अकोळकर, पवारवर अजामीनपात्र वॉरंट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तीन व चार क्रमांकाचे संशयित आरोपी विनय पवार आणि सारंग अकोळकर या दोघांना जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांनी "अजामीनपात्र वॉरंट' जारी केले. तपास यंत्रणेने दाखल केलेल्या अर्जावर न्यायालयाने आज हा आदेश दिल्याचे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी सांगितले. पहिला संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या चार्जफ्रेमबाबतची पुढील सुनावणी 5 ऑगस्टला होईल.

पानसरे हत्याप्रकरणी संशयित समीर गायकवाडनंतर दुसरा संशयित डॉ. वीरेंद्र तावडेला 2 सप्टेंबर 2016 ला तपास यंत्रणेने अटक केली. त्याच्या चौकशीत मडगाव- गोवा बॉंबस्फोटातील राष्ट्रीय तपास यंत्रणेने फरारी घोषित केलेले सनातनचे साधक विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, ता. कऱ्हाड) आणि सारंग दिलीप अकोळकर यांची नावे पुढे आली. पानसरे हत्येत त्या दोघांचा सहभाग असल्याचा ठपका तपास यंत्रणेने ठेवला.

त्यानंतर त्या दोघांचा एसआयटीच्या विविध पथकांमार्फत शोध सुरू झाला; मात्र अद्याप ते दोघे तपास यंत्रणेच्या हाती लागलेले नाहीत. त्यांना फरारी घोषित करण्याची मागणी तपास यंत्रणेने जिल्हा न्यायालयात 10 फेब्रुवारी 2017 ला केली होती. त्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात सुरू होती. न्यायाधीश बिले यांनी आज त्या दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले, त्यामुळे त्या दोघांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.