग उडालेल्या भिंती, क्रीडाधिकाऱ्यांच्या खोलीत अस्ताव्यस्त पडलेल्या फायली यामुळे क्रीडा कार्यालयाचे रूप ओंगाळवाणे दिसत होते. तळमजल्यातील खोल्यांची स्थिती न पाहण्यासारखीच. आंतरराष्ट्रीय नेमबाज नवनाथ फरताडे यांना राहण्यासाठी येथील एक खोली तात्पुरत्या स्वरूपात वातानुकूलित करून दिली. त्या वेळी येथील सर्व खोल्यांची स्वच्छता ठेवली जात होती. त्यानंतर मात्र या खोल्या म्हणजे अडगळीची जागा झाली. 

राज्याचे नवे क्रीडा आयुक्‍त श्री. केंद्रेकर यांचे जिल्हा क्रीडा कार्यालयांच्या कारभारावर बारीक लक्ष आहे. क्रीडा कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता असली पाहिजे, अशी त्यांची इच्छा असल्याचे क्रीडा वर्तुळातून सांगण्यात येते. विशेष म्हणजे ते क्रीडा कार्यालयांची अचानक पाहणी करतात आणि काही त्रुटी असल्यास अधिकाऱ्यांना फैलावर घेत असल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात आहे. त्यांच्या रोषास सामोरे जायला लागू नये, यासाठी क्रीडा कार्यालये सतर्क होत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून इथले क्रीडा कार्यालय जागे झाले. गेले अनेक वर्षे स्टेडियमच्या भिंतींवरचा रंग उडाला होता, तरीही त्यावर रंगरंगोटी  केली नव्हती. जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे यांनी इमारतीतील भिंतींना रंगरंगोटी करून घेतली. क्रीडाधिकारी बसत असलेल्या खोलीची रंगरंगोटी मात्र केलेली नाही. ती कधी करणार, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. 

कोण आहेत केंद्रेकर?  
श्री. केंद्रेकर हे २००२ च्या बॅचचे आयएएस आहेत. बीडचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. वाळू माफिया व अवैध बांधकामांविरोधात त्यांनी केलेल्या कारवाईने ते चर्चेत आले. सोलापूर जिल्हा परिषद, सेल्स टॅक्‍स, सिडको, कृषी खात्यात त्यांनी काम केले असून, ते आता राज्याचे क्रीडा आयुक्त झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com