कमानींची ही रांग कशासाठी?

सुधाकर काशीद
गुरुवार, 25 मे 2017

१४४ वर्षांपूर्वीची योजना - कोल्हापूरच्या आदर्श पाणीपुरवठा योजनेचा विसर

१४४ वर्षांपूर्वीची योजना - कोल्हापूरच्या आदर्श पाणीपुरवठा योजनेचा विसर

कोल्हापूर - पुर्वजांनी भरपूर करून ठेवले की पुढच्या पिढीला त्याचे फारसे महत्त्व नसते. पुर्वजांनी किती कष्टातून हे सारं करून ठेवलयं हे जाणून घ्यायचीही अनेकांची इच्छा असते. नेमकी तीच स्थिती कोल्हापूर शहरासाठी १४४ वर्षांपूर्वी करून ठेवलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या वाट्याला आली आहे. एक पैसाही वीजेवर खर्च होणार नाही, एक दिवसही पाणीपुरवठा खंडीत होणार नाही आणि एक थेंबही पाणी प्रदूषित होणार नाही, असली आदर्श नळ योजना आता एक भग्नावशेष झाली आहे. आदर्श पाणीपुरवठा कशी असावी याची एक काळ देशात आदर्श असलेली ही योजना होती. तर कशी याचाच या पिढीला विसर पडला आहे.

आता सुरू असलेल्या नवीन थेट पाईपलाईन योजनेतला भ्रष्टाचारच पाणीपुरवठा सुरू होण्यापूर्वीच नळातून बाहेर पडू लागला आहे. लाखातले काम कोटीत दाखवले जाऊ लागले आहे. पण १४४ वर्षांपूर्वीच्या पाणी योजनेतील पाणी वाहून नेणाऱ्या कमानी अजून भक्कम आहेत. वास्तविक महालक्ष्मी मंदिर, नवा राजवाडा, जुना राजवाडा, साठमारी इतकेच त्या कमानींना अन्यन साधारण महत्त्व आहे. कोल्हापूरच्या तत्कालिन नागरी सुविधांचा वारसा या कमानीच्या रुपाने उभा आहे. पण ‘नवी योजना नवा ढपला’ हा मंत्र जपणाऱ्यांना हा वारसा समजणार तर कधी? हा खरा प्रश्‍न आहे.

कोल्हापुरचं पाणी चवीला गोडसर स्वच्छ आणि थंडगार अशी मूळ ओळख. आणि त्याला कारणही तसंच. १८७३ साली शहराच्या दक्षिणेला कात्यायणी डोंगराच्या पायथ्याला कळंबा तळे बांधण्यात आले. हे तळे बालिंगे गावच्या हद्दीत होते. तेथून ते गाव हलवण्यात आले व नवे बालिंगे म्हणून फुलेवाडीच्या पुढे वसवले गेले. या बालिंगा गावच्या हद्दीत एक बंधारा बांधून पावसाचे पाणी अडवण्यात आले. कात्यायणीच्या डोंगराकडून येणारे पावसाचे नितळ पाणी या तळ्यात साठत होते. हे साठलेले पाणी नळावाटे मंगळवार पेठेत नंगिवलीच्या दर्ग्यापर्यंत आणण्यात आले. हे नळ टाकण्यासाठी दगड व चुण्यात कमानीची मोठी रांग बांधण्यात आली. या कमानीवर नळ टाकून पाणी नंगिवली दर्ग्याजवळ बांधलेल्या पाण्याच्या खजिन्यात (टाकी) सोडण्यात आले. टाकीची ही जागा शहराच्या तुलनेत उंचावर. त्यामुळे या टीकाचा पुन्हा जमिनीखालून नळ जोडून ते पाणी शहरात ठिकठिकाणी सार्वजनिक नळावाटे उपलब्ध करून दिले गेले. रोज ठराविक वेळेत हे पाणी सोडले जाऊ लागले. विजेचा खर्च नाही, पाणी उंच कमानीवरील नळाद्वारे टाकीत त्यामुळे आधेमध्ये प्रदूषणाचा प्रश्‍न नाही, अशा पद्धतीने शहरास जवळजवळ ७५ वर्षे स्वच्छ, नितळ पाणी मिळाले.
पुढे शहर वाढत गेले. 

भोगावतीवरून नवीन योजना झाली. आणि मूळ योजनेचे अस्तित्व हरवत चालले. परदेशात जर असे पाणी वाहून नेणाऱ्या कमानीचे अस्तित्त्व असते. तर ते जसेच्या तसे जपले असते. पण आपण कोल्हापुरकरांनी या कमानी दडवून टाकल्या. आजही या कमानी आहेत. पण आजूबाजूला इतकी बांधकामे की त्या दडून गेल्या आहेत. काही ठिकाणी जेसीबी लावून कमानी तोडून टिंबर मार्केट मार्केडकडे जाणारा रस्ता केला आहे. दिसतात त्या कमानी कशाच्या हे अनेकांना माहित नाही अशी परिस्थिती आहे. आणि या कमानी उभारणारा मेजर वॉल्टर ड्युकेटचे नाव कोणाला माहित असणेच अशक्‍य आहे. या कमानी म्हणजे तत्कालिन नागरी सुविधाचा वारसा आहेत. पण कमानी पोरक्‍या झाल्या आहेत. भविष्य काळात कधी पाडून टाकल्या तरी त्याचे कोणाला सोयर सुतक नसेल अशी परिस्थिती आहे.