फटाक्‍यांचा आवाज कमी

फटाक्‍यांचा आवाज कमी

कोल्हापूर - ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी वारंवार होणारे प्रबोधन सध्या प्रत्यक्षात उतरत असल्याचे दिसते. दिवाळीच्या पहाटे तीन-चारपासून सुरू होणारा फटाक्‍यांचा आवाज थंडावल्याचे जाणवले.

पाच-सहा वर्षांपूर्वी पहाटे फटाक्‍यांचा आवाज सलग न तुटता सकाळी सहा-साडेसहापर्यंत ऐकायला मिळत होता. फटाके मोठ्या प्रमाणात उडविल्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होते. ते रोखण्यासाठी शोचे फटाके वाजवावेत, मोठ्या आवाजांचे फटाके उडविणे टाळावे यांसह अन्य बाबींची माहिती वेळोवेळी प्रसिद्ध होते. माध्यमांतून त्यावर प्रकाश टाकला जातो. प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या जनजागृतीमुळे सध्या फटाके उडविण्याचे प्रमाण कमी झाले. शहरातील मैदानांवर असलेल्या फटाके स्टॉलवर गर्दी कमी होती.

शोभेच्या फटाक्‍यांना मागणी वाढली. मोठ्या आवाजाच्या फटक्‍यांची विक्रीही कमी झाली. फटाके वाजविण्याच्या तोट्यांचे फलकही काही फटाके विक्रेत्यांनी दुकानाशेजारी लावले. काही दुकानदारांकडून फटाके विक्री करतानाच ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रबोधन केले जात आहे. लहान मुलांना एकट्याला फटाके उडविण्यास देऊ नये यासाठी प्रबोधन केले जात आहे.

नागगोळी सारख्या फटाक्‍यांनी होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांची विक्रीच विक्रेत्यांनी बंद केली. कमी आवाजाचे फटाके विक्रीस ठेवले आहेत. ग्राहकही कमी आवाजाचे फटाके मागत आहेत. शक्‍यतो शोभेचे फटाके, पाऊस यांना अधिक पसंती देत आहेत. यामुळे दिवाळीत होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होत असल्याचे दिसून येते.

सोशल मीडियावर फटाकेमुक्तीची धूम
दिवाळीत फटाके वाजवू नये, ध्वनी आणि वायू प्रदूषण होऊ नये यासाठी व्हॉटस्‌ॲप, फेसबुकवरही नेटिझन्सनी चार दिवस अगोदरच जनजागृती घडवून आणली. मित्र परिवार, नातेवाईक, लांबच्या कुटुंबीयांना तसे संदेश देण्यात आले. यातूनही समाजात जागृती झाल्याचे स्पष्ट झाले.

दिवाळीत होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी याबाबतचे सर्वेक्षण २०१४ पासून सुरू केले आहे. सध्याही ते सुरू आहे. त्याचा विचार करता दोन वर्षापेक्षा यंदा ध्वनी प्रदूषण कमी असल्याचे दिसून येते. मात्र अजून तीन दिवस दिवाळी आहे. त्यानंतरच विश्‍लेषण करता येईल.
- सचिन भोसले, 
    प्रदूषण व पर्यावरण अभ्यासक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com