मागणीविना रोपवाटिका तोट्यात 

राजकुमार चौगुले
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - पावसाने ओढ दिल्याने ऊस रोपांची मागणी घटली आहे. कोट्यवधी रोपे रोपवाटिकांत पडून आहेत. त्यामुळे ऊस रोपे तयार करणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातील रोपवाटिका अडचणीत आल्या आहेत. उत्पादन खर्च निघत नसल्याने या रोपवाटिका व्यावसायिकांना कोट्यवधींचा फटका सहन करावा लागत आहे. "कोकोपीट' व "ट्रे'ला अगोदरच "जीएसटी' लागल्याने रोपे तयार करणे खर्चिक झाले आहे. मागणी घटल्याने रोपवाटिकांची उलाढालच ठप्प आहे. 

रोपे तयार; पण मागणी नाही 
पश्‍चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा भागात 300 हून अधिक ऊस रोपवाटिका आहेत. काही ठिकाणी रोपवाटिकांबरोबर शेतकऱ्यांनी जोड व्यवसाय म्हणून ऊस रोपवाटिका सुरू केल्या आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांनी रोपे लावण्यासाठी प्रोत्साहन दिल्याने शेतकऱ्यांतही याची जागृती होत आहे. रोप लागवड केल्याने कारखाने महिनाभर अगोदर उसाची नोंद करतात, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. यामुळे अलीकडे ऊस रोपांना मागणी वाढली होती. विशेषत: कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील रोपवाटिकांत चांगल्या पद्धतीची ऊस रोपे मिळत असल्याने रोपांना महाराष्ट्राबरोबर कर्नाटक व गुजरातमधूनही वर्षभर चांगली मागणी असते. यंदाही रोपे तयार आहेत; पण मागणीच नाही, अशी परिस्थिती आहे. 

रोपे काढून टाकण्याची वेळ 
महिनाभर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी लावणी थांबविल्या आहेत. बाहेरील राज्यांतही पाऊस नसल्याने रोपांना मागणी कमी आहे. रोपवाटिकांत रोपे तयार आहेत. पण, वेळेत रोपे जात नसल्याने त्या रोपांची वाढ होत आहे. कालावधीपेक्षा जास्त वाढलेली रोपे लावणीलाही शक्‍य होत नसल्याने ही रोपे नष्ट करावी लागत असल्याचे सांगण्यात आले. 

तोट्यात विक्री 
बियाणांनुसार दीड ते दोन रुपयांपर्यंत ऊस रोप तयार करण्यासाठी खर्च येतो. यातच महिन्यापासून "कोकोपीट'वर पाच टक्के, तर "ट्रे'वर 28 टक्के "जीएसटी' लावल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली. जादा रकमेने रोपे विकणे अपरिहार्य आहे. पण, शेतकऱ्यांकडून जुन्याच दरात मागणी होत असल्याने तोटा सहन करून रोपांची विक्री करावी लागते. 

जिल्ह्यात तमदलगे व जांभळी हा परिसर ऊस रोपवाटिकांचे आगार मानला जातो. दोन गावांतच एक कोटी ऊस रोपे पडून आहेत. अनेक वर्षांत अशी परिस्थिती पहिल्यांदाच ओढवली आहे. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी रोपांनी ऊस लागण कमी केल्याने रोपवाटिकांतून रोज हजारो रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. 
- शिवाजीराव कचरे, कचरे हायटेक रोपवाटिका, तमदलगे